पाजपंढरीचा श्रीराम

पाजपंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी

दापोली तालुक्यातील हर्णे बंदरापासून जवळ असणारे पाजपंढरी हे गाव समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे. या गावातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा येथील समुद्रावरच अवलंबून आहे. या पाजपंढरीच्या प्रभू आळीमध्ये असलेले श्रीरामाचे मंदिर हे येथील ग्रामदैवत असून हजारो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. रामनवमी हा येथील सर्वात मोठा सण. या सणासाठी श्रीरामाचे मंदिर संपूर्ण गाव तर सजतेच; परंतु या कालावधीत ज्यावर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्या समुद्रालाही ठिकठिकाणी पताका झेंडे लावून सजविले जाते.

समुद्राची पार्श्वभूमी लाभलेले पाजपंढरी गावातील प्रभू आळीत असलेले श्रीराम मंदिर गावात प्रवेश करताच दुरूनच नजरेस पडते. या मंदिराला सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे. आतापर्यंत तीन वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचे सांगण्यात येते. पूर्वी कौलारू असलेल्या मंदिरातील सर्व मूर्ती काळ्या पाषाणाच्या होत्या. त्या जीर्ण झाल्यानंतर येथे शुभ्र संगमरवरी मूर्तींची स्थापना करण्यात आली. जीर्णोद्धार करताना राजस्थान येथून आणण्यात आलेल्या दुर्मीळ अशा लाल पाषाणाचा (Red Stone) वापर करून हे मंदिर उभारण्यात आले आहे. लाल पाषाणाचा वापर करून बांधलेले असले तरीही संपूर्ण मंदिराला कळसापर्यंत पांढरा रंग दिलेला आहे. समुद्रात खोलवर मासेमारीसाठी गेलेल्या येथील कोळी बांधवांना आपले मंदिर लांबूनही दिसावे श्रीराम आपल्यासोबत आहेत, असा दिलासा मिळावा, अशी हा रंग देण्यामागची कल्पना आहे. हा श्रीराम सर्व संकटांपासून गावकऱ्यांचे रक्षण करतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

प्रभू आळीतील मुख्य मार्गाशेजारी हे मंदिर स्थित आहे. संपूर्ण मंदिराभोवती जांभ्या दगडांची तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशेला प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जांभ्या दगडांची कमान असून तेथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी केलेली आहे. प्रवेशद्वार ते मंदिराचे मुख्यद्वार यामधील भागात भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आलेली आहे. मंदिरासमोर मोठी दीपमाळ असून हे मंदिर सुमारे तीन फूट उंच जोत्यावर आहे. या जोत्यावर बाहेरील बाजूला प्रदक्षिणा मार्ग आहे. पूर्व, उत्तर दक्षिणेकडे असे तीन दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. पूर्वेकडील मुख्य दर्शनमंडपाच्या बाहेरील बाजूस सोंड उंचावून स्वागत करणाऱ्या दोन गजराजांची शिल्पे आहेत. येथील प्रत्येक दर्शनमंडपात दोन स्तंभ बाहेरील बाजूस आलेले असून ते स्तंभ कमानीसदृश्य कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत.

मंदिराच्या दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृहावर शिखरे आहेत. येथील सभामंडप प्रशस्त असून छताकडील भाग हा गोलाकार निमुळता होत शिखराकडे गेलेला दिसतो. या सर्व भागावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. गर्भगृहाची द्वारपट्टी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर खालच्या बाजूला दोन द्वारपाल ललाटबिंबावर गणेशाची प्रतिमा आहे. गर्भगृहात एका उंच चौथऱ्यावर श्रीराम, लक्ष्मण सीता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. येथील श्रीरामांच्या एका हातात धनुष्य एक हात आशीर्वाद देतानाचा आहे. लक्ष्मणाच्या एका हातात धनुष्य एका हातात बाण आहे. या दोघांच्याही पाठीवर बाणांनी भरलेले भाते आहेत. सीतेच्या एका हातात पुष्प एक हात आशीर्वाद देतानाचा आहे. या तिन्ही मूर्तींच्या मागील बाजूस चांदीच्या पत्र्याची सजावट आहे, त्यात श्रीरामांच्या मुकुटामागे सूर्यप्रतिमा आहे. याशिवाय गर्भगृहात श्रीगणेश आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतींवरही अनेक ठिकाणी सुंदर कलाकुसर केलेली दिसते.

येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव म्हणजे रामनवमी. पंचमीपासून एकादशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. पाजपंढरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तसेच चाकरमानीदेखील या उत्सवाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. पाजपंढरी गावात दहा मंडळे आहेत. त्यापैकी एका मंडळाला दरवर्षी या उत्सवाचे यजमानपद दिले जाते. यजमानपद प्राप्त झालेले मंडळ या उत्सवाचा संपूर्ण डोलारा आपल्या खांद्यावर घेते आणि तो सुंदररित्या कसा पार पाडला जाईल, याचे नियोजन सुरू होते. साधारणतः दोन महिने आधीपासून या उत्सवाची येथे लगबग सुरू होते. गुढीपाडव्यापासून धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही येथे आयोजन केले जाते. गुढीपाडव्याला या मंदिरासमोर भव्य गुढी उभारण्याची परंपरा आहे.

रामनवमी उत्सवाला पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतात. पारंपरिक वेशभूषेत रामनामाचा जयघोष करीत, वाजतगाजत, गुलाल उधळत, दिंड्यापताका नाचविल्या जातात. मंदिरात कीर्तन, भजन, प्रवचन, भक्तिगीते, हरिपाठ असे कार्यक्रम होतात. रामनवमीच्या दिवशी पाळणा झाल्यानंतर साधारणतः दुपारी तीन वाजता श्रीरामांच्या पालखीची भव्य मिरवणूक निघते ती गावात फिरून सायंकाळी सहापर्यंत पुन्हा मंदिरात आणली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते.

पाजपंढरी या गावात कोळी समाजाची वस्ती जास्त आहे. कोळी समाज हा उत्सवप्रिय मानला जातो. रामनवमीचा उत्सव जसाजसा जवळ येऊ लागतो, तसतसा येथील ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण येते. गावातील घरांना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू होते. दिवाळीपेक्षाही रामनवमी हा येथे मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवासाठी मंदिरासह पूर्ण गाव सजविले जाते. इतकेच नव्हे तर मंदिराजवळील समुद्रात खोलवर भगवे झेंडे पताका लावून आपला ज्यावर उदरनिर्वाह आहे, त्या दर्याराजालाही सजविले जाते. या उत्सवादरम्यान गावातील वा पंचक्रोशीतील एकही होडी वा बोट मासेमारीसाठी समुद्रात जात नाही.

उपयुक्त माहिती:

  • दापोलीहून ११ किमी, तर हर्णे येथून किमी अंतरावर
  • दापोली येथून एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे 
Back To Home