यवतेश्वर मंदिर,

यवतेश्वर, ता. सातारा, जि. सातारा

सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या यवतेश्वर डोंगराच्या कुशीत यवतेश्वर हे गाव आहे. समुद्रसपाटीपासून १२३० मीटर उंचीवर असलेले येथील यादवकालीन यवतेश्वर मंदिर हे शंकराचे जागृत स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे भरणारी यात्रा ही या भागातील सर्वांत पहिली यात्रा असते. या यात्रोत्सवात मंदिरातून निघणारी पालखी ही मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाजवळ जाते तेथील मोहोर पालखीत घेऊन परत मंदिरात येते. हे येथील झाड देवआंबा म्हणून प्रसिद्ध आहे.

यवतेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की ७५० ते ८०० वर्षांपूर्वी या परिसरात किडवान नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाला कोडाचा त्रास होता. अनेक उपाय करूनही त्यावर तो लागू पडत नव्हता. एके दिवशी तो भरपूर कळकाची (यवत, बांबू) झाडे असणाऱ्या या डोंगरावर शिकारीसाठी आला. शिकारीनंतर त्याला तहान लागली म्हणून पाण्याचा शोध घेत असताना त्याला येथे पाणी दिसले. तहान भागवून त्या पाण्याने त्याने हात तोंड धुतले. येथील पाण्याचा त्याच्या शरीरावर स्पर्श होताच हात तोंडावरील कोड नाहीसे झाले होते. त्या रात्री महादेवाने दृष्टांत दिला की येथून काही अंतरावर मी आहे. तेथून मला बाहेर काढ माझे मंदिर बांध. त्यानुसार जागेचा शोध घेऊन त्याने तेथे महादेवांचे मंदिर बांधले. तेच हे यवतेश्वर मंदिर!

यवतेश्वर डोंगराच्या वायव्य टोकावर हे मंदिर आहे. यवतेश्वर मंदिर यादवकालीन असून त्याची रचना हेमाडपंती आहे. पूर्वी या भागात यवताची म्हणजेच कळकाची खूप बेटे होती; यावरून किंवा येथील मंदिरामुळे या डोंगरास गावास यवतेश्वर नाव पडले असावे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून मंदिराच्या व्यवस्थेकरिता या गावाचा महसूल नेमून देण्यात आला होता, असा उल्लेख आढळतो. मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता आहे. मंदिराच्या कमानीवजा प्रवेशद्वारातून काही दगडी पायऱ्या उतरल्यावर मंदिर परिसरात प्रवेश होतो. जेथे पायऱ्या संपतात तेथेच उंच प्राचीन दीपमाळ आहे. त्यापुढे संपूर्ण दगडी बांधणीतील मुख्य मंदिराला लागूनच नंदीमंडप आहे. या नंदीमंडपात नंदीच्या दोन मूर्ती आहेत. नंदीमंडपासह सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप अंतराळात असणाऱ्या दगडी स्तंभांवर विशेष कोरीवकाम दिसत नाही. गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर विविध पुष्पे कोरलेली आहेत. या द्वाराच्या उजवीकडे गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात असलेले शिवलिंग हे प्राचीन स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. अखंड काळ्या पाषाणातील या शिवलिंगाच्या समोरील बाजूस माता पार्वतीची मूर्ती आहे.

मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला काळभैरवाचे मंदिर आहे. अखंड काळ्या पाषाणात कोरलेली येथील काळभैरवनाथांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे सांगितले जाते की यवतेश्वर मंदिर बांधून झाल्यावर ही काळभैरवाची मूर्ती काशीवरून आणून येथे प्रतिष्ठापित केली होती. मंदिराच्या पश्चिमेस पाण्याचे तळे असून त्यासदेवाचे तळेअसे म्हटले जाते. याच पाण्याने किडवान राजाचा त्वचारोग बरा झाला, असे सांगितले जाते. दक्षिणेस रामेश्वर मारुती, उत्तरेस घाटाई देवी आणि समोरच्या बाजूला गणपती अशी परिसरात मंदिरे आहेत. उत्तर भारतातील काशी विश्वेश्वराच्या मंदिराप्रमाणे याही मंदिराचे दर्शनसूत्र आहे, त्यामुळे या मंदिराच्या दर्शनाने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.

अश्विन अमावस्येला येथे मोठी यात्रा भरते. यावेळी ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक निघून ती मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या डेरेदार आंब्याच्या झाडाजवळ जाऊन त्या झाडाचे पूजन केले जाते. पूजनानंतर झाडावर चढून आंब्याच्या मोहोराची फांदी तोडून पालखीत ठेवली जाते. तेथून पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे येते. या झाडावरील मोहराला जोपर्यंत आंबे लागत नाहीत तोपर्यंत ही यात्रा सुरू असते. यावेळी संन्याशाना देवाचे दर्शन प्रथम देण्याची पद्धत आहे. त्यानंतर इतर भाविकांना दर्शन घेता येते. याशिवाय कार्तिक शुद्ध प्रतिपदेलाही येथे यात्रा भरते. महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. येथून कन्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वर मेरुलिंग या ठिकाणांचे दर्शन होते.

उपयुक्त माहिती:

  • साताऱ्यापासून १० किमी अंतरावर
  • साताऱ्यातील राजवाडा बस स्थानकातून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय : ८६००१०२२४२
Back To Home