राजापूर तालुक्यातील रायपाटणमधील सनगरवाडी येथे अर्जुना नदीच्या तीरावर संगनातेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कोकणातील शेकडो शिवमंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरते, कारण या मंदिराच्या गर्भगृहातील शिवपिंडीवरील अभिषेकपात्र भरून अभिषेक सुरू झाल्यावर पात्रातील पाणी संपेपर्यंत गुंऽऽऽगुंऽऽऽ असा आवाज येतो. निसर्गाच्या या चमत्काराला ‘सिंहनाद’ असे म्हटले जाते. संपूर्ण राज्यातील हजारो शिवमंदिरांपैकी हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या मंदिरांमध्ये असा सिंहनाद होतो. त्यापैकी संगनातेश्वर हे एक मंदिर होय.
मुंबई–गोवा महामार्गावर लांजा व राजापूरदरम्यान ओणी हे गाव आहे. या गावापासून पाचलकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पाचलच्या अलीकडे दोन किमी अंतरावर रायपाटण आहे. तेराव्या वा चौदाव्या शतकातील संगनातेश्वर (संघनाथेश्वर) मंदिराचा माघ शुद्ध १५ शके १६६४ रोजी म्हणजेच इ. स. १७४२ साली जीर्णोद्धार झाल्याची नोंद मंदिराजवळील शिलालेखावर आहे. अर्जुना नदीला पाचलहून आलेला निवळ वहाळ जेथे मिळतो, त्या संगमावर हे मंदिर आहे. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर कौलारू आहे. मंदिरासमोर लहान दीपमाळ असून दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील दर्शनमंडप व सभामंडपात दगडी कक्षासने आहेत.
मंदिराचा सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून त्यात कोरीव काम केलेले मोठमोठे दगडी खांब आहेत. या खांबांवरील लाकडी तुळयांवर नागांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. गर्भगृहाच्या द्वाराजवळ सभामंडपात एका चौथऱ्यावर अखंड काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. या नंदीवर विविध अलंकार कोरलेले दिसतात. अंतराळाच्या द्वारशाखेच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवड्यांमध्ये उजवीकडे नागाची मूर्ती व डावीकडे शिवपार्वतीच्या दोन हात असलेल्या दगडी मूर्ती आहेत.
गर्भगृहाच्या द्वारशाखेच्या उजवीकडील देवडीत व द्वारशाखेच्या ललाटबिंबावर गणपतीच्या मूर्ती आहेत. येथील गर्भगृह अंतराळापासून तीन फूट खाली आहे. गर्भगृहावर घुमटाकार छत असून त्यावर चौकोनी पद्धतीचे शिखर आहे. येथील शिवपिंडी काहीशी ओबडधोबड व काळ्या पाषाणाची आहे. शेजारी असलेल्या अर्जुना नदीच्या पात्रात स्नान करून, कळशीतून तेथील पाणी आणून, ते शिवपिंडीवर असलेल्या अभिषेकपात्रात ओतल्यावर त्यातील पाच छिद्रांतून अभिषेक सुरू होतो. हा अभिषेक सुरू असताना पात्रातील पाणी संपेपर्यंत गर्भगृहात गुंऽऽऽगुंऽऽऽ असा आवाज येतो. याशिवाय येथील वैशिष्ट्य असे की हे अभिषेकपात्र नदीकाठी असलेल्या खडकावर जरी धरले तरीही हा आवाज येतो.
या मंदिराच्या मागील बाजूस एक दगडी शिळा आहे. ही शिळा म्हणजे गाभाऱ्यातील शिवलिंगाचाच भाग असल्याचे मानले जाते. याबाबतची आख्यायिका अशी की पूर्वीच्या काळी एक गाय येथे येऊन पान्हा सोडत असे, त्यामुळे ती घरी दूध देत नसे. त्याचा शोध घेतला असता या शिळेवर ती पान्हा सोडताना गुराख्याला दिसली. तेव्हा त्याने चिडून त्या शिळेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. तेव्हा या शिळेचे दोन भाग होऊन एक भागातून शिवपिंडी तयार झाली, तर दुसरा शिळेचा भाग मंदिराच्या मागच्या बाजूला आहे.
या मंदिराच्या शेजारी रामेश्वराचे मंदिर व रेवणसिद्ध मठ आहे. या मठात लिंगायत समाजाचे दैवत असणाऱ्या रेवणसिद्ध, रेवणसिध्दांचे शिष्य महादैय्या, महदैय्या यांचे शिष्य चलमक्षु, चलमल्दी यांच्या समाध्या आहेत. यातील एका समाधीवर ‘श्रीगुरू चनबसप्पा स्वामी समाधी १८२४ शके’ असे कोरलेले आहे. येथील मठाधिपती परंपरेतील चनबसप्पा स्वामींची ही समाधी असून त्यांनी १९०२ साली येथे समाधी घेतली होती. ज्याप्रमाणे काशी येथे उजव्या शिरेची व डाव्या शिरेची अशी दोन शिवलिंगे आहेत, तशी येथेही दोन शिवलिंगे आहेत. या मठाची रायपाटणची गादी ही मुख्य असून ओणी, लांजा, चिपळूण, पारगाव (चिकोडी) येथे उपशाखा आहेत.