मारुती मंदिर

पिंपळनेर, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा

महाराष्ट्रातील ‘बालाजीनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देऊळगाव राजाजवळील पिंपळनेर येथे एक प्राचीन मारुती मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामींना येथील एका पिंपळवृक्षाखाली हनुमानाची मूर्ती असल्याचा दृष्टांत झाला होता आणि त्यानंतर त्यांनी याच मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. आमना नदीच्या तीरावर सतराव्या शतकापासून विराजमान असलेल्या या मूर्तीला भाविक जागृत दैवत मानतात. त्यामुळे विदर्भ तसेच मराठवाड्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. दर शनिवारी येथे शेकडो भाविकांची मांदियाळी असते. ११ मंगळवार किंवा शनिवारी मनोभावे व नित्यनेमाने या मंदिराची वारी केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.

समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी हनुमान मंदिरांची स्थापना करण्यामागे एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी सामाजिक उद्देश होता. सतराव्या शतकाचा काळ परकीय आक्रमणांनी आणि सामाजिक अवनतीने ग्रासलेला होता. त्यामुळे सामान्य जनता आत्मविश्वास गमावून बसली होती. अशा परिस्थितीत समाजाला मानसिक आणि शारीरिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी समर्थांनी शक्ती आणि भक्तीचा संगम घडवून आणण्याचे ठरवले. हनुमान हे अफाट शक्ती, बुद्धी, चातुर्य आणि श्रीरामाप्रती असलेल्या निस्सीम भक्तीचे प्रतीक मानले जातात. केवळ कोरड्या उपदेशाने समाज बदलणार नाही, तर त्यासाठी तरुणांमध्ये मर्दानी खेळांची आवड आणि बलोपासना निर्माण होणे आवश्यक आहे, याची समर्थांना खात्री होती. म्हणूनच त्यांनी गावोगावी मारुतीची मंदिरे उभारली. ही मंदिरे खऱ्या अर्थाने व्यायामशाळा आणि लोकजागृतीची केंद्रे बनली.

या मंदिरांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना संघटित केले आणि त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. सशक्त शरीर आणि दृढ मन असल्याशिवाय स्वराज्य तसेच स्वधर्माचे रक्षण करणे शक्य नाही, हा विचार त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती हा याच मोहिमेचा मुख्य भाग होता. या कार्यामुळे समाजात एक नवी ऊर्मी निर्माण झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यास एक बळकट आणि शिस्तबद्ध तरुण पिढी उपलब्ध झाली. खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समर्थांनी ही शक्तिपीठे उभी केली होती.

असे सांगितले जाते की समर्थ रामदास स्वामी नेहमी भ्रमण करत असत. या गावात त्यांनी काही दिवस मुक्काम केला होता. एके दिवशी त्यांना येथील एका पिंपळवृक्षाखाली हनुमानाची मूर्ती असल्याचा दृष्टांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना ही मूर्ती आढळली. त्यानंतर त्यांनी या मूर्तीची तेथेच प्रतिष्ठापना केली आणि ते पुढील प्रवासाला निघून गेले. काही काळाने जालना जिल्ह्यातील नाव्हा येथील संत रंगनाथ महाराज यांनी या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला. कालौघात या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार करण्यात आला. १९८५ मध्ये या मंदिराच्या विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.

या मंदिराला छत्रपती संभाजीनगरमधील खुल्ताबाद येथील भद्रा मारुती मंदिराप्रमाणेच महत्त्व आहे. भद्रा मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ न शकणारे अनेक भाविक येथे येतात. पिंपळनेर हे गाव देऊळगाव राजापासून अवघ्या पाच किमी अंतरावर आहे. आमना नदीच्या काठावर वसलेल्या या गावात पूर्वी अनेक पिंपळवृक्ष होते, त्यामुळेच या गावाला पिंपळनेर हे नाव पडल्याचे सांगितले जाते. या मंदिराला मोठे आवार असून त्यास चारही बाजूंनी तटबंदी आहे. परिसरात पिंपळ, उंबर, चाफा यांसारखी अनेक झाडे आहेत. एका पिंपळवृक्षासमोरच हे मंदिर विराजमान आहे. मोठा सभामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचा सभामंडप आणि गर्भगृह यांत सर्वत्र काचेचे मिनाकारी नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहासमोर स्टेनलेस स्टीलचे रेलिंग आहे. गर्भगृहात मध्यभागी हनुमानाची शेंदूरचर्चित, मोठी आणि प्रसन्न मूर्ती आहे. या मूर्तीला चांदीचे डोळे व डोक्यावर मुकुट आहे. मूर्तीजवळ पितळी गदा आहे. या मूर्तीच्या मागील भिंतीवर श्रीरामांची प्रतिमा आहे. हनुमान मंदिराच्या मागील बाजूस देवीचे एक छोटे स्थान आहे. काही वर्षांपूर्वी गावात ‘मानमोडी’ नावाच्या आजाराची साथ आली होती. या साथीत अनेक जण दगावले. ग्रामस्थांनी देवीला साकडे घातल्यानंतर ही साथ गावातून नष्ट झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी येथे देवीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. मारुती मंदिराच्या गर्भगृहावर सुंदर शिखर आहे. परिसरात एक दत्तमंदिरही आहे. या मंदिरात सेवा करणाऱ्या काही पुजाऱ्यांच्या समाधीही येथे आहेत.

नवसाला पावणारा हनुमान अशी येथील पवनसुताची ख्याती असल्यामुळे येथे सदैव भक्तांची रीघ असते. मंगळवारी व शनिवारी शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. अनेक भाविक नवसाचे नारळ मंदिरात बांधतात. हनुमान जयंती हा येथील मुख्य उत्सव असतो. त्यानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहादरम्यान दररोज सकाळी व सायंकाळी भाविकांना महाप्रसाद दिला जातो. अखेरच्या दिवशी जन्मोत्सव झाल्यावर काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होते. मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे येथे वर्षभरात ४८ वेळा महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. श्रावण महिना तसेच अधिक महिन्यामध्ये येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी देऊळगाव राजा येथील बालाजीची यात्रा भरते. त्यावेळी बालाजी सीमोल्लंघनासाठी नदीतीरावर येतात. त्या दिवशीही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. दिवाळी पाडव्यालाही येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • देऊळगाव राजा येथून ३ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८२ किमी अंतरावर
  • देऊळगाव राजा येथून एसटी व खासगी वाहने उपलब्ध
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६३८४८०८०

मारुति मंदिर

पिम्पलनेर, ताल। देउलगांव राजा, जिला. बुलढाणा

Back To Home