मराठा साम्राज्याच्या महाराणी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे माहेर असलेले संगमेश्वर तालुक्यातील श्रृंगारपूर या गावाला ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. असे सांगितले जाते की श्रृंगारपूरच्या हद्दीत असलेल्या प्रचितगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना जमिनीत सोन्याच्या मोहरा सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी या गडावर भैरी भवानीची स्थापना केली. श्रृंगारपूर येथे प्रतिष्ठापित असलेली देवी भैरी भवानी ही याच प्रचितगडावरील भैरी भवानीचे प्रतिरूप असल्याची मान्यता आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, श्रृंगारपूरजवळील प्रचितगड किल्ला हा शिवकाळात सूर्यराव सुर्वे याच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी त्यावेळी सूर्यराव सुर्वे याला स्वराज्यात सामील होण्याचे आवाहन केले होते; परंतु तसे न करता शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरून सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे येत होते, तेव्हा आदिलशाहीची चाकरी करीत असलेल्या सूर्यरावाने महाराजांनाच अडवण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय सूर्यरावाने संगमेश्वर येथील महाराजांच्या लष्करी छावणीवरही हल्ला चढविला होता. याची अद्दल घडविण्यासाठी महाराजांनी सूर्यराव याची श्रृंगारपूर येथे असलेली राजगादी लाथेने उडवून लावली आणि या प्रदेशावर ताबा मिळविला होता व त्यात येथील प्रचितगडाचाही समावेश होता. यावेळी सूर्यराव सुर्वे लढाई न करताच पळून गेला होता.
श्रृंगारपूर गावाच्या पूर्वेला असलेल्या डोंगरावर प्रचितगड आहे. हा किल्ला स्वराज्यात सामील झाल्यानंतर महाराज पालखीत बसून या गडाच्या दरवाजातून आत प्रवेश करीत होते. त्याचवेळी अचानक आलेल्या वाऱ्यामुळे त्यांचा शेला उडून येथील बोरीच्या झाडाला अडकून बसला. त्याबरोबर पालखीचे भोई थांबले. सर्वजण काट्यांमधून हा शेला काढण्याचा प्रयत्न करीत होते. महाराज तेथे थांबून हे सर्व पाहत होते. अचानक महाराजांच्या मनात काही आले आणि ते म्हणाले, ‘या बोरीनं मजला थांबविले, येथे खणा’ महाराजांचा हुकूम होताच मावळ्यांनी पहारी व फावड्यांच्या साह्याने बोरीखालची जमीन खणण्यास सुरुवात केली; परंतु खणताना पहारी अडखळल्या, माती दूर झाली आणि सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे तेथे सापडले. गड स्वराज्यात आला, भूमिगत धन सापडले. ही सर्व देवीची कृपा आहे, असे समजून महाराजांनी या किल्ल्यावर भैरी भवानीची स्थापना केली व तेथे मंदिर बांधण्यास सांगितले. तेव्हापासून या गडावर देवी भैरी भवानीचे स्थान आहे. ही देवी येथील सुर्वे कुटुंबीयांची कुलदेवता आहे.
श्रृंगारपूर गावापासून साधारणत: साडेचार ते पाच तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. हा किल्ला रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. किल्ल्यावर असलेले भैरी भवानीचे मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या कार्यकाळात या देवीची पूजाविधी व सर्व उत्सव येथे पार पडत असत; परंतु इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यावर मात्र तेथील उत्सव बंद झाले होते. श्रृंगारपूरमधील ग्रामस्थ अनेकदा या मंदिरात देवीच्या दर्शनाला जात असत; परंतु अवघड वाट व दमछाक करणारा प्रवास असल्यामुळे ग्रामस्थांनी ही देवी खाली आणून श्रृंगारपूर गावात तिची स्थापना करावी, असे काही वर्षांपूर्वी ठरविले. त्यानुसार देवीचा कौल घेण्यात आला; परंतु देवीने मी येथेच राहीन, माझी येथेच पूजा–अर्चा करा, असा कौल दिल्याने ग्रामस्थांचा नाईलाज झाला. या गडावरील मंदिरात श्री भैरी (भैरव), श्री भवानी, श्री महालक्ष्मी व गडाची पश्चिमदेवता काळकाई देवीच्या मूर्ती आहेत.
