वाघमाता संस्थान

परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती

अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी परतवाडा शहरात वाघमाता देवीचे मंदिर आहे. वाघमाता ही या परिसरातील भाविकांची ग्रामदेवता मानली जाते. निसर्गपूजक लोकसंस्कृती आणि शाक्त परंपरेचा मिलाफ दर्शवणारे हे स्वयंभू शक्तिपीठ विदर्भ व लगतच्या मध्य प्रदेशात नवसाला पावणारे जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. माघ महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव आणि शारदीय नवरात्रोत्सवात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमते.

परतवाडा आणि अचलपूर ही जुळी शहरे ऐतिहासिक वारशाने संपन्न आहेत. अचलपूरचे प्राचीन व मध्ययुगीन नाव ‘एलिचपूर’ असे होते. ‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’मधील नोंदींनुसार, राजा इल याने या शहराची स्थापना केली आणि त्याच्या नावावरून या नगरास ‘एलिचपूर’ हे नाव पडले. मध्ययुगीन काळात ‘एलिचपूर’ ही वऱ्हाडची (बेरार) राजधानी राहिली. खिलजी, बहमनी, इमादशाही, मुघल आणि नंतर निजामांच्या कालखंडात या शहराचा राजकीय प्रभाव कायम राहिला. सन १८५३ च्या करारानंतर ब्रिटिश काळात या शहरालगत लष्करी छावणी म्हणजेच ‘कॅन्टोन्मेंट’ आणि ‘सिव्हिल स्टेशन’ स्थापन झाले. त्यास परतवाडा म्हणून ओळखले जाऊ लागले. चंद्रभागा व सपन नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या या जुळ्या शहरांचा इतिहास किमान हजार वर्षांचा मानला जातो.

परतवाडा हा परिसर घनदाट मेळघाट अरण्याच्या प्रवेशद्वारावर वसलेला आहे. मेळघाटात अनादी काळापासून वास्तव्य करणाऱ्या कोरकू, गोंड, भारिया, भत्रा, डांगी, कोळ आणि कातकरी या वनवासी जमातींमध्ये हिंस्र श्वापदांपासून रक्षणासाठी व्याघ्रपूजा महत्त्वाची मानली जाते. या जमातींमध्ये दिवाळीतील वसुबारस हा दिवस ‘वाघबारस’ म्हणून साजरा होतो. स्थानिक मौखिक परंपरेनुसार, प्राचीन काळी हा संपूर्ण भाग घनदाट जंगल असताना येथील मूळ आदिवासी जमाती या स्वयंभू शिळेची व्याघ्रदेवता म्हणून पूजा करत असत. कालांतराने मानवी वस्ती वाढत गेली आणि या लोकदैवताचे रूपांतर शाक्त संप्रदायातील ‘वाघमाता’ या मातृत्वस्वरूपात झाले. देवीचे हे मूळ स्वरूप ‘मार्कंडेय पुराणा’तील दुर्गेच्या व्याघ्रारूढ रूपाशी तसेच स्थानिक लोकपरंपरेतील वाघाई देवतेशी साधर्म्य सांगते.

वाघमाता मंदिराच्या मूळ स्थापनेचा कोणताही लिखित शिलालेख उपलब्ध नसला, तरी हे स्वयंभू स्थान अनेक शतकांपासून पूजले जात असल्याचे पुरावे मिळतात. स्थानिक परंपरेनुसार तेराव्या शतकातील यादव काळ आणि त्यानंतरच्या काळातही या देवीची नित्य पूजा सुरू होती. सुरुवातीला एका साध्या चौथऱ्यावर उघड्यावर असलेल्या या मूर्तीभोवती भाविकांनी एक लहान घुमटी उभारली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मंदिराचा विस्तार होत गेला. मंदिराच्या सध्याच्या संरचनेचा जीर्णोद्धार सन २०१५ मध्ये पूर्ण झाला. या जीर्णोद्धारात जुन्या बांधकामाच्या जागी राजस्थानी वाळूच्या पाषाणाचा (सँडस्टोन) वापर करून पारंपरिक भारतीय नागर मंदिर स्थापत्यशैलीत नवीन मंदिर उभारण्यात आले.

मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिराभोवती तटबंदी उभारलेली आहे. तटबंदीमध्ये समोरील आणि मागील बाजूस प्रत्येकी एक अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यांना ‘वाघाई दरवाजा’ असे नाव दिले आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणाच्या एका बाजूस विविध वृक्षांनी बहरलेले उद्यान व भाविकांना बसण्यासाठी बाकडी आहेत. प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम, सभा आणि विवाह सोहळ्यांसाठी स्वतंत्र सभागृह बांधलेले आहे. मंदिराच्या मागील बाजूस पृथ्वीचा भार उचलून धरलेल्या मानवाचे उठावशिल्प आहे. आवारात एका पारावर महाकाय पिंपळवृक्ष उभा आहे. या पारावर धातूचे त्रिशूळ बसवले आहे. वृक्षाच्या शेजारी एक गोशाळा चालवली जाते. खुल्या मैदानातील रंगमंचाच्या पार्श्वभिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरलेले दिसते. वाघमाता मंदिराच्या बरोबर समोर पूर्वाभिमुख महादेव मंदिर आहे. या शिवमंदिराची रचना अर्धखुला सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपातील चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. या मंडपातून पुढे षटकोनी आकाराचे गर्भगृह लागते. शिवमंदिराच्या गर्भगृहावर वर निमुळते होत गेलेले गोलाकार पाषाणी शिखर आहे.

