कुसुंबीची काळूबाई

श्री क्षेत्र कुसुंबी, ता. जावळी, जि. सातारा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जावळी खोऱ्यातील कुसुंबी येथील काळूबाई मातेचे पांडवकालीन मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मांढरदेव गडावरील काळूबाई, कुसुंबीची काळूबाई आणि पोलादपूरमधील वाकण येथील काळूबाई या तीनही बहिणी एकत्र आहेत. या तीन बहिणींचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. येथील उत्सव, देवीची ख्याती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यावरून राज्य सरकारनेही या मंदिराचा तीर्थक्षेत्राचादर्जा देऊन गौरव केला आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वेण्णा नदीच्या तीरावर कुसुंबी हे गाव आहे. येथील काळूबाई मंदिर हे पूर्वी अत्यंत साध्या, कौलारू पद्धतीचे होते. १९८७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण धुंदीबाबा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. असे सांगितले जाते की कुसुंबीचे मूळ ग्रामदैवत हे येथील केदारनाथ मंदिर असून केदारनाथांनी राक्षसांचा संहार करण्यासाठी देवीस कुसुंबीत अवतार घेण्यास भाग पाडले होते. राक्षसांबरोबर लढण्यात मांढरदेव गडावरील काळूबाई पोलादपूर येथील काळूबाई यांनीही तिला मदत केली. तेव्हापासून या तीन देवींचे कुसुंबी गावात वास्तव्य आहे

काळूबाईचे मंदिर कुसुंबी गावाच्या मध्यावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात अनेक पूजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंदिर परिसर मोठा असून सर्वत्र फरसबंदी करण्यात आल्यामुळे तो सुंदर स्वच्छ भासतो. देवीच्या मुख्य मंदिरासह येथे शंकराचे प्राचीन हेमाडपंती रचनेचे मंदिर आहे. याशिवाय एक दगडी दीपमाळ मरिआई देवीचे मंदिर आहे. काळूबाईचे मंदिर पुर्वाभिमुख असून मंदिराच्या डाव्या बाजूकडून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्सवकाळात या दर्शनरांगेतूनच भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येते. इतर वेळी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश दिला जातो. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. 

गर्भगृहात कुसुंबी काळूबाई देवीच्या उजव्या बाजूस देवीची थोरली बहीण मांढरदेवी, तर डाव्या बाजूस वाकणची काळूबाई यांच्या मूर्ती आहेत. या मुख्य मूर्तींबरोबरच गर्भगृहात दुर्गादेवी, भैरवनाथ, केदारनाथ, रुद्राई देवी आदी मूर्ती आहेत. काळेश्वरी मातेची मुख्य यात्रा माघ शुक्ल पौर्णिमेला सुरू होते. देवीची ध्वजकाठी उभारून यात्रेस प्रारंभ होतो. यानंतर रुद्राभिषेक, छबिना असे कार्यक्रम असतात. पाच दिवस चालणारी ही यात्रा प्रसिद्ध असून या कालावधीत महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांतूनही लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवाच्या काळातही येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नवरात्रात शेकडो भाविक येथे घटी बसतात. प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार शुक्रवारी येथे भाविकांची गर्दी असते.

पूर्वी यात्रेच्या वेळी या मंदिरात पशुहत्या होत होती; परंतु काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी येथे पशुहत्या बंदीचा निर्णय घेतला. विविध राज्यांतून येथे दर्शनासाठी भाविक येत असल्याने त्यांच्या निवासाची सोय व्हावी, यासाठी काळूबाई मंदिर ट्रस्टतर्फे भक्त निवास मोठ्या सभागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

काळूबाई मंदिरासोबतच कुसुंबी हे गावनाचणीचे गावम्हणून प्रसिद्ध आहे. हे गाव कास पठाराच्या डोंगरपायथ्याशी आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट खडक आहेत. त्यातून वाहून येणाऱ्या पाण्यात पिकांसाठी आवश्यक असलेली मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक इत्यादी खनिजे असतात. त्यातच उतारावर शेती असल्यामुळे पाण्याचा निचराही चांगला होतो. येथील शेतकरी पिकांवर रासायनिक खतांचा वापर करीत नाहीत. गुरे, शेळ्या मेंढ्यांच्या मलमूत्राचा वापर करून नैसर्गिकरित्या जमिनीचा पोत चांगला ठेवला जातो. त्यामुळे येथील नाचणी पिकाचे उच्च प्रतीचे पोषण होते. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेने कुसुंबी गाव दत्तक घेतले आहे. दरवर्षी या गावातून शुद्ध नाचणीपासून बनविलेल्या दर्जेदार उत्पादनांना अमेरिकेतून मोठी मागणी असते. दरवर्षी कुसुंबी गावातून सुमारे १०० टनांहून अधिक नाचणी पिकविली जाते. नाचणीमध्ये असलेल्या गुणसत्वांमुळे असे म्हटले जाते की एक नाचणीची भाकरी ही दहा चपात्यांइतकी पोषक असते.

उपयुक्त माहिती:

  • मेढ्यापासून किमी, तर साताऱ्यापासून २७ किमी अंतरावर
  • मेढा साताऱ्याहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात भक्त निवास आहे, न्याहरीची सोय नाही
Back To Home