सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वैराटगड किल्ल्याच्या पायथ्याशी व कृष्णा नदीच्या तीरावर, निसर्गसमृद्ध वातावरणातील श्री क्षेत्र आसले येथील भवानी मातेचे प्राचीन मंदिर महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तुळजापूरच्या तुळजा भवानीचे प्रतिरूप असणारे येथील भवानी मातेचे जागृत स्थान भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी देवी, अशी या देवीची ख्याती असल्यामुळे प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी व पौर्णिमेला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते.
पाचवड–वाई मार्गावर पाचवडपासून काही अंतरावर आसले गाव आहे. या गावाच्या मागच्या बाजूला भवानी मातेचे मंदिर असून ‘आसलेची भवानी’ म्हणून ते प्रसिद्ध आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी गावातून नव्याने बांधलेला रस्ता असून तेथून वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात. पूर्वीचा पायरी मार्गही अस्तित्वात आहे. तेथून सुमारे ८० पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाता येते. येथे येणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की क्रमवारीनुसार तुळजापूरची भवानी प्रथम, दुसऱ्या क्रमांकावर आसलेची भवानी व तिसऱ्या क्रमांकावर प्रतापगडावरील भवानी मंदिर आहे. हे मंदिर शिवपूर्वकाळापासून असल्याच्या नोंदी सापडतात. मात्र त्या आधी ते नेमके कधी व कोणी बांधले होते याचा उल्लेख आढळत नाही. स्थानिकांच्या मते ते ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचे आहे.
आसले येथील मंदिराची आख्यायिका अशी की अफझल खानाची स्वारी जेव्हा महाराष्ट्रात धडकली तेव्हा त्याने दहशत माजविण्यासाठी पंढरपूरसह अनेक प्रसिद्ध मंदिरे उद्ध्वस्त केली होती. वाटेत लागणाऱ्या अनेक मंदिरांची तो तोडफोड करीत पुढे येत होता. त्याच्याबरोबर सैनिकांची मोठी फौज होती. आसले येथील भवानी मंदिराजवळ तो आला असता त्याच्या सैनिकांना हे मंदिर दिसत होते; परंतु अफजल खानाला एकट्यालाच मात्र त्या मंदिराच्या जागेवर मशीद दिसत होती. त्याने या मंदिरासमोर आपल्याबरोबर असलेल्या सर्व सैनिकांना नमाज पढायला लावला आणि त्यानंतर अफजल खान वाईला गेला. ज्या दिवशी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट होणार होती, त्याच्या आदल्या रात्री या भवानी मातेने महाराजांना स्वप्नदृष्टांत देऊन आपल्या कार्यात यश येईल, असे सांगितले. त्यामुळे शिवाजी महाराजांना धीर आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आणि त्यात खानाचा वध करण्यात महाराजांना यश आले होते.
गावाबाहेर नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराभोवती तटबंदी असून चारही कोपऱ्यामध्ये बुरूज आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला वाहनतळ आहे. येथेही एक मंदिराचे प्रवेशद्वार असले तरी ते केवळ उत्सवाच्या वेळीच खुले केले जाते. इतरवेळी तटबंदीला वळसा घालून पूर्वीच्या पायरी वाटेजवळ असणाऱ्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश करावा लागतो. १९६४ साली केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. या जीर्णोद्धाराच्या वेळीच तटबंदीचीही दुरुस्ती करून ती सुशोभित व आणखी मजबूत करण्यात आली होती. तटबंदीमध्ये असलेल्या प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत भाविकांचे ऊन व पावसापासून बचावासाठी पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक लावल्यामुळे हा परिसर स्वच्छ व सुंदर भासतो. मुख्य मंदिराच्या समोरील बाजूस दीपमाळा व एक तुळशी वृंदावन आहे. उजवीकडील दीपमाळेवर प्राचीन नंदी, तर डावीकडील दीपमाळेजवळ प्राचीन गणेशाची शेंदूरचर्चित गणेशमूर्ती आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. पूर्वीचे मंदिर हे अंतराळ व गर्भगृह इतकेच होते. जीर्णोद्धाराच्या वेळी मुख्य मंदिराला जोडून नव्याने सभामंडप बांधण्यात आला होता. हा सभामंडप प्रशस्त असून त्यात लाकडी खांबांचा जास्त वापर करण्यात आला आहे. याशिवाय वरील लाकडी खांबांवर जागोजागी पितळेच्या घंटा व झुंबर लावल्यामुळे सभामंडप खुलून दिसतो. अंतराळाच्या म्हणजेच मूळ मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला वाघांच्या प्रतिमा कोरलेल्या असून तेथेच मोठा नगारा आहे. उत्सवाच्या व आरतीच्या वेळी या नगाऱ्याचे वादन होते.
मूळ मंदिर हे हेमाडपंती रचनेचे आहे. अंतराळात दगडी खांब असून तेथील भिंती चांदीच्या पत्र्यावर कलाकुसर करून सजविलेल्या दिसतात. गर्भगृहातील चौथऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण मखरात महिषासुरमर्दिनीच्या रूपातील काळ्या पाषाणातील देवीची सुंदर व सुबक मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती तीन फूट उंचीची आहे. ही मूर्ती व प्रतापगडावरील भवानी मातेची मूर्ती काही अंशी सारखी भासते. भवानी मातेच्या मूर्तीच्या खालील बाजूस शिवलिंग आहे; परंतु या शिवलिंगासमोर नंदी नसून तो मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळेजवळ आहे. या शिवलिंगाजवळ सुमारे पाच फूट उंचीची प्राचीन समई आहे. अशा प्रकारची समई इतरत्र कुठे पाहायला मिळत नाही.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे मोठा उत्सव असतो. यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. चैत्र पौर्णिमेला या देवीची येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या आवारात भाविकांच्या निवासासाठी, तसेच उत्सवातील विधी करण्यासाठी मंदिर समितीतर्फे काही खोल्या बांधलेल्या आहेत.
या मंदिराशिवाय आसले गावाच्या मागे असलेल्या डोंगरावरील वैराटगड हा किल्ला प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर पाचवड–वाई मार्गावर असलेल्या व्याजवाडी येथून आणि पाचवड–मेढा मार्गावरील म्हसवे या गावातून जाता येते. व्याजवाडी रस्त्याने गेल्यास किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत वाहने नेता येतात; तर म्हसवे गावातून जाणारी वाट काहीशी अवघड आहे. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी साधारणतः दीड ते दोन तास लागतात. वैराटगड किल्ल्याचा माथा हा सुमारे १६ ते १७ मीटर उंचीच्या कातळावर आहे.
किल्ल्यावर एक मारुतीचे मंदिर असून मंदिराच्या बाजूलाच आणखी एक मारुतीची मूर्ती आहे. याशिवाय येथे तीन तलाव व चार पाण्याची टाके आहेत. या टाक्यांमधील पाणी आजही येथे पिण्यासाठी वापरले जाते. तलावांपासून काही अंतरावर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. ही दोन मंदिरे सोडल्यास किल्ल्यावर अनेक ठिकाणी पडझड झालेल्या इमारतीचे अवशेष आहेत. या किल्ल्याच्या नावाबाबत आख्यायिका अशी की १२ वर्षांचा वनवास संपल्यानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहायचे होते. त्यावेळी येथे असलेल्या विराट राजाकडे पांडव रूप बदलून राहिले. त्यावेळी या किल्ल्यावर विराट राजाची राजधानी होती आणि या किल्ल्याच्या पायथ्याचा सर्व परिसर ‘विराट नगरी’ म्हणून ओळखला जात होता. या विराटराजावरून या किल्ल्याचे नाव वैराटगड असे पडले. ऐतिहासिक नोंदींनुसार, किल्ल्यावरील तटबंदी वा येथील काही वास्तूंचे बांधकाम शिलाहार घराण्यातील कोल्हापूरच्या दुसऱ्या भोजराजाने ११७८ ते ११९३ च्या सुमारास केलेले आहे.