
‘जर एखाद्या राजास वाटले की असे मंदिर बनवावे, तर त्याला त्याकरीता वीस हजार सर्वोत्तम कारागीर आणि एक हजार वर्षांचा काळ लागेल. तसेच एवढा काळ त्याला आपल्या खजिन्याचे तोंड उघडे करून ठेवावे लागेल. तेव्हा कुठे अशी वास्तू निर्माण करता येईल, अन्यथा असे मंदिर उभारणे शक्यच नाही,’ असे एका शिलालेखात म्हटलेले आहे. हा शिलालेख कैलास मंदिराबाबतचा आहे. बहामनी साम्राज्याचा संस्थापक हसन गंगु बहामनी हा वेरूळची लेणी पाहण्यासाठी गेला असताना त्याच्या सोबत असलेल्या ब्राह्मण पंडितांनी या शिलालेखाची नोंद केली होती.
वेरूळच्या लेण्यांमध्ये असलेले कैलास मंदिर शैलमंदिर म्हणून ओळखले जाते. कैलासनाथ हे त्याचे मूळ नाव आहे. हे मंदिर वास्तुशिल्पकलेतील अद्भुत नमुना म्हणून ओळखले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’ या संस्थेने भारतीय जागतिक वारसास्थळांची जी यादी तयार केली आहे, त्यात पहिल्या पाच स्थळांमध्ये हे मंदिर येते. याची निर्मिती नियोजनबद्धपणे आधी कळस, मग पाया अशा पद्धतीने करण्यात आली आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, या शिवमंदिराच्या निर्मितीला राष्ट्रकुटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कालखंडात सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रकुटांचा राजा प्रथम कृष्णराज याने त्याला आठव्या शतकात पूर्ण रूप दिले. त्यानंतरही पुढच्या तीन–चार राजांच्या काळात मंदिराभोवती ओवऱ्या, सरिता मंदिर, लंकेश्वर लेणे, मातृका मंदिर खोदण्यात आले. अशा प्रकारे राष्ट्रकुटांच्या चार पिढ्यांनी, सुमारे १५० वर्षांत हे मंदिरशिल्प साकारले.
हे मंदिर दक्षिण आणि उत्तर वास्तुस्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असून त्याचे कर्नाटकातील विरुपाक्ष मंदिराशी उल्लेखनीय साम्य आहे. मात्र कैलास मंदिराचे वैशिष्ट्य असे की ते जगभरातील सर्वांत मोठ्या एकल दगडी उत्खननापैकी एक आहे. या मंदिराचा आकार ३०० फूट लांब व १७५ फूट रुंद आहे. त्याच्या समोरच्या बाजूने गोपुरे तर मागील बाजूस शिखरे दिसतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन मजली गोपुरम आहेत. त्यावर शैव आणि वैष्णव यांना पूजनीय असलेल्या देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणात एका भव्य हत्तीची अखंड पाषाणातून कोरलेली प्रतिमा आहे. हत्तीस राष्ट्रकुट राजे शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानत असत, तसेच त्यांच्या सैन्यांतही हत्तींचा समावेश असे. कैलास मंदिराच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर कमळाच्या फुलावर बसलेल्या गजलक्ष्मीची मूर्ती दिसते. मंदिराचा गाभारा चौकोनी आहे. गर्भगृहात भलेमोठे शिवलिंग आहे. गाभाऱ्याभोवती थोड्या अंतरावर पाच छोटी देवळे आहेत. यातील तीन मंदिरे गंगा, यमुना व सरस्वती या पवित्र नद्यांना समर्पित आहेत. समोर चौरस मंडप असून मंडपासमोर थोड्या अंतरावर नंदीमंडप आहे.
या वास्तूचा संपूर्ण तळमजला भरीव आहे. त्याचे जोते सुमारे तीन फूट उंच आहे. जोत्यावर रामायण आणि महाभारतातील दृश्ये शिल्पांकित करण्यात आली आहेत. यामध्ये रावण–जटायू संग्राम, त्रिपुरवध, कैलास पर्वत उचलू पाहणारा रावण यांचे चित्रण आहे. जोत्याच्या वर हत्ती, सिंह, विविध व्याल (या प्रकारच्या शिल्पांमध्ये हत्ती, घोडा, मेंढा यांसारख्या प्राण्यांचे केवळ मुख असून त्याखाली काल्पनिक प्राणी वा पक्ष्याचा आकार असतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची गजव्याल, अश्वव्याल, शरभव्याल अशी ओळख पटविली जाते) यांच्या भव्य मूर्ती आहेत. त्यावर मंदिराची इमारत असून त्यांत स्तंभ, कोनाडे, छप्पर व शिखर कोरण्यात आलेले आहेत. ते सर्व द्राविड शैलीतील आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर त्रिपुरान्तक, विष्णू, अर्जुन–सुभद्रा विवाह असे पौराणिक देखावे कोरलेले आहेत. गोपुराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या गजमूर्ती तसेच दोन ध्वजस्तंभ आहेत.
मंदिराच्या निर्मितीबद्दल अभ्यासकांकडून असे सांगण्यात येते की एका टेकडीच्या उतरत्या भागात हे मंदिर खोदण्यात आले. त्या मंदिराच्या गोपुराकरीता आणि मुख्य मंदिरासाठी आवश्यक तेवढी जागा शिल्लक ठेवून प्रथम ३० मीटर रुंद आणि तितकाच खोल असा चर खणण्यात आला. मध्यभागी ६० मीटर लांब व ३० मीटर रुंद असा शिलाखंड उरला होता.
त्यातून कैलासनाथ मंदिराची इमारत व त्यासमोर ३० मीटर अंतरावर ठेवण्यात आलेल्या शिलाखंडातून प्रवेशद्वार व गोपुर खोदण्यात आले. यातून सुमारे २०,००० टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला. विशेष म्हणजे कैलास मंदिराच्या आसपास कुठेही या दगडाचे अंश दिसत नाहीत. असे सांगितले जाते की चालुक्य आणि राष्ट्रकुट यांच्या काळात मराठवाड्यामध्ये जी मंदिरे बांधण्यात आली, त्यांच्या कामात कैलास मंदिरासाठी खोदण्यात आलेल्या दगडांचा वापर करण्यात आला होता.
कैलास मंदिराचे आकारमान, कलात्मक रचना, प्रमाणबद्धता या गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत. जगभरातील शिल्पकारांनी या मंदिरातील मूर्तीकाम नावाजलेले आहे. हे मंदिर कसे निर्माण केले असावे, याबद्दल अनेक दंतकथा सांगण्यात येतात. काही परदेशी संशोधक असे सांगतात की हे मंदिर परग्रहवासीयांनी उभारले असावे. त्याच प्रमाणे मंदिराच्या खाली एक पुरातन शहर असल्याचेही सांगण्यात येते; परंतु त्यात तथ्य नसून मंदिराची निर्मिती राष्ट्रकुट काळात झाली असल्याचे इतिहासमान्य आहे. अन्य एका दंतकथेनुसार, औरंगजेबाने हे मंदिर फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यास त्यात यश आले नाही. भारतातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त करणारा औरंगजेब हा स्वतः औरंगाबादचा सुभेदार होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने या परिसरात वास्तव्य केले होते. इतिहासकार असे सांगतात की तोही या मंदिराची रचना पाहून आश्चर्यचकित झाला होता. त्यामुळे त्याने या मंदिरास हानी पोचवली नाही.
पौराणिक कथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हिमालयातील कैलास पर्वतावर शंकराचे वास्तव्य असते. तो पर्वत पांढऱ्याशुभ्र बर्फाने आच्छादित असतो. त्यामुळे कैलास मंदिराची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण मंदिरास त्या वेळी पांढऱ्या रंगाचा लेप देण्यात आला होता. काळाच्या ओघात तो नामशेष झाला असून त्याचे काही अंश मात्र अजूनही दिसतात.
या मंदिराची आख्यायिका अशी की अलाजपूर म्हणजेच एलिचपूरचा एक राजा होता. गतजन्मातील पापांमुळे त्याला असाध्य आजार झाला होता. एकदा तो राणीसह शिकारीसाठी या परिसरात आला होता. येथे आल्यावर राणीने घृष्णेश्वर मंदिरात जाऊन नवस केला की जर राजाचा आजार बरा झाला तर ती शंकराचे मंदिर बांधेल. त्यानंतर राजाने येथील तलावात स्नान केल्यानंतर त्याचा आजार त्वरित बरा झाला. तेव्हा राणीने आपल्या नवसाबद्दल राजाला सांगितले व मंदिराच्या शिखराचे दर्शन होईपर्यंत उपवास ठेवण्याची प्रतिज्ञा केली. या प्रतिज्ञेमुळे कमीत कमी वेळात मंदिर बांधण्याचे राजाने ठरविले; परंतु ते कोणत्याही वास्तुकारास शक्य नव्हते. हे आव्हान पैठणच्या कोकसा या वास्तुकाराने स्वीकारले व राजाला वचन दिले की एका आठवड्याच्या आत राणीला मंदिराच्या शिखराचे दर्शन होईल. कोकसा याने त्याच्या साथीदारांसह शैल मंदिर कोरण्यास सुरुवात केली व आरंभी शिखर कोरले. त्यामुळे राणीची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली. या राणीच्या सन्मानार्थ मंदिरास माणिकेश्वर असे नाव ठेवण्यात आले व राजाने तेथे एलापूर या शहराची निर्मिती केली. तेच आता एलोरा म्हणून ओळखले जाते.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनेस्को’ने दखल घेतलेल्या या पुरातन वास्तूची देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती व्हावी, या दृष्टीने २६ एप्रिल २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेल्या २० रुपयांच्या नोटेवर या मंदिराचे चित्र छापण्यात आलेले आहे. मंगळवार व्यतिरिक्त दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत भाविक व पर्यटकांना कैलास मंदिर पाहता येतो. कैलास मंदिर तसेच येथील सर्व लेण्या दर मंगळवारी बंद असतात.