श्रीक्षेत्र गणपतीपुळेनजीक चाफेरी गावात असलेले जय विनायक मंदिर हे कोकणात येणाऱ्या भाविकांसोबतच पर्यटकांचेही विशेष आकर्षण आहे. जिंदाल समूहाने बांधलेल्या या आधुनिक मंदिराची रचना प्राचीन मंदिरांच्या बांधकामशैलीशी मिळतीजुळती आहे. मंदिराच्या बांधणीत बौद्ध तसेच हिंदू वास्तुशैलीचा अनोखा संगम पाहावयास मिळतो. सुंदर पद्धतीने विकसित केलेल्या उद्यानाच्या मध्यभागी जय विनायकाचे मंदिर स्थित आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य असे की २७ नक्षत्रांप्रमाणे त्या त्या नक्षत्रांच्या नावांच्या झाडांची यामध्ये लागवड केलेली आहे, त्यामुळे हे उद्यान ‘नक्षत्र उद्यान’ म्हणून ओळखले जाते.
गणपतीपुळे–जयगड मार्गावर हे मंदिर आहे. जिंदाल समूहाच्या जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडतर्फे हे मंदिर २०१३ मध्ये उभारण्यात आलेले आहे. जांभ्या दगडांची तटबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरील हिरवळीवर कोरलेली ॐ तसेच स्वस्तिक ही हिंदू धर्माची मंगल प्रतीके लक्ष वेधून घेतात. नक्षत्र उद्यानात प्रवेश केल्यावर येथील हिरवागार परिसर प्रसन्न भासतो. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत नागमोडी वळणांची जांभ्या दगडांची फरसबंदी पायवाट आहे. या उद्यानात मंदिराच्या आग्नेय कोपऱ्यात जांभ्या दगडांत बांधलेले जलकुंड आहे. या जलकुंडात वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे, तसेच कासवे पाहायला मिळतात.
जलकुंडापासून काही पावलांवर असलेल्या जांभ्या दगडांच्या पायऱ्यांजवळ मंदिराचा नगारखाना आहे व त्याच्या दोन्ही बाजूला दीपमाळा आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला छोट्या मेघडंबरीत हनुमानाची सहा फूट उंचीची मूर्ती आहे. मंदिरासमोरच असलेल्या मूषकमंडपात गणपतीचे वाहन असलेला मूषकराज विराजमान आहे. हातात मोदक असलेल्या या मूषकाच्या पितळी मूर्तीवर सुबक नक्षीकाम केलेले दिसते. जय विनायक मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी जांभ्या दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यात सिमेंटचा अत्यल्प वापर करण्यात आला आहे. आकर्षक रचना असलेल्या या मंदिराचे शिखरही वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीचे आहे. मंदिराच्या मागील बाजूकडील भिंतींवर ‘वक्रतुंड महाकाय…’ कोरले असून त्यावरच्या बाजूस गणपतीचे शिल्प आहे. येथील भिंतीवर बालगणेशