खंडोबा मंदिर

सातारा, ता. छत्रपती संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या बारा स्थानांपैकी आठवे स्थान छत्रपती संभाजीनगर नजीकच्या सातारा गावातील डोंगराच्या पायथ्याशी आहे. नवसाला पावणारा देव, अशी ख्याती असलेल्या येथील खंडेरायाच्या मंदिरात येऊन हजारो नवदाम्पत्य देवाचा जागरणगोंधळ घालत असतात. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला (चंपाषष्ठी) येथे भरणाऱ्या यात्रेला हजारोंच्या संख्येने येणारे भाविकयेळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा खोबरं उधळत खंडोबाच्या चरणी लीन होतात.

या मंदिराची आख्यायिका अशी की येथील खंडोबाचे वास्तव्य पूर्वी येथून काही अंतरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी होते. त्या वेळी येथील जहागीरदार नारायण दीक्षित नित्यनेमाने डोंगरावर जाऊन खंडोबाची पूजाअर्चा करत. त्यासाठी त्यांना रोज दोन किमी अंतर चढावे तसेच उतरावे लागत असे. सुमारे ४० वर्षे त्यांनी हा नित्यक्रम पाळला; परंतु वयोमानानुसार त्यांना डोंगर चढणे उतरणे शक्य होत नसे. एके दिवशी ते डोंगरावर खंडोबाचे दर्शन घेऊन घरी परतत होते. त्यावेळी खंडोबा त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि म्हणाला की वयोमानामुळे तू थकला आहेस, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न असून तू म्हणशील तेथे मी वास्तव्य करण्यास तयार आहे. त्यावर दीक्षित यांनी खंडोबाला आपल्या घरीच वास्तव्य करण्यास सुचवले. खंडोबाने त्यांची मागणी मान्य करताना सांगितले की तू पुढे चालत रहा, मात्र मागे वळून पाहू नकोस.

ठरल्याप्रमाणे दीक्षित पुढे चालत राहिले. मात्र देव खरोखरच आपल्या मागे येत आहे का, अशी शंका त्यांच्या मनात आली आणि अनावधानाने त्यांनी मागे वळून पाहिले. त्याच ठिकाणी देव अदृश्य होऊन देवाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. त्या दिवशी गोकुळ अष्टमीचा दिवस होता. त्यामुळे तेव्हापासून आजतागायत येथे गोकुळ अष्टमीला मोठा उत्सव साजरा केला जातो. कालांतराने चंपाषष्ठीच्या शुभमुहूर्तावर ग्रामस्थांनी येथे खंडेरायाचे लहानसे मंदिर उभारले. पुढे या मंदिराचे महत्त्व ओळखून अहिल्याबाई होळकर यांनी १६८८ मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा गर्भगृहापर्यंतचा भाग दगडी असून त्यावरील कळसापर्यंतचा भाग विटांनी बांधण्यात आलेला आहे.

छत्रपती संभाजीनगरपासून काही अंतरावर सातारा गावात डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुले, भंडारा प्रसाद विक्रीची अनेक दुकाने आहेत. मंदिर जमिनीपासून वरच्या बाजूला असल्यामुळे सुमारे १५ पायऱ्या चढून प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. दुमजली प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांची चित्रे आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना असून डावीकडे अहिल्याबाई होळकरांचे, तर उजवीकडील भिंतीवर शिवशंकर यांची चित्रे आहेत. या नगारखान्याचे काम अहिल्याबाईंच्या काळात झालेले आहे. प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात आल्यावर प्राचीन मोठी दगडी दीपमाळ दिसते. चंपाषष्ठी उत्सवांच्या वेळी शेकडो दिव्यांनी ती उजळवली जाते. दीपमाळेसमोर अखंड दगडात कोरलेला नंदी आहे. मंदिर परिसरात एक चौथरा आहे. पूर्वी त्या जागेवर लहानशी बारव होती. त्यात हातपाय धुऊन भाविक मंदिरात दर्शनासाठी जात असत. मात्र, बारवेतील दगड गुळगुळीत झाल्याने अनेक भाविक घसरून पडत. त्यामुळे ती बारव बुजवून तेथे चौथरा बांधण्यात आला. प्रांगणात एका पाराजवळ मुंजा, गणपती, हनुमान आणि म्हसोबाच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. असे सांगितले जाते की या मंदिराखाली काही वर्षांपूर्वी एक भुयारही सापडले आहे.