वाघमाता मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. प्रांगणातून तीन पायऱ्या चढून उंचावर असलेल्या बाह्य मंडपात प्रवेश होतो. हा मंडप चारही बाजूंनी खुला आहे. त्यावर लोखंडी स्तंभांचा आधार असलेले पत्र्याचे छप्पर आहे. या मंडपाच्या मध्यभागी असलेल्या वज्रपीठावर श्रीगणेशाची मूर्ती आहे. सभामंडपाच्या पुढे उंचावर अंतराळ आहे. अंतराळ आणि गर्भगृहाचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी पाषाणात केलेले आहे. अंतराळात येण्यासाठी तीन पायऱ्यांची रचना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक असे दोन कोरीव पाषाणस्तंभ उभे आहेत. या स्तंभांवर कणी आणि वरच्या भागात हस्त कोरलेले आहेत. या हस्तांवर आडव्या पाषाणी तुळया टेकवलेल्या आहेत. त्यावर अंतराळाचे छत आधारलेले आहे. या अंतराळाच्या छतावर चक्राकार कमळाची नक्षी कोरलेली आहे.

अंतराळातून गर्भगृहाचे राजस्थानी पाषाणातील अलंकृत प्रवेशद्वार दृष्टीस पडते. या प्रवेशद्वाराची चौकट त्रिशाखीय पद्धतीची आहे. यात पर्णशाखा, पुष्पशाखा आणि मध्यभागी स्तंभशाखा कोरलेली आहे. द्वारशाखेच्या तळाशी दोन्ही बाजूंना शस्त्रधारी द्वारपालांची शिल्पे आहेत. ललाटबिंबाच्या केंद्रस्थानी गणपतीची मूर्ती आहे. उंबरठ्यापाशी तीन चंद्रशिळा आहेत. त्यावर पुष्पनक्षी आणि कीर्तिमुखे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराला कोरीव नक्षीकाम केलेल्या लाकडी झडपा बसवलेल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील चार कोपऱ्यांत चार स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील भिंतींवर पर्णथर आणि पुष्पथर अशा आडव्या पट्ट्यांचे नक्षीकाम आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. बाह्यभिंतींच्या तीनही बाजूंना देवकोष्टके आहेत.

गर्भगृहाच्या मध्यभागी एका वेदीवर वाघमाता देवीची स्वयंभू पाषाणमूर्ती आहे. या मूर्तीची घडण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात देवीचे मुख मानवी स्त्रीचे, तर उर्वरित शरीर बसलेल्या वाघाचे आहे. हे दुर्मीळ नर-व्याघ्र स्वरूप लोकसंस्कृतीतील व्याघ्रशक्ती आणि शाक्त परंपरेतील मातृशक्ती यांचे एकत्रीकरण मानले जाते. मूर्तीला जरीकाठी वस्त्रे आणि पारंपरिक सौभाग्य अलंकारांनी शृंगारले जाते. वज्रपीठावर देवीच्या दोन्ही बाजूंना दोन लहान व्याघ्रशिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहाच्या छतावर नागर शैलीच्या उपप्रकारातील भूमिज स्थापत्यपद्धतीचे पंचरथ शैलीचे शिखर उभारलेले आहे. शिखराच्या दर्शनी भागावर पुढे आलेली शुकनासिका आहे. अन्य तीन दिशांच्या दर्शनी भागांवर देवकोष्टके आहेत. शिखराच्या शीर्षभागी गोलाकार आमलक, त्यावर स्तूपिका आणि सर्वोच्च स्थानी कळस आहे.

दररोज पहाटे सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते. दररोज सकाळी सात व सायंकाळी साडेसात वाजता देवीची आरती होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आरतीच्या वेळेत बदल होतो. आवारातील हनुमान मंदिरात सकाळी ७.१० व सायंकाळी ७.१० वाजता आरती होते. दर मंगळवारी आणि शुक्रवारी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी उसळते. पौर्णिमा, अमावास्या आणि दुर्गाष्टमी या तिथींना देवीची विशेष महापूजा केली जाते. मंदिराचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी माघ वद्य पंचमी ते अष्टमी या कालावधीत चार दिवस पार पडतो. या उत्सवात अमरावती जिल्ह्यासह विदर्भ व सीमावर्ती भागातून हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येतात. भाविक देवीला साडी-चोळी व खणानारळाने ओटी अर्पण करतात. या जत्रोत्सवात देवीला गव्हाच्या जाड भाकरीचा निखाऱ्यांवर भाजून केलेला पारंपरिक ‘रोडगा’ आणि वरण-तुपाचा नैवेद्य दाखवण्याची विशेष प्रथा आहे. जत्रोत्सवात सलग चार दिवस भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन होते. याशिवाय शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन आणि नवमीला होमहवन पार पडते.

उपयुक्त माहिती

  • अचलपूर रेल्वे स्थानकापासून ३ किमी आणि परतवाडा बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • अमरावती शहरापासून ५० किमी अंतरावर
  • अमरावती अचलपूर आणि चिखलदरा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परतवाडा शहरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : अरुण दीक्षित, अध्यक्ष, मो. ८२७५१८४३७१, पुरणलाल किल्लेदार, मो. उपाध्यक्ष ९३०९७११६५४
Back To Home