महाराष्ट्राच्या संस्कृतीत हनुमानाला गावचा रक्षक आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक गावात त्याचे स्थान अढळ आहे. याच परंपरेचा वारसा जपणारे एक जागृत श्रद्धास्थान बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरनजीक गाडेगाव येथे नळगंगा नदीच्या तीरावर वसले आहे. १८व्या शतकात नळगंगेच्या महापुरात वाहून आलेल्या स्वयंभू मूर्तीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिरात हनुमानासोबतच काशी विश्वेश्वराचेही दर्शन होते. हा मारुती नवसाला पावणारा आहे. तसेच आपल्या दारी आलेल्या कोणत्याही भक्ताला तो रिकाम्या हस्ते परत पाठवत नाही, अशी भाविकांची गाढ श्रद्धा असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत, वाड्यावस्त्यांवर जेथे जेथे वस्ती आहे, तेथे हनुमानाचे मंदिर असते. कारण हनुमान वा मारुती हा गावाचा मुख्य रक्षक आणि शक्तीचा स्रोत मानला जातो. प्राचीन काळापासून गावाची रचना करताना संरक्षणाला महत्त्व दिले जात असे. त्यामुळेच गावाच्या वेशीवर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावर हनुमानाची स्थापना केली जात असे. त्याला वेशीवरचा मारुती किंवा गावाचा कोतवाल मानले जाते. गावाबाहेरील संकटे, रोगराई किंवा वाईट शक्तींनी गावात प्रवेश करू नये, यासाठी हा शक्तिशाली देव पहारेकरी बनून वेशीवर उभा असतो,
अशी ग्रामस्थांची पूर्वापार श्रद्धा आहे. संकटकाळी धावून जाणारा संकटमोचक म्हणूनही भाविक त्याच्याकडे पाहतात. साडेसाती असो किंवा जीवनातील इतर अडचणी, शनिवारी-मंगळवारी शेंदूर आणि तेल वाहून लोक आपले गाऱ्हाणे मारुतीसमोर मांडतात.
गावाच्या संरक्षणासोबतच मारुती हा शक्ती, बुद्धी आणि आरोग्याचा दाता मानला जातो. गावातील तरुण पिढी सुदृढ, निरोगी आणि बलवान असावी, या उद्देशाने मारुती मंदिराच्या जोडीलाच पूर्वी गावात तालीम किंवा आखाडा असायचा. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात बलोपासनेचे महत्त्व रुजवण्यासाठी गावोगावी मारुतीरायाची स्थापना केली. परकीय आक्रमणांच्या काळात समाजात अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ यावे, म्हणून त्यांनी तरुणांना शक्तीची उपासना करण्यास सांगितले.
प्राचीन इतिहास असलेल्या मलकापूर तालुक्यात अनेक प्रसिद्ध व जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकीच एक असलेले हे मंदिर मलकापूरनजीकच्या गाडेगाव येथे नळगंगा नदीच्या किनाऱ्यावर, बोदवड मार्गावर, पवनसूत नगरमध्ये वसलेले आहे.
या परिसराला जुने गाडेगाव म्हणूनही ओळखले जाते. १८व्या शतकात नळगंगा नदीला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यात तीन मूर्ती वाहून आल्या होत्या. त्यापैकी हनुमानाच्या मूर्तीची येथे विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गावातील राजाराम ताराचंद चौहान यांच्या शेतात हे मंदिर उभारण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी येथे काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. या मंदिरासमोर दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखान्याची रचना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस असलेल्या छोट्या चौथऱ्यावरील देवळीवजा मंदिरात शेगावच्या गजानन महाराजांची मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात वटवृक्षासह काही झाडे आहेत. मंदिराच्या आवारभिंतीजवळ भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. मंदिरासमोर अर्धखुल्या स्वरूपाचा मंडप आहे. त्यापुढे उंच अधिष्ठानावर मंदिर आहे. सभामंडप आणि मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंडपातून सात पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो.
सभामंडपाला महिरपी आकाराचे प्रवेशद्वार आहे. याच सभामंडपात एक प्राचीन वृक्ष आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारातही हा वृक्ष तसाच ठेवून बाजूने बांधकाम करण्यात आले आहे. या वृक्षाजवळ असलेल्या छोटेखानी गर्भगृहात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीवर डोळे कोरले आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला गदा आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या झाडाला लागून ही मूर्ती होती. त्यानंतर मंदिर बांधल्यावर या मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिरातील अन्य एका गर्भगृहात काशी विश्वेश्वराची पिंडी आहे. काळ्या संगमरवरातील या पिंडीवर लंबगोलाकार शिवलिंग आहे. शिवलिंगासमोरील छोट्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या गर्भगृहावर उंच, सुंदर शिखर आहे.
येथील हनुमानाची मूर्ती जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे सकाळी व सायंकाळी हनुमानाची आरती करण्यात येते. या वेळी गावातील अनेक भाविक उपस्थित असतात. मंगळवारी व शनिवारी भाविक येथील पवनसुतावर तेलाचा अभिषेक करून रुईच्या पानांचा हार अर्पण करतात. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव असतो. या दिवशी पहाटेपासून या हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. या उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.