खंडोबा मंदिराच्या दगडी खांबांवर आकर्षक कलाकुसर नक्षीकाम आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर ठिकठिकाणी गंधर्व, अप्सरा देवदेवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. यातील अनेक मूर्ती आजही सुस्थितीत आहेत. मुख्य मंदिरात येण्यासाठी आठ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कासवमूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील देवळ्यांमध्ये दक्षिणेला गणेश तर उत्तरेला मारुती यांच्या मूर्ती आहेत. या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दशावतार कोरलेले आहेत. दक्षिणेस ब्रह्माची उत्पत्ती असून उत्तरेस कृष्णलीला आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दक्षिण बाजूस सूर्यशिल्प आहे. येथे मीराबाई आणि गरुडाचेही शिल्प आहे. पूर्वाभिमुख दरवाजावर वेलबुट्ट्यांची नक्षी असून खांबाजवळ दोन्ही बाजूंना जयविजय आहेत. प्रवेशद्वाराच्या खालच्या भागात कीर्तिमुख ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे.

असे सांगितले जाते की या मंदिराचे गर्भगृह हे खंडोबाच्या इतर सर्व मंदिरांतील गर्भगृहांपेक्षा मोठे आहे. गर्भगृहात आकर्षक कलाकुसर असलेल्या उंच चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील खंडोबाची स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूला खाली खंडोबाचा तांदळा शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या एका कोपऱ्यात घोड्यावर आरूढ झालेल्या स्वाराची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. येथे आठ फूट लांब असलेला प्राचीन दुधारी खंडाही (सरळ तलवार) आहे. या खंड्याबाबतची आख्यायिका अशी की त्रेतायुगात मणि मल्ल दोन राक्षस माजले होते. ते साधूसंतांना त्रास देत असत. या साधूसंतांनी शंकराकडे धाव घेतल्यावर शिवाने खंडोबाचा अवतार धारण करत साताऱ्याच्या डोंगरावर (कडेपठार) याच खंड्याने मणि मल्लाचा वध केला होता. गर्भगृहातून बाहेर पडल्यावर समोर कडेपठारचा डोंगर दिसतो.

या मंदिरात चंपाषष्ठी, पौष पौर्णिमा, चैत्रपौर्णिमा आदी उत्सव होतात. चंपाषष्ठीला मोठी जत्रा भरते. या वेळी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते. चंपाषष्ठीच्या दिवशी पहाटे लघुरुद्राभिषेक झाल्यावर खंडोबाला नवीन वस्त्रे नेसवण्यात येतात. त्यानंतर ५६ प्रकारच्या विविध खाद्यपदार्थांसह रोडगेवांग्याचे भरीत तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. सकाळी वाजता मंदिरात महाआरती होते. सकाळी वाजता देवाची पालखी मंदिरातून वाजतगाजत निघते. येथून ती नजीकच असलेल्या दीक्षितांच्या वाड्यात येते. आज घडीला दीक्षितांचे कोणतेही वारसदार या वाड्यात राहत नाहीत. त्यांचे नातेवाईक असलेल्या दांडेकर परिवारातर्फे पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन केले जाते. येथे रुद्राभिषेक, कुलाचार नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर पालखी डोंगरावरील जुन्या मंदिरात जाते. या मंदिरात विधिवत पूजाअर्चा झाल्यावर गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात येते.

खंडोबाच्या यात्रेदरम्यान कलगीतुरा, वाघ्यामुरळी, सवालजवाब, लावणी आदी लोककलांचे कार्यक्रम होतात. खंडोबाला केलेला नवस फेडण्यासाठी, तसेच खंडोरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नवदाम्पत्य येथे येतात. जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला जाऊ शकणारे परिसरातील हजारो भाविकही येथे येऊन खंडेरायाचे दर्शन घेतात. हे मंदिर येथील परिसर पुरातत्त्व विभागाकडून राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या या मंदिराचा ताबा पुरातत्त्व विभागाकडे आहे. ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये आलेल्या उल्लेखानुसार छत्रपती शिवाजी महाराज या खंडोबा मंदिरात साधूच्या वेषात राहून औरंगजेबाविरुद्ध गनिमी कावा आखत असत.

उपयुक्त माहिती:

  • छत्रपती संभाजीनगर शहरापासून सात किमी अंतरावर
  • छत्रपती संभाजीनगरपासून शहर परिवहन सेवा एसटी उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : रमेश चोपडे, अध्यक्ष, मो. ९८२३० ४४६९३,
  • साहेबराव पळसकर, सचिव, मो. ९४२१६ ७४९०४
Back To Home