नाग घाट

पैठण शहर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर


पैठण हे अतिप्राचीन शहर असून या नगरीत प्राचीन काळी नागांची वस्ती होती. नागांची वस्ती याचा अर्थ नाग हे देवक असलेल्या वा नागवंशीय लोकांची वस्ती असा होतो. याबाबतचे उल्लेख आजही अनेक लोकगीतांमधून आढळतात. एका लोकगीतामध्ये असे म्हटले आहे, ‘पैठण वस्ती अजब, दिसती वस्ती नागाची। कैक वर्षांची वस्ती होती शालू शंखाची, राजा शालिवाहनाची।।याचेच अस्तित्व आज पैठण येथे असलेल्या नाग घाटावरून येते.

पालथी नगरी म्हणतात त्या भागातून गोदावरी नदीकडे जाताना हा नाग घाट लागतो. येथील सातवाहनकालीन प्राचीन टेकड्यांवर पैठणची जुनी वसाहत होती. तिला कालौघात पालथी नगरी असे नाव पडले. शनिमंदिर ते नाग घाट या दरम्यानच्या सुमारे ४० एकर क्षेत्रावरील या परिसरास पालथी नगरी म्हणण्याचे कारण असे की तेथील जुनी घरे रस्त्याच्या खाली असून आजचे रस्ते या घरांवरून जातात. येथे १९३७ साली करण्यात आलेल्या उत्खननात सातवाहनकालीन प्राचीन घरांचे अवशेष सापडले होते. येथून जवळच हा नाग घाट आहे. याच घाटावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविण्याचा चमत्कार घडविला होता. या गोष्टीमुळे हा घाट पैठणमध्ये येणाऱ्या भाविक पर्यटकांच्या आकर्षणाचे एक केंद्र बनला आहे. औरंगाबाद गॅझेटियरनुसार, रघुनाथराव पेशवे यांचे पुत्र आनंद राव यांनी .. १७३४ मध्ये येथील प्राचीन घाटाचा जीर्णोद्धार केला होता.

सातवाहनकालापासून अस्तित्वात असलेल्या तसेच महानुभाव वाङ्मयात याची नागडोह म्हणून नोंद आहे. या नाग घाट परिसराचे आता सुशोभीकरण करण्यात आले आहे. रस्त्यावरून खाली उतारावर बांधलेल्या अत्यंत रुंद अशा पायऱ्या उतरल्यावर नाग घाटाच्या परिसरात प्रवेश होतो. येथेच एका बाजूस लहानसे पावन हनुमान मंदिर आहे. मंदिरात एका दगडी चबुतऱ्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूस शालिवाहनाचा पिता शेषनाग याचे छोटेसे देवळीसदृश मंदिर आहे. या मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेल्या नागाची फणा काढलेली मूर्ती आहे. याबाबतप्रबंध चिंतामणीया ग्रंथात आलेल्या उल्लेखानुसार, पैठण नगरीमध्ये एक ब्राह्मणकन्या आपल्या दोन बंधूंसह राहत होती. ती लावण्यवती होती. एकदा पाणी आणण्यासाठी ती नागडोहावर गेली असता शेषराजाने तिला पाहिले. तो तिच्या सौंदर्यावर लुब्ध झाला. त्याने तत्काळ तिचे पाणिग्रहण केले. लवकरच ती गर्भवती झाली. तेव्हा तिच्या वर्तनाचा तिच्या भावांना राग येऊन ते तिला तेथेच सोडून निघून गेले. नंतर ती पैठण येथील कुंभारवाड्यात राहू लागली. तेथे तिने शालिवाहनास जन्म दिला.

या शेषनाग मंदिरापासून खाली घाटाकडे जाताना मार्गावर दोन बाजूला नंदीच्या पाषाणमूर्ती बसवण्यात आल्या आहेत. पुढे येताच दगडी आवारभिंतीत बसवलेले नाग घाटाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. एखाद्या मोठ्या वाड्याचे प्रवेशद्वार असावे, तसे हे द्वार असून त्यास भक्कम लाकडी चौकटही आहे. वरच्या बाजूस नागदेवतेची मोठी प्रतिमा चितारण्यात आली आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर जाताच समोर मोठी मोकळी जागा दिसते. त्यास रेलिंग लावण्यात आले आहे. येथून गोदावरी नदीचे दर्शन होते.

प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने घाटाखाली नदीच्या दिशेने उतरण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी एका बाजूस नागमंदिरातील नागाच्या मूर्तीची छोटीशी प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे. तेथून खाली उतरून आल्यानंतर बाजूला थोड्या उंचीवर सिद्ध वरुण गणपती मंदिर आहे. हे मंदिर पेशव्यांच्या काळात उभारण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. या मंदिराची रचना चौकोनी असून त्यास शिखर नाही. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर गरुड हनुमानाची चित्रे रंगविण्यात आलेली आहेत. आत मोठ्या संगमरवरी महिरपी देव्हाऱ्यात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंदिराच्या समोरच्या बाजूस रेड्याची छोटी दगडी मूर्ती आहे. ही मूर्ती गोदाभिमुख असून मूर्तीवर छोटासा मंडप बांधलेला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील चमत्कारकथेनुसार, विठ्ठलपंत रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांना मुंजीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून सनातन्यांनी सांगितलेले देहान्त प्रायश्चित्त घेतले होते. त्यानंतरही आळंदीतील सनातन्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना शुद्धिपत्र देण्यास नकार दिला. त्यांनी पैठणला जावे तेथील ब्रह्मवृंदाकडून निकाल आणावा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते मजल दरमजल करीत पैठणला आले. येथील घाटावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ते उतरले. त्यानंतर त्यांनी येथील ब्रह्मवृंदाकडे जाऊन शुद्धिपत्र देण्याची विनंती केली. त्याचा निर्णय घेण्यासाठी नाग घाटावर ब्रह्मसभा बोलावण्यात आली होती. ब्राह्मण पंडित तेथे शास्त्रार्थ करीत होते. त्याच वेळी त्या घाटाच्या बाजूने एक व्यक्ती त्याच्या रेड्याला घेऊन चालला होता. तो रेडा हलत नसल्याने तो त्याला जोरजोराने मारत होता. ते पाहून संत ज्ञानेश्वरांचे हृदय कळवळले. त्यांनी त्या व्यक्तीस रेड्यास मारू नको, असे सांगितले. त्यावर सनातनी मंडळी चिडली आम्ही येथे चर्चा करीत असताना या पोराला रेडा महत्त्वाचा वाटतो, असे म्हणू लागली. त्यावर ज्ञानदेव म्हणाले की परमेश्वर सर्वांभूती आहे. त्या रेड्याच्या आणि आपल्या देहातही एकच परमात्मा वास करीत आहे. हे ऐकून सनातन्यांनी ज्ञानदेवांना धारेवर धरले. आमच्या रेड्याच्या शरीरात एकच परमात्मा वास करीत असेल तर आम्ही ज्या प्रमाणे वेद म्हणतो, त्या प्रमाणे तो रेडाही वेद म्हणू शकेल का? असा प्रश्न केला. तेव्हा ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या जवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्यांचा दिव्य स्पर्श होताच त्या रेड्याच्या तोंडातून वेदांतील ऋचा बाहेर पडू लागल्या. हा चमत्कार .. १२८७ च्या माघ शुद्ध वसंत पंचमीस शुक्रवारी घडला. नाग घाटावर घडलेल्या या घटनेच्या स्मरणार्थ नंतर तेथे ही रेड्याची मूर्ती बसवण्यात आली. येथेच भिंतीवर तो प्रसंगही चितारण्यात आला आहे.

रेड्याची मूर्ती सिद्ध वरुण गणेश मंदिर येथून आणखी खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूस उत्तराभिमुख नागेश्वर शिवालय आहे. या मंदिराचा आकार आयताकृती आहे ते दगडी चौथऱ्यावर दगडातच बांधलेले आहे. या मंदिरावरही शिखर नसून याचे छत सपाट आहे. मंदिराच्या गर्भगृहात संगमरवरी फरशांमध्ये बसवलेली दगडी शिवपिंडी आहे.

नाग घाटावरून गोदावरी नदीकडे जाताना एक प्रचंड आकाराची शिळेची पायरी आहे. या पायरीवर सप्तमातृका कोरण्यात आल्या आहेत. ही पायरी यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. या घाटाजवळच इंद्रेश्वर महादेव मंदिरही आहे. इंद्रेश्वर महादेव मंदिराची रचना चौकोनी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भालदारचोपदारांच्या प्रतिमा रंगवण्यात आल्या आहेत. तेथून प्रवेश करताच आत ओवरीसारखी रचना दिसते. तीन पायऱ्या चढून ओवरीत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीत जाळीदार खिडकी बसवण्यात आली आहे. येथून आतील शिवलिंगाचे दर्शन होते. तेथून डावीकडे असलेल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर एक छोटीसी खोली लागते. या खोलीस अत्यंत छोटा दरवाजा आहे. येथून खाली वाकूनच गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गर्भगृह जमिनीपासून खालच्या पातळीवर आहे. येथे असलेल्या शिवपिंडीवर पितळी मुखवटा त्यासमोर नंदीची लहानशी मूर्ती आहे. हे मंदिर मध्ययुगीन काळातील असल्याचे सांगितले जाते.

पैठण येथील हा नाग घाट वारकरी नाथपंथीयांचे श्रद्धास्थान आहे. येथे नागपंचमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी या परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. नाथषष्ठीला पैठणमध्ये येणाऱ्या अनेक दिंड्यांचे हे विसावा केंद्रही आहे.

उपयुक्त माहिती:

  • पैठण बसस्थानकापासून . किमी
  • तर छत्रपती संभाजीनगरपासून ५१ किमी अंतरावर
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
Back To Home