मुरूड तालुक्यातील नांदगाव हे ऐतिहासिकदृष्ट्या ‘नंदग्राम’ किंवा ‘नंदीग्राम’ म्हणून ओळखले जाते. अलिबाग-मुरूड मार्गावर असलेल्या या गावाची ओळख येथील जागृत सिद्धिविनायक मंदिरामुळे सर्वदूर आहे. रिद्धी आणि सिद्धी या दोन शक्तींसह विराजमान असलेले हे दैवत भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि पूर्णत्व देणारे मानले जाते. विशेष म्हणजे, अष्टविनायक यात्रेची सांगता या मंदिराच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानली जाते, अशी गणेशभक्तांची ठाम श्रद्धा आहे. म्हणूनच अष्टविनायकांचे दर्शन पूर्ण केल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येतात.
मंदिराची आख्यायिका अशी की काही शतकांपूर्वी हे मंदिर व गणेशमूर्ती सध्याच्या जागी नव्हती. जवळच असलेल्या कुंभारवाड्यातील केतकीच्या बनात सिद्धिविनायकाचे स्थान होते. तेथे राहणारे केशव दैवज्ञ नावाचे विद्वान या गणेशाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी दर्शनाचा नियम कधीही मोडला नव्हता. त्यांच्या वाटेत एक खाडी होती. एकदा मोठी भरती आल्यामुळे आणि समुद्राला उधाण असल्यामुळे त्यांना खाडी ओलांडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्या दिवशी त्यांना गणेशाचे दर्शन घेता आले नाही. नित्य नियम मोडल्यामुळे ते अस्वस्थ झाले. त्यावेळी गणेशाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की, मी तुझ्याजवळ यायला तयार आहे, तुला सोयीस्कर अशा ठिकाणी मला घेऊन जा. दुसऱ्याच दिवशी खाडीचे पाणी कमी झाले आणि त्यांनी गणपतीला आपल्याजवळ आणले. आज त्याच जागी हे मंदिर उभे आहे.
गणेशभक्त हीच केशव दैवज्ञ यांची एकमेव ओळख नव्हती, तर ते खगोलशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. सिद्धिविनायक गणपती हे त्यांच्या घराण्याचे आराध्य दैवत होते. गणपतीवरील श्रद्धेतूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव गणेश ठेवले. सोळाव्या शतकातील प्रसिद्ध पंचांगकर्ते व ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ हेदेखील थोर गणेशभक्त होते. त्यांनीच ‘ग्रहलाघव’ या महत्त्वाच्या ग्रंथाची रचना केली. त्यातील अनेक सूत्रे आजही अचूक मानली जातात. त्या ग्रंथामध्येही नांदगावचा उल्लेख ‘नंदीग्राम’ असा येतो.
नांदगावमध्ये प्रवेश करताच सर्वत्र नारळी-पोफळीच्या बागा दिसतात. सिद्धिविनायकाप्रमाणेच निसर्गाचीही या गावावर मोठी कृपा असल्याचे जाणवते. ऐतिहासिक काळात नांदगाव हे सिद्दीच्या राजवटीत या किनाऱ्यावरील प्रमुख व्यापारी बंदर होते, मात्र आज ते जागृत सिद्धिविनायक मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर असून, याची निर्मिती इ.स. ११३४ मध्ये झाल्याचे सांगितले जाते. १९६३ ते १९६६ या काळात मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिरासमोर मोठे प्रांगण असून तेथून सभामंडपात प्रवेश होतो. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. येथील सभामंडप प्रशस्त आहे. सभामंडपात एक पितळेची घंटा असून तिच्यावर १९१२ हे साल व पालजी फकीर नावाच्या भाविकाने ती अर्पण केल्याची नोंद आहे. येथे एका बाजूला हनुमानाची व दुसऱ्या बाजूला अखंड दगडात कोरलेली काळभैरवाची मूर्ती आहे. सभामंडपाच्या छतावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर दिसते.
गर्भगृहाच्या रचनेत प्रदक्षिणा मार्ग वेगळा ठेवण्यात आला आहे. प्रवेशद्वाराजवळ चांदीने मढवलेले मूषकराज आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी असलेल्या वज्रपीठावर सुमारे दोन फूट उंचीची, उजव्या सोंडेची स्वयंभू गणेशमूर्ती आहे. मांडी घातलेल्या या मूर्तीचे हात काहीसे अस्पष्ट आहेत. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट असून पाठशिळेवर चांदीच्या पत्र्याची सजावट आहे. त्यामध्ये सुंदर प्रभावळ व मूर्तीच्या दोन्ही बाजूला सेविका कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या कपाळावर आणि बेंबीमध्ये हिरे बसवलेले आहेत. मुख्य मूर्तीच्या समोर चांदीची उत्सवमूर्ती आहे. याशिवाय मंदिरात गणपतीची एक संगमरवरी मूर्ती असून, ती जंजिऱ्याच्या तटालगत सापडल्याचे सांगितले जाते.
सभामंडपाच्या बाहेरून मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. येथून मंदिराचे नक्षीकाम असलेले शिखर जवळून पाहता येते. हे शिखर ३० फूट उंचीचे आहे. त्यावर आठ दिशांचे पालन करणाऱ्या अष्टदिक्पालांच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. नवसाला पावणाऱ्या या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येत असतात.
मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात, पण माघ शुद्ध चतुर्थीला होणारा माघी गणेश जयंतीचा उत्सव हा सर्वात मोठा सोहळा असतो. हा उत्सव पाच ते सात दिवस चालतो आणि या काळात येथे मोठी जत्रा भरते. मुख्य दिवशी गणपतीचा विशेष अभिषेक आणि अलंकार पूजा केली जाते. दुपारी निघणाऱ्या पालखी सोहळ्यात परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीलाही येथे विशेष महापूजा व भजनाचे कार्यक्रम होतात. माघ महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनीही या मंदिराला भेट दिल्याची नोंद आहे. दररोज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी उघडे असते.