त्यानंतर काही वर्षांपूर्वी या परिसरातील कुंभारखाणी बु., तुळसणी, निवळी, तुरळ, कुटरे, राजवाडी, पेंडखळे, मुसाड, पालवण, ओणी, देवीहसोळ, गोरेगाव, तिवरे व पोयनार येथील सुर्वे बांधवांनी एकत्र येऊन देवीकडे श्रृंगारपूर गावात तिचे प्रतिरूप प्रतिष्ठापित करण्याचा कौल मागितला. त्यानुसार देवीने कौल दिल्यावर या सुर्वे बांधवांनी प्रचितगडाच्या पायथ्याशी, श्रृंगारपूर गावच्या वेशीवर भैरी भवानी मंदिराचे बांधकाम सुरू केले. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर २०१८ मध्ये एका भव्य सोहळ्यात दक्षिणपीठ करवीरचे शंकराचार्य श्रीश्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले.
आधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेल्या या मंदिरामध्ये प्रचितगडावरील श्री भैरी भवानीच्या मूळ चार शक्तींची नव्याने विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या मंदिरावर अष्टदिक्पालांसह (आठ दिशांच्या देवता) एकूण १३ कळस असून मंदिराच्या ब्रह्ममध्यावर गणपती विराजमान आहे. साधारणतः तीन फूट उंचीच्या जोत्यावर असलेल्या या मंदिराची रचना दर्शनमंडप, सभामंडप व तीन गर्भगृहे अशी आहे. प्रशस्त सभामंडपाच्या पुढील बाजूला मुख्य गर्भगृहाबाहेर गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. येथील मुख्य गर्भगृहात सुमारे चार फूट उंचीची काळ्या पाषाणातील भैरी भवानीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट, नाकात नथ, चार हातांमध्ये विविध आयुधे आहेत व तिने साडी परिधान केलेली आहे. देवीच्या पाठशिळेवर नक्षीदार कलाकुसर दिसते. मुख्य गर्भगृहाच्या उजवीकडे असलेल्या गर्भगृहात भैरीदेवाची मूर्ती, तर डावीकडील गर्भगृहात महालक्ष्मीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूस पश्चिमदेवता महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे.
दरवर्षी वैशाख पौर्णिमा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. वैशाख शुक्ल चतुर्दशी व पौर्णिमेला होणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांसोबतच पहिल्या दिवशी रात्री नमन व दुसऱ्या दिवशी सायंकाळी देवीचा गोंधळ मांडला जातो. या उत्सवासाठी आलेल्या हजारो भाविकांना भैरी भवानी प्रचितगड सेवा संस्थानतर्फे चहा, अल्पोपहार व भोजन दिले जाते.
भैरी भवानी मंदिर व प्रचितगडाशिवाय श्रृंगारपूर हे गाव प्रसिद्ध आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची सून व संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई यांच्यामुळे! मराठा सरदार पिलाजीराव शिर्के यांची येसूबाई ही मुलगी. श्रृंगारपूरच्या या लेकीच्या आयुष्यात जेवढी संकटे आली, तेवढी राजघराण्यांतील अन्य कोणत्याही स्त्रीला भोगावी लागली नसावीत. सर्व राजवैभव असूनही आयुष्यात सतत दुर्दैवच त्यांच्या मागे लागले होते. मराठ्यांच्या या महाराणीला तब्बल ३० वर्षे शत्रूच्या कारागृहात जीवन कंठावे लागले होते; परंतु येसूबाईंनी ज्या धैर्याने या संकाटांशी सामना केला, त्याला इतिहासात तोड नाही. भोसले राजघराण्याच्या सुनेला शोभेल अशाच त्या शेवटपर्यंत वागल्या. ४ जुलै १७१९ साली येसूबाई मोगलांच्या दिल्ली येथील कैदेतून परत आल्या होत्या. त्यांचा मृत्यू १७३१ साली झाला.