बारा ज्योतिर्लिंग शिवालय / विश्वकर्मा मंदिर

वेरूळ, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे देशातील सर्वाधिक उंचीचे शिवलिंग आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे म्हणजे बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरापासून काही अंतरावर विश्वकर्मा मंदिराच्या प्रांगणात हे शिवपिंडीच्या आकाराचे बारा ज्योतिर्लिंग शिवालय (मंदिर) आहे. या मंदिरावर ६० फूट उंचीची शिवलिंगाची प्रतिकृती असून येथील गर्भगृहात एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. या मंदिराचे काम तब्बल २३ वर्षे सुरू होते. मार्च २०२२ रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी तेथील कैलास मंदिर, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, लक्षविनायक मंदिर, संत जनार्दन स्वामी आश्रम आदी प्रसिद्ध तीर्थस्थळे असलेल्या वेरूळच्या लौकिकात या बारा ज्योतिर्लिंग शिवालयामुळे आणखी भर पडली आहे. वेरूळहून कन्नडकडे जाणाऱ्या मार्गावर हे मंदिर आहे. एकाच मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडावे, या हेतूने श्री विश्वकर्मा तीर्थधामचे महेंद्रबापू यांच्या पुढाकाराने या मंदिराची उभारणी झालेली आहे. १९९९ मध्ये हे मंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र काही कारणाने ते काम बंद पडले होते. मंदिर उभारणीच्या कामात अडचणी येत असल्याने महेंद्रबापू यांनी मौनव्रत धारण केले होते. त्यानंतर सर्व अडचणींवर मात करत या मंदिराची उभारणी झाली. २०२२ मध्ये मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी पाच दिवस येथे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा यज्ञ तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

या मंदिराचा परिसर १०८ फूट लांबी १०९ फूट रुंदीचा असून मंदिरावरील शिवलिंगाची जमिनीपासून उंची ६० फूट, तर छतापासूनची उंची ४० फूट आहे. शिवपिंडीची शाळुंका ३८ फूट रुंद आहे. पावसाळ्यात या पिंडीवर पडणारे सर्व पाणी हे या भव्य शाळुंकेवरून खाली पडत असते. या मंदिराचे स्वरूप सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपाला सर्व बाजूंनी कमानी आहेत. गर्भगृहासमोर नंदीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहात पाच पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात मध्यभागी सोमेश्वराची पिंडी आहे. त्यामागे अर्धवर्तुळाकार आकाराच्या जागेत प्रथम गणेशमूर्ती आहे. त्यानंतर मल्लिकार्जुनापासून रामेश्वरपर्यंत बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत. उज्जैन येथून या प्रतिकृती बनवून आणल्या आहेत. एकाच वेळी १२ पिंडींना प्रदक्षिणा घालण्यासाठी येथे विशेष मार्गही आहे. या शिवपिंडींच्या मधोमध पार्वतीची मूर्ती आहे. जवळच मारुती तसेच शारदा माता यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर शनिदेवाची मूर्ती आहे. या मंदिरात भाविकांना अभिषेक पूजाआरती करता येते. (संपर्क : बारा ज्योतिर्लिंग शिवालय, मो. ९३७०४११८००

या मंदिरापासून काही पावलांवर निर्माण आणि सृजनाची देवता असलेल्या श्री विश्वकर्मांचे भव्य मंदिर आहे. जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवर असलेल्या या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. १० फेब्रुवारी २००० रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर येथे विश्वकर्मांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या मंदिराचा परिसर तीन एकराचा आहे. हे मंदिर देशातील विश्वकर्मांचे सर्वांत उंच मोठे मंदिर असल्याचे सांगितले जाते. १०८ फूट लांब ८६ फूट रुंदी असलेल्या या मंदिराची उंची १०८ फूट इतकी आहे. मंदिराच्या मागे भोजनशाळा धर्मशाळा आहे.

खुला सभामंडप आणि गर्भगृह असे या संगमरवरी मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातील खांबांच्या कमानींवर आकर्षक कलाकुसर आहे. सभामंडपावर मोठा घुमट आहे. सभामंडपात एक यज्ञकुंडही आहे. गर्भगृहाबाहेर दोन्ही बाजूंना द्वारपालांच्या मूर्ती असून त्याजवळील भिंतींवरील देवळ्यांमध्ये गणेश, राधाकृष्ण, हनुमान, महिषासुरमर्दिनी, श्रीरामपंचायतन या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात सोनेरी मुलामा दिलेल्या, आकर्षक नक्षीकाम असलेल्या मखरात विश्वकर्मांची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना काही देवतांच्या मूर्ती आहेत.

उपयुक्त माहिती:

  • घृष्णेश्वर मंदिर कैलास मंदिरापासून पायी दहा मिनिटांवर
  • खुलताबादपासून किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ३२ किमी अंतरावर
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : विश्वकर्मा मंदिर, मो. ९४२२३९४४९८
Back To Home