अडबंगनाथ मंदिर

आंत्रज, ता. खामगाव, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात वसलेले आंत्रज हे छोटेसे गाव येथील अडबंगनाथ महाराजांच्या वास्तव्यामुळे जागृत श्रद्धास्थान बनले आहे. अडबंगनाथांना नाथ संप्रदायातील एक महान सिद्ध पुरुष मानले जाते. त्यांनी आंत्रजच्या या भूमीत कडक तपश्चर्या केली आणि आपल्या योगसामर्थ्याने परिसरातील लोकांची दुःखे दूर केली, असे सांगितले जाते. आंत्रज येथील अडबंगनाथांचे हे मंदिर शेकडो वर्षे प्राचीन आहे आणि ते विदर्भातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या परिसरात एकावर एक असे पाच दगड रचून मनातील इच्छा बोलल्यास त्या पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामधील उल्लेखानुसार, पूर्वी माणिक नावाचा शेतकरी शेतात काम करीत असताना भुकेने व्याकुळ झालेले गोरक्षनाथ तेथे आले. त्यांनी माणिकजवळ काहीतरी खाण्यास मागितले. माणिकनेही त्वरित आपली शिदोरी व पाणी त्यांना दिले. स्वतःसाठी आणलेली शिदोरी दिल्याने गोरक्षनाथ माणिकवर प्रसन्न झाले व ‘तुला काही वर मागायचा असेल तर माग’, असे म्हणाले. त्यावर माणिक म्हणाला, ‘मीच तुला माझी शिदोरी दिली, तू मला काय वर देणार? तुझे पोट भरले असेल तर आता तू येथून निघून जा.’ त्यावर गोरक्षनाथ माणिकला म्हणाले, ‘तुला जर माझ्याकडून वर नको असेल तर तूच मला वर दे.’ माणिकने त्यांना संमती दिली. त्यावर गोरक्षनाथांनी सांगितले की ‘इच्छेला जे येईल ते तू करू नकोस.’ माणिकला वाटले त्यात काय असे अवघड आहे म्हणून त्याने गोरक्षनाथांना होकार दिला.

संध्याकाळ झाल्यावर माणिकने आपले औत (नांगर) सोडले व ते डोक्यावर घेतले. त्यानंतर घराकडे जावे, अशी इच्छा त्याच्या मनात येताच त्याला गोरक्षनाथांना दिलेले शब्द आठविले. तो तसाच डोक्यावर औत घेऊन तेथेच एक तप तटस्थ उभा राहिला. १२ वर्षे एकाच जागेवर राहिल्याने माणिकच्या शरीरात त्राण उरले नव्हते. एके दिवशी गोरक्षनाथ, गुरू मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथांसह येथे आले. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना माणिकबद्दल सांगितले. दिलेल्या शब्दाला माणिक जागला होता. मच्छिंद्रनाथ म्हणाले, ‘खरोखरच तू महान तपस्वी आहेस. तुझ्यासारख्यांचा गुरू करून अनुग्रह घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.’ त्यावर माणिकने स्वभावानुसार प्रत्युत्तर केले की ‘मी का गुरू होऊ तुमचा, त्याऐवजी तुम्हीच माझे गुरू व्हा.’ त्यानंतर गोरक्षनाथांनी माणिकच्या कानावर आपले मुख लावत कान फुंकताच तो सज्ञान झाला. त्यांच्या मंत्राने माणिकच्या कानात प्रवेश करताच तो बृहस्पतीसमान (देवांचे गुरू) विद्वान झाला. गोरक्षनाथांनी माणिकला मच्छिंद्रनाथांसमोर आणले आणि सांगितले की हा अडबंग आहे, त्यास ‘अडबंगनाथ’ असे ओळखले जावे. अडबंगनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा देऊन निर्धारित यात्रेस गोरक्षनाथ आपल्यासोबत घेऊन गेले. पुढे तीर्थयात्रा करताना अडबंगनाथांनी सर्व विद्या संपादित केल्या. त्यांनी अनेक ठिकाणी तपश्चर्या केली. त्यापैकी खामगावमधील आंत्रज हे महत्त्वाचे स्थान मानले जाते. आंत्रज येथील ही टेकडी म्हणजेच त्यांची तपस्याभूमी मानली जाते.

