मराठवाड्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळ (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे गिरिजादेवीचे जागृत स्थान आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक उपपीठ असल्याची मान्यता आहे. नवसाला पावणारी देवी, असा गिरिजादेवीचा लौकिक असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. ३०० वर्षांपासून माघी पौर्णिमेला येथे भरणारी देवीची यात्रा ही तालुक्यातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते.
म्हैसमाळ येथील गिरिजादेवीचा उल्लेख पद्मपुराण, काशीखंड व शिवालय माहात्म्य या ग्रंथांमध्ये आहे. पद्मपुराणातील उल्लेखानुसार, एके दिवशी शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत होते. या खेळात पार्वती हरल्याने उपस्थित देवगण हसले. त्यामुळे रागावलेली पार्वती कैलास पर्वताचा त्याग करून येथील पर्वत शिखरावर आली. येथे तिने कठोर तपश्चर्या केली. तिचा शोध घेत भगवान शंकरही येथे आल्याने या पर्वताला महेशाद्री असे म्हटले जाते. साक्षात शंकराने वास केलेले पठार म्हणून या ठिकाणाला महेशाचे माळ म्हणजेच म्हैसमाळ असे नाव पडले. म्हैसमाळला काम्यकवन किंवा उमावन असेही म्हणतात. महेशाद्रीच्या शिखरापासून एलनदीचा उगम झाला. येथे पूर्वी गिरिजाने (पार्वती) येऊन तप केल्यामुळे तिला महेश्वर हा पती मिळाला, त्यामुळे हे ठिकाण उमावन या उपनामाने प्रसिद्ध आहे. काशीखंड या ग्रंथातील ४९ व्या अध्यायात शंकराने पार्वतीसह येथे वास केला होता, असा उल्लेख आढळतो.
समुद्रसपाटीपासून ९१३ मीटर उंचीवर गिरिजादेवीचे स्थान आहे. मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनदृष्ट्याही हे ठिकाण महत्त्वाचे आहे. पर्वतरांगांमध्ये असलेले हे ठिकाण हिरवीगार झाडी आणि टेकड्यांमुळे निसर्गसमृद्ध भासते. येथील हवामान सर्वकाळ थंड असल्यामुळे ते पर्यटकांनाही आकर्षित करते. म्हैसमाळ परिसरात गुहा आणि लेण्यांचे अवशेष आढळले आहेत. यावरून येथे प्राचीन काळापासून मानवी वस्ती असल्याचे सिद्ध होते.
मंदिराजवळ येताच मंदिराचे भव्य प्रवेशद्वार नजरेस पडते. या दुमजली प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर नगारखाना आहे. येथून आत आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात काही सत्पुरुषांच्या समाध्या व मागील बाजूस धर्मशाळा आहे. मंदिर परिसरात सर्वत्र पेव्हरब्लॉकची फरसबंदी करण्यात आल्यामुळे हा परिसर स्वच्छ व सुंदर भासतो. अलीकडे झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मंदिराच्या शिखराची उंची ५१ फूट असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप हा खुल्या स्वरूपाचा असून मध्यभागी एका चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची पंचधातूची मूर्ती आहे. या मूर्तीच्या बाजूला प्राचीन दगडी दीपमाळ व यज्ञकुंड आहे.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतींवर जय–विजय यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी सोयीचे जावे म्हणून येथे स्टीलचे रेलिंग लावून दर्शन रांगेची सुविधा करण्यात आलेली आहे. गर्भगृहात संगमरवरी मखराच्या मध्यभागी देवीची शेंदूरचर्चित प्रसन्न मूर्ती आहे. या मखरावर वेलबुट्ट्यांचे नक्षीकाम असून त्यावर श्री, कलश अशी मंगलप्रतिके आहेत. वरच्या दोन्ही बाजूंना सोंड उंचावलेले गजराज आहेत. मखरात विराजमान असलेल्या देवीच्या चारही हातांमध्ये आयुधे आहेत. वस्त्रालंकारित देवीच्या नाकात नथ व डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. या मूर्तीवर चांदीचे छत्र आहे. मूर्तीच्या पायांजवळ दोन्ही बाजूंना सिंह आहेत. देवीच्या उजव्या बाजूला गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहातील छतावरही नक्षीकाम आहे.
नवसाला पावणारी देवी, अशी ख्याती असलेल्या गिरिजादेवीच्या दर्शनासाठी वर्षभर राज्याच्या विविध भागांतून भाविक येतात. अनेक भाविक नवसपूर्तीसाठी या डोंगराच्या पायथ्यापासून दंडवत घालत येतात. दररोज सकाळी ८ वाजता सकाळची पूजा, तर रात्री ८ वाजता सांजआरती होते. दर मंगळवारी येथे विशेष पूजा–अर्चा होते.
दरवर्षी माघ पौर्णिमला देवीची यात्रा भरते. यात्रेच्या दिवशी पहाटे परंपरेनुसार महाभिषेक केला जातो. त्यानंतर देवीला संस्थानचे अध्यक्ष व तहसीलदारांच्या हस्ते सोन्याचा मुकुट व अलंकार चढवले जातात. यात्रेदरम्यान गावातील मारुती मंदिरासमोर गिरिजादेवीची पारंपरिक काठी बसवण्यात येते. याशिवाय यात्रेसाठी दरवर्षी मानाच्या काठ्या, तसेच अन्य काठ्या येतात. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येथे देवीला बोकडाचा बळी देतात. शारदीय नवरात्रोत्सवही येथे मोठ्या उत्साहात होतो. उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवस्थानचे अध्यक्ष व तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना होते. त्यानंतर विधिवत पूजा–अर्चा, नैवेद्य व महाआरती होते. दररोज सकाळी व संध्याकाळी येथे देवीसमोर सनई–चौघडा वाजवला जातो. अखंड नंदादीपही तेवत असतो. अष्टमीला होमहवन, तर विजयादशमीच्या दिवशी शमीपूजन आणि सीमोल्लंघन होते. उत्सवकाळात मंदिराचे गर्भगृह पहाटे पाच वाजता खुले होते व रात्री १२ वाजता बंद होते. यावेळी देवीला सोन्या–चांदीचे दागिने, बहुमोल रत्ने, सोन्याच्या माळा, तोडे, पाटल्या, कंबरपट्टा, रत्नजडीत टोप याशिवाय विविध सौभाग्य अलंकारांनी सजविले जाते. आपले मनोरथ पूर्ण झाल्याने नेपाळच्या राणीने काही वर्षांपूर्वी या देवीला एक रत्नहार अर्पण केला होता. हा रत्नहारही देवीला घातला जातो.