स्वयंभू गणपती मंदिर

बोरगाव अर्ज, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील स्वयंभू गणपतीचे मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जिल्ह्यातील जागृत प्रसिद्ध गणपती देवस्थानांपैकी हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान समजले जाते. तसेच महाराष्ट्रातील गणपतीच्या २१ शक्तिपीठांपैकी हे विसावे शक्तिपीठ असल्याची मान्यता आहे. गिरजा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरातील गणपती भक्तांच्या हाकेला धावून जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

छत्रपती संभाजीनगरजळगाव मार्गावर फुलंब्रीहून सिल्लोडकडे जाताना आळंद गावाजवळ उजव्या बाजूला बोरगाव अर्ज फाटा लागतो. या फाट्यापासून आठ किमी अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर केव्हा बांधण्यात आले, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. गिरजा नदीकाठी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराशेजारी उमामहेश्वर मंदिर आहे. त्यामुळे येथे एकाच ठिकाणी दुर्मिळ असे मातापिता पुत्राचे स्थान आहे. मंदिर परिसर शांत प्रसन्न आहे. परिसरात चहूबाजूंनी सुमारे २०० नारळांची झाडे लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे दूरवरून पाहिल्यास हे मंदिर नारळाच्या झाडांमध्ये लपलेले भासते. मंदिरासमोरील उद्यानात विविध शोभेची फुलझाडे लावलेली आहेत.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तुळशी वृंदावन असून त्यासमोर एक मोठी पितळी घंटा आहे. जमिनीपासून साधारणतः दोन फूट उंचीवर असलेल्या या मंदिराचे स्वरूप दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. चार पायऱ्या चढून दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपाच्या वरच्या भागात मध्यभागी शिवपंचायतन, डावीकडे लक्ष्मी तर उजवीकडे सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. प्रशस्त सभामंडपात भाविकांच्या सोयीसाठी रेलिंग लावून पुरुष महिला भाविकांसाठी दर्शनरांगांची सुविधा केलेली आहे. सभामंडपाच्या पुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून मध्यभागी गर्भगृह आहे. गर्भगृह हे काहीसे उंचावर असल्यामुळे सभामंडपातून चार पायऱ्या चढून गर्भगृहात जावे लागते. तेथील एका उंच संगमरवरी चौथऱ्यावर गणपतीची शेंदूरचर्चित डाव्या सोंडेची मूर्ती आहे. या गणपतीचा मुकुट चांदीचा, तर डोळे सोन्याचे आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव गर्भगृहात भाविकांना प्रवेश दिला जात नाही; परंतु सभामंडपातून या गणपतीचे दर्शन घेता येते. गर्भगृहाबाहेर पूजाविधीसाठी गणेशाची एक पितळी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे.

मंदिराच्या बाह्य भागावर आकर्षक कलाकुसर केलेली दिसते. मंदिराचे शिखर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकामांनी सजलेले आहे. शिखरावरील देवळ्यांमध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती शिल्पे आहेत. महाराष्ट्र सरकारने २००७ मध्ये या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास योजनेत केलेला आहे. सरकारतर्फे मिळणाऱ्या विकासनिधीतून या परिसरातील अनेक कामे करण्यात आलेली आहेत. मंदिरात दर मंगळवारी, तसेच दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी असते. अंगारकी चतुर्थीला या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या दिवशी पहाटे चार वाजता काकड आरती होते. सकाळी सात वाजता गणेशाची महाआरती झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले होते. दिवसभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. परिसरात नारळ, फुले प्रसादाची दुकानेही लागतात. ग्रामस्थांतर्फे येथे आलेल्या भाविकांसाठी फराळाची सोय केली जाते.

या मंदिरात शंभरहून अधिक वर्षांपासून गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह होतो. या सप्ताहादरम्यान पहाटे काकडा भजन होते. याशिवाय दिवसभर संगीत रामायण, हरिपाठ, भजनकीर्तन होते. अनेक नामांकित प्रवचनकारांची प्रवचनेही होतात. रामनवमीला या सप्ताहाची सांगता होते. त्यानंतर येथे रामजन्मोत्सव साजरा होतो. रामनवमी तसेच दशमीला गणपतीचा भव्य यात्रोत्सव होतो. राज्यभरातून हजारो भाविक यावेळी येथे येतातकामानिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झालेली गावकरी मंडळीही आवर्जून या यात्रेसाठी गावात येतात. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी दशमीला ग्रामस्थांतर्फे येथे भंडारा होतो. यात्रेदरम्यान रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येते.

या मंदिराशेजारी उमामहेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या छोटेखानी मंदिराचे स्वरूप दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे आहे. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या दर्शनमंडपात एका चौथऱ्यावर नंदीची दगडी मूर्ती आहे. नंदीच्या मूर्तीच्या डावीकडील देवळीत गणेशाची सुबक मूर्ती आहे. जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात लाकडी खांब आहेत. सभामंडपातील देवळ्यांमध्ये सूर्यचंद्र आदी देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीच्या वरच्या भागात जनार्दन स्वामी महाराज आणि ब्रह्मलीन पूर्णागिरी महाराजांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहात मध्यभागी शिवलिंग आहे. पिंडीच्या मागील भिंतीवरील देवळीत पार्वतीची मूर्ती आहे.

उपयुक्त माहिती:

  • फुलंब्री येथून २१ किमी, तर छत्रपती संभाजीनगर येथून ५२ किमी अंतरावर
  • फुलंब्री, जळगाव, जालना येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही
  • संपर्क : उमामहेश्वर मंदिर, महंत प्रभातगिरी महाराज, मो. ९३६९५२५१६४
Back To Home