भक्ती गणेश / काळा गणपती

भक्तीनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातील भक्ती गणेश मंदिर हे जागृत देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवीन औरंगाबादमधील हे पहिले मंदिर होय. काळा गणपती म्हणूनही प्रसिद्ध असलेला हा गणेश हाकेला धावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात असलेली काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती ही तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथून आणण्यात आली होती. दर मंगळवारी, संकष्टी, विनायकी तसेच अंगारकी चतुर्थीला हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

१९७२ मध्ये राज्य सरकारने अधिसूचना काढून नवीन औरंगाबाद प्रकल्पाच्या १२६२ हेक्टर क्षेत्राकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. सिडकोच्या माध्यमातून काही वर्षांतच या शहराचा झपाट्याने विकास होत गेला. येथे स्थापन झालेल्या नवीन वसाहतींमध्ये विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवण्यात येत होते. या सोबतच या परिसरात एखादे मंदिर असावे, या संकल्पनेतून १९८३ मध्ये येथे भक्ती ट्रस्टची नोंदणी करण्यात आली. या ट्रस्टच्या माध्यमातून सिडको प्रशासनाकडे मंदिर उभारण्यासाठी रितसर अर्ज करण्यात आला. त्यानंतर सिडकोने या ट्रस्टला ५००० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली. जून १९८५ मध्ये सिडको प्रशासनाकडून ही जागा विकत घेतल्यानंतर २६ फेब्रुवारी १९८७ रोजी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर छोटेखानी मंदिर उभारून येथे गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.

सुरुवातीला छोटेखानी असलेल्या या मंदिरासमोर पत्र्याची शेड होती. दिवसेंदिवस या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरत गेल्याने अनेक भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. या पार्श्वभूमीवर २०१० मध्ये विश्वस्त मंडळाने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. भाविक आणि परिसरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून दोन वर्षांत या मंदिराचे त्यासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण झाले. हे मंदिर जमिनीपासून तीन फूट उंच आहे. सहा ते सात पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून सर्व बाजूंनी दोन ते अडीच फूट उंचीच्या भिंती त्यावर संगमरवरी खांब आहेत. हे सर्व खांब एकमेकांशी संगमरवरी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे या मंदिराचे स्वरूप आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस एका चौरंगावर गणेशाची छोटी पितळी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. गर्भगृहात एका संगमरवरी चौथऱ्यावर गणेशाची काळ्या पाषाणातील सुबक मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मूर्तीवर असलेला मुकुट, डोळे, सोंड दात संपूर्ण चांदीचे आहेत. ही मूर्ती डाव्या सोंडेची सुमारे अडीच फूट उंचीची आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला हातात मोदक धरलेल्या मूषकाची छोटी पितळी मूर्ती आहे. गणेश मूर्तीमागील प्रभावळीवरही सुरेख कलाकुसर असून त्यावर दोन मूषक कोरण्यात आलेले आहेत. या मंदिराची बाह्यरचना ही दाक्षिणात्य पद्धतीची भासते. गर्भगृहावर असलेल्या उंच शिखरावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते.

दररोज सकाळी ते या वेळेत येथील गणेशाची विधिवत पूजा होते. सायंकाळी वाजता सांजआरती होते. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला येथे अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन होते चंद्रोदयानंतर संकष्टीची आरती होते. अंगारकी चतुर्दशीला येथे पहाटेपासूनच भाविकांची गर्दी असते. यावेळी आलेल्या भाविकांना दूध, केळी साबुदाण्याच्या खिचडीचा फराळ देण्यात येतो. चंद्रोदयानंतर महाआरती महाप्रसाद होतो. गणेशोत्सवाच्या काळात येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यावेळी मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात येते. येथे माघी गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात पार पडतो. या दोन्ही उत्सवांच्या वेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. याशिवाय श्रीरामनवमी, कृष्ण जन्मोत्सवासारखे अनेक सणउत्सवही येथे साजरे होतात. ट्रस्टतर्फे दरवर्षी भजन महोत्सव, गणेशयाग, सत्यविनायक पूजा, नैमित्तिक उत्सव तसेच कथाकीर्तनाचेही आयोजन केले जाते.

मंदिराला लागून असलेल्या ट्रस्टच्या तीन मजली इमारतीत तीन सभागृहे आहेत. येथे विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच योगवर्ग, भरतनाट्यम यांसह अन्य प्रशिक्षणवर्ग होतात. ही सभागृहे छोटेखानी कार्यक्रमांसाठी येथील नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून दिली जातात. ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. ट्रस्टने काही वर्षांपूर्वी जलसंधारण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारला पाच लाखांचा निधी दिला होता. पंतप्रधान सहाय्य निधीसाठीही ट्रस्टतर्फे पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. कोविडकाळात मंदिरातर्फे अनेकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते. दररोज पहाटे वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत या मंदिरातील गणेशाचे भाविकांना दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • सिडको बस स्थानकापासून पायी पाच मिनिटांच्या अंतरावर
  • रेल्वे स्थानक, एसटी स्थानकापासून येथे येण्यासाठी परिवहन सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांतून औरंगाबादसाठी एसटी रेल्वे सेवा
  • संपर्क : नरेंद्र पाटील, अध्यक्ष : ९८२२६३८४३८
  • श्रीपाद कुलकर्णी, सचिव : ९८२३९९२४५९
Back To Home