बुलडाणा जिल्ह्याची भौगोलिक विभागणी प्रामुख्याने बाळाघाट आणि पायंघाट अशा दोन भागांत केली जाते. खामगाव तालुका हा जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात येतो आणि आंत्रज हे गाव खामगाव-चिखली रस्त्यावर वसलेले आहे. आंत्रज हे गाव जरी लहान असले तरी, अडबंगनाथ महाराजांच्या मंदिरामुळे ते संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. हे मंदिर एका उंच टेकडीवर स्थित असून पायथ्यापासून या मंदिराकडे येण्यासाठी पायरी मार्ग आहे. याशिवाय खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतील, असा पक्का रस्ताही नव्याने बांधलेला आहे. या मंदिराच्या परिसरातून ज्ञानगंगा नदीचा प्रवाह वाहतो, ज्याला गॅझेटियरमध्ये ‘ज्ञान नदी’ असे संबोधले गेले आहे. ही नदी चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथून उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन पूर्णा नदीला मिळते. ज्ञानगंगा नदीचा हा प्रवाह आंत्रज परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे.

या मंदिराच्या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार, एकेकाळी जेव्हा या भागात भीषण दुष्काळ पडला होता आणि पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला होता, तेव्हा महाराजांच्या आशीर्वादाने गावातील पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत झाले होते. आजही आंत्रज आणि आसपासच्या गावांतील लोकांची अशी दृढ श्रद्धा आहे की अडबंगनाथ महाराज हे परिसरातील शेती आणि गोधनाचेही रक्षण करतात. नैसर्गिक आपत्ती असो वा वैयक्तिक संकट; महाराजांकडे केलेला नवस पूर्ण होतोच, असा भक्तांचा विश्वास आहे.

पायरी मार्गावरून सुमारे २०० पायऱ्या चढून मंदिर असलेल्या टेकडीच्या पठारावर येता येते. या संपूर्ण पठारावर भाविकांकडून इच्छापूर्तीसाठी लहान लहान दगड एकावर एक असे मांडून ठेवलेले दिसतात. येथे अडबंगनाथांचे दर्शन घेतल्यानंतर पाच लहानमोठे दगड एकावर एक मांडून मनातील इच्छा बोलल्यास, ती अडबंगनाथ त्वरीत पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पठारावर एका उंच अधिष्ठानावर हेमाडपंती रचनेचे हे मंदिर आहे. या मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी आसनांची सुविधा आहे. मंदिरासमोर अधिष्ठानावर खुला मंडप आहे. त्यामधून मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. लहानसा सभामंडप आणि त्यापुढे गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात एका वज्रपीठावर दोन शेंदूरचर्चित शिळा आहेत. त्या शिळांना अडबंगनाथ म्हणून पुजले जाते. त्याशेजारी एक शिवपिंडी व नंदी आहे. चौकोनी आकाराच्या या मंदिराचे सर्व बांधकाम हे दगडी आहे. मंदिराच्या वर घुमटाकृती शिखर व त्यावर लहानसा कळस आहे.

आंत्रज येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला उत्सव असतो. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी येथे जत्रा असते व गुढीपाडव्याला त्याची समाप्ती होते. यावेळी येथे नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण केले जाते. यावेळी येथे भजन व कीर्तन असतात. आलेल्या भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप केले जाते. याशिवाय माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज, महाशिवरात्र असे सण व उत्सव साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव येथून १२ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ५० किमी अंतरावर
  • खामगाव व चिखली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
  • संपर्क : हरिदास खंडारे, अध्यक्ष, मो. ७४१०७५६११८

अड़बंगनाथ मंदिर

अंडराज, ता. खामगाव, जी. बुलढाणा

Back To Home