वेळेश्वर मंदिर / दत्त मंदिर

लाडघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी\

दापोली तालुक्यातील लाडघर गावातील तामसतीर्थाजवळ असलेले वेळेश्वर मंदिर हे कोकणातील प्राचीन प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या या पांडवकालीन मंदिरातील वेळेश्वर हा लहान मुलांच्यावेळा’ (हातपाय शरीर बारीक होऊन पोट वाढण्याचा आजार) बरा करणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील तीर्थ प्राशन केल्याने वेळा झालेली मुले निरोगी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. वेळा बरा करणारा देव म्हणूनच या देवाचे नामकरण वेळेश्वर असे झाले आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की समुद्रकिनाऱ्यावरील या मंदिराच्या जागेवर पूर्वी मोकळी जमीन होती. येथे मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले असे. गावातील एक गुराखी या जमिनीवर आपल्या गुरांना चरायला आणत असे. गावातील एक गायही वाट वाकडी करून त्या गुरांच्या मागून येत असे. असे बरेच दिवस चालू राहिल्यावर गुराख्याने तिच्यावर पाळत ठेवली. ती गाय दरदिवशी या गवतातील एका दगडावर पान्हा सोडते आणि त्यानंतर नजीकच्या समुद्रातील पाषाणाजवळून निघून जाते, असे त्याच्या निदर्शनास आले. त्याने ही बाब गाईच्या मालकाला सांगितली. त्यानंतर मालकाने त्या जागेवर पाहिले असता त्याला येथे शिवपिंडी दिसली. त्यानंतर या पिंडीभोवती लहानसे मंदिर बांधण्यात आले होते.

लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. हा महाराष्ट्रातील एकमेव असा किनारा आहे जो रंगीत दिसतो. तेथील रेती तांबड्या रंगाची असल्याने किनाऱ्यावरचे पाणी लालसर दिसते. त्यामुळे त्यासतामसतीर्थअसे म्हटले जाते. या किनाऱ्याला लागून असलेले वेळेश्वर मंदिर पांडवकालीन असल्याची मान्यता आहे. मंदिराचे सध्याचे बांधकाम हे पेशवेकालीन असल्याचे बोलले जाते. दापोलीबुरोंडी मार्गावरील वेळेश्वर गावात रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे. मंदिराला पेशवेकाळापासून आतापर्यंत सनद मिळत आहे. येथील प्रवेशद्वार जांभ्या दगडातील तटबंदीचे बांधकाम नव्याने केल्याचे जाणवते. छोट्या प्रवेशद्वाराजवळ नगारखाना असून त्याच्या शेजारी दीपस्तंभ आहे. दीपस्तंभाच्या खालच्या बाजूला छोटे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप कौलारू असून त्यातील एका चौथऱ्यावर संगमरवरी नंदी आहे. या चौथऱ्यावर नक्षीकाम केलेले दिसते. भाविकांना बसण्यासाठी सभामंडपात दगडी आसनव्यवस्था आहे. सभामंडपापासून काहीसे उंचावर अंतराळ गर्भगृह आहे. अंतराळातून प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा करण्यात आली आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील अखंड शिवपिंडी आहे. ‘वेळालागणाऱ्या बालकांना मंदिरात आणून येथील तीर्थ प्राशन करायला दिल्यास तो बरा होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक पालक अशा बालकांना घेऊन या मंदिरात येत असतात.

मंदिर परिसरात बालगणेशाचे मंदिर आहे. तेथे शेंदूरचर्चित बालगणेशाची उभी मूर्ती आहे. बाजूलाच मारुती मंदिरही आहे. ही दोन्ही मंदिरे कौलारू आहेत. या मंदिराशिवाय लाडघर किनाऱ्याला लागून एक प्राचीन प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की लाडघर गावातील ग्रामस्थ पांडुरंग मोरे या दत्त उपासकाला श्रीदत्तांच्या स्वप्नदृष्टांतानुसार गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर औदुंबराच्या बुंध्याशी दत्तपादुका आढळल्या होत्या. त्या पादुकांची येथे स्थापना करण्यात आली आणि कालांतराने तेथे मंदिराची निर्मिती झाली.

दत्त मंदिराच्या शेजारी काळभैरवाचे स्थान आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळात दत्त मंदिर परिसरात दाट जंगल होते हिंस्त्र प्राण्यांची संख्याही जास्त होती. एकदा दत्त मंदिरातील उत्सवासाठी आलेल्या ग्रामस्थाचा वाघाने बळी घेतला होता. यावर उपाय म्हणून तेव्हा ग्रामस्थांनी देवांचा सेनापती असलेल्या श्रीकाळभैरवाचे मंदिर येथे बांधले आणि उत्सवाला नैवेद्य म्हणून कोंबडा बोकड बळी देण्याची प्रथा सुरू केली. श्रीकाळभैरवाचा उत्सव इतर ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या काळभैरव जयंतीला असतो; पण लाडघर गावात मात्र तो दत्त जयंतीला जोडून साजरा केला जातो. दत्त जन्माच्या एक दिवस आधी हा उत्सव साजरा होतो. आता इतर प्रथा तशाच ठेऊन बळी प्रथा मात्र कायमची बंद करण्यात आली आहे.

दत्त जयंतीच्या दोन दिवस आधी दत्त संप्रदायाप्रमाणे येथून भिक्षेसाठी वारी निघते. दोन दिवस ही वारी बुरोंडी, करजगाव, लालबाग, लाडघर कर्दे गावात जाते. वारीच्या दुसऱ्या दिवशी काळभैरवाला नवस बोलले जातात आणि आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. पुढचा दिवस जन्मकाळाचा असतो, त्यावेळी रात्री साडेआठपासून पहाटेपर्यंत मंदिरात भजन, कीर्तन आदी कार्यक्रम होतात. जन्मकाळाच्या दुसऱ्या दिवशी दत्तात्रयांची पालखी मंदिरातून बाहेर पडते आणि तामस तीर्थावरील वेळेश्वर मंदिर चंडिका मंदिरात जाऊन पालखी पुन्हा दुपारच्या सुमारास मंदिरात येते. पालखीच्या दिवसापासून पुढील तीन दिवस येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी लाडघरचा समुद्र किनारा भाविकांच्या गर्दीने फुललेला असतो.

उपयुक्त माहिती:

  • दापोलीपासून १० किमी, तर रत्नागिरीपासून १२० किमी अंतरावर
  • दापोली, मंडणगड येथून एसटी सुविधा
  • खासगी वाहने दोन्ही मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : विवेक बागकर, अध्यक्ष, मो. ९८३३६३५५२९,
  • नितेश शेवडे, उपाध्यक्ष, मो. ९११९५७७५९७
Back To Home