कोकणातील संगमेश्वर तालुक्यात आरवली येथील ब्राह्मणवाडीत असलेले सूर्यमंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंदिरात वैशाख शुद्ध पंचमी ते सप्तमी असा तीन दिवसांचा वर्धापन दिन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या गावाचे वैशिष्ट्य असे की येथील मूळ ग्रामस्थ जे नोकरी–व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले आहेत, ते सर्वजण या उत्सवासाठी गावात हजर असतात. सर्वांच्या सोयीसाठी संपूर्ण गावाला उत्सवकाळात तीन दिवसांचा सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचे व सायंकाळचे जेवण दिले जाते.
येथील सूर्यनारायणाच्या मूर्तीबाबत असे सांगितले जाते की या मंदिरातील मूळ मूर्ती ही आंबव येथील आदित्यनारायण मंदिरातील आहे. आंबव येथील पोंक्षे यांना तेथील मंदिरात रथावर आरूढ अशी सूर्याची मूर्ती हवी होती. ती तशी न झाल्यामुळे त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ती गावाच्या सीमेवर ठेवली होती. त्याच दरम्यान १८२२ मध्ये ब्रह्मभट नावाचा एक तेलंगी ब्राह्मण या पंचक्रोशीत कोरान्न (कोरडी भिक्षा, न शिजवलेले धान्य) मागत फिरत असे. त्याने आंबवच्या वेशीवर असलेली ही मूर्ती पाहिली आणि या मूर्तीसाठी मंदिर बांधावे, असे त्याला वाटले. त्याने पोंक्षे यांच्या परवानगीने मूर्ती आपल्या ताब्यात घेतली. या मूर्तीसाठी आरवली येथील पाटणकर यांनी जागा दिली आणि एका कौलारू मंदिरात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा ब्रह्मभट कोरान्न मागून जे धान्य आणत असे, त्याची धुंदुरमासात (धनुर्मासात) खिचडी करून प्रसाद म्हणून वाटत असे. सुमारे २०० वर्षांपासून सुरू असलेली ही धनुर्मासातील खिचडीची प्रथा आजतागायत येथे सुरू आहे.
मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डेनंतर आरवली हे गाव आहे. गरम पाण्याचे कुंड आणि सूर्यमंदिरामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात सूर्यनारायणाचे मंदिर आहे. २०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचा १९९० मध्ये जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. सभामंडप व त्याच्या मध्यभागी गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात तीन ते साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील सूर्यमूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे, प्रभावळीच्या खालच्या दोन्ही बाजूला सूर्यपत्नी आहेत. दोन हात असलेल्या या मूर्तीच्या एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात चक्र आहे. मूर्तीच्या मागील भिंतीमध्ये असलेल्या दोन लहान देवळ्यांमध्ये हनुमान व गणपतीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाला सभामंडपातच प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराच्या पूजेची व्यवस्थाही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. मंदिराला स्वतंत्र पुजारी नाही. गावात अंदाजे ४० घरे आहेत. या प्रत्येक घरासाठी वर्षातील १५ दिवस मंदिराच्या पूजेसाठी दिलेले असतात. त्याप्रमाणे येथील दैनंदिन पूजा–अर्चा केली जाते. मंदिराचा वर्धापन दिन उत्सव वैशाख शुद्ध पंचमी, षष्ठी व सप्तमी असा तीन दिवस केला जातो. या तीन दिवसांत सहस्त्रआवर्तने होतात व सौर अभिषेक (सूर्यसुक्त) केला जातो. १८३० साली सुरू झालेल्या या उत्सवाला २०३० मध्ये २०० वर्षे होणार आहेत. कोकणातील इतर गावांप्रमाणेच याही गावातील अनेक रहिवासी नोकरी–व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले आहेत. उत्सवासाठी ते गावात आल्यावर त्यांना तीन–चार दिवसांच्या न्याहरीसाठी सर्व साहित्य घेऊन यावे लागत असे. त्यांची ही अडचण ओळखून देवस्थानतर्फे उत्सवकाळात संपूर्ण गावाला नाश्ता व जेवण मोफत देण्यात येते. याशिवाय आषाढी एकादशीला मंदिरात एक्का असतो, म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत अखंड वीणावादन केले जाते. उत्सवकाळात येथे होणाऱ्या नाटकांची परंपरा १२५ वर्षांपेक्षा जुनी आहे.
या गावाची आणखी एक परंपरा आहे, ते म्हणजे या गावात कुणी विद्वान सत्पुरुष आला तर त्याची प्रत्येक महिन्यात एकेका कुटुंबाकडून एक वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी देशपांडे यांच्या सुनेला चोळी–बांगडीसाठी हे गाव आंदण दिले होते. या गावाशी काही सेलिब्रिटीही जोडले गेले आहेत. गायक प्रथमेश लघाटे हा याच आरवली गावचा, तर गायिका मुग्धा वैशंपायन आणि अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी यांचे हे सासर आहे.