शिवाई मंदिर

सिवना, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्याचे ग्रामदैवत असलेले येथील कुलस्वामिनी शिवाई देवीचे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ही देवी नवसाला पावणारी इच्छापूर्ती करणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून पाच दिवस भरणारी येथील यात्रा (चैत्री) ही जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. या यात्रेसाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

मंदिराबाबतची आख्यायिका अशी की सुमारे ८०० वर्षांपूर्वी शिवना या गावाचे नाव शिवपूर असे होते. गावापासून पाच किमी अंतरावर शहादरी नावाचे गाव होते. या गावात बहुसंख्य गवळी गुराख्यांची वस्ती होती. याच गावातील शिवा नावाचा गवळी दररोज येथून दूध दही विक्रीसाठी शिवपूर येथे येत असे. दुधाची विक्री करण्याआधी तो गावाजवळ असलेल्या खोलेश्वर मंदिरातील शिवलिंगावर दूध वाहत असे. अनेक वर्षे त्याचा हा नित्यक्रम सुरू होता. त्याच्या भक्तीवर एकेदिवशी महादेव प्रसन्न झाले त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावर आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी, असा वर त्याने मागितला. त्याची मागणी मान्य करताना महादेव म्हणाले की तुम्हाला कन्यारत्न होईल. मात्र ती जास्त दिवस तुझ्याजवळ राहणार नाही.

वर्षभराने शिवाच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. महादेवाच्या आशीर्वादाने झालेल्या या मुलीचे नाव त्यांनी शिवाई असे ठेवले. पाचसहा वर्षांची असताना एकेदिवशी शिवा तिला घेऊन खोलेश्वराच्या दर्शनासाठी गेला. दर्शन घेतल्यावर शिवाईने त्याला सांगितले की तुम्ही गावात दूधदही विकून परत या. तोवर मी मंदिरात थांबते. त्यावर शिवाने होकार दिला खरा, पण त्याचे मन तिला एकटीला ठेऊन जायला तयार होत नव्हते. त्यामुळे चारपाच पावले पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले असता शिवाई येथेच गुप्त झाली होती. कालांतराने ग्रामस्थांनी येथे शिवाईचे मंदिर उभारले. असे सांगितले जाते की शिवाईच्या नावावरूनच या गावाचे नाव शिवना असे पडले.

बुलडाणाअजिंठा मार्गावर शिवाई देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर प्राचीन दगडी दीपमाळ आहे. मंदिराला सर्व बाजूने तटबंदी असून त्यात असलेल्या प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागातील कमानीत गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. संपूर्ण मंदिर परिसरात फरसबंदी आहे. या परिसरात गणपती, सूर्यनारायण साईबाबा यांची लहान मंदिरे आहेत. मंदिर परिसरातील पुरातन औदुंबराच्या वृक्षासमोर खोलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. आख्यायिकेप्रमाणे या मंदिरातील शिवलिंगावरच शिवा गवळी नित्यनेमाने दुग्धाभिषेक करत असे. औदुंबराच्या वृक्षासमोर नंदीची अखंड दगडातील मूर्ती आहे.

शिवाई देवीच्या मंदिरावर आकर्षक शिखर असून त्यावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या समोरील भागात होमकुंड आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या समोरील बाजूस तीन कमानीयुक्त दरवाजे आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी कासवाची मूर्ती आहे. या सभामंडपाचे छत वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर विविध रंगांच्या लहानलहान काचांची कलाकुसर केलेली दिसते. गर्भगृहात एका कमी उंचीच्या चौथऱ्यावरील मखरात शिवाई देवीची मूर्ती आहे. डोक्यावर मुकुट शरीरावर विविध वस्त्रेअलंकार ल्यालेली देवीची ही मूर्ती सुंदर भासते. मूर्तीच्या मागील भिंत चांदीच्या पत्र्याने मढविलेली असून पत्र्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केलेले आहे. त्यामध्ये मागच्या बाजूला प्रभावळ, त्याच्या वरील बाजूला दोन गजराज मध्यभागी कीर्तिमुख कोरलेले आहेत. याशिवाय कलाकुसर केलेल्या या मखरात दोन सिंह, कलश, कमळ, स्वस्तिक तसेच कोरण्यात आले आहेत. वरच्या बाजूला गणेशाचे शिल्प असून बाजूला दोन मयूर आहेत. असे सांगितले जाते की देवीची मूळ पाषाणाची मूर्ती सव्वा फूट उंचीची होती१९८२ मध्ये मूर्तीवरील शेंदूर कुंकूमिश्रित लेप काढून सिमेंट काही रसायने लावून मूर्तीला नवीन रूप देण्यात आलेले आहे. शिवाईच्या मूर्तीसमोर पितळी पादुका आहेत.

येथे दररोज काकड आरती, अभिषेक, धूपारती सांजआरती होते. दर मंगळवारी देवीच्या मंदिरासोबतच लगतच्या गणेश मंदिरातही आरती होते. त्या दिवशी सकाळी देवीचे वस्त्र बदलून तिचा साजशृंगार करण्यात येतो. सकाळी .३० वाजता आरती झाल्यावर प्रसादाचे वाटप होते. येथे चैत्री तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. दोन्ही नवरात्रोत्सवांदरम्यान गावातील गौसावी (जैन) कुटुंबाकडून देवीला वस्त्र देण्याची पद्धत आहे. गावातील राजाभाऊ वदगे (कासार) यांच्या घरून देवीला चुडा (बांगड्या) देण्यात येतो. चैत्र पौर्णिमेला जैन यांच्या निवासस्थानापासून देवीच्या वस्त्रांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर मंदिरात घटस्थापना, होमहवन, नवचंडीयाग तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होतात. चैत्र पौर्णिमेपासून पाच दिवस चालणारी ही यात्रा मराठवाड्यात चैत्री म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेच्या पाचव्या दिवशी रात्री, तसेच सहाव्या दिवशी सकाळी गावातून शिवाईची मिरवणूक (स्वारी) निघते. या स्वारीनंतर यात्रोत्सवाची सांगता होते. यावेळी गावातील स्त्रियांकडून देवीला ओटी भरली जाते. शिवाई देवीच्या यात्रोत्सवाच्या काळात गावातील बालाजी मंदिरात पाच दिवस बालाजी महोत्सव पार पडतो. यावेळी तलवारबाजीचे खेळही होतात.

उपयुक्त माहिती:

  • सिल्लोड येथून २९ किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ९४ किमी अंतरावर
  • सिल्लोड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : सुभाष होळकर, अध्यक्ष, मो. ९८८१७३४५२९
  • पुष्पक जोशी, पुजारी, मो. ८९७५५६५४५६ 
Back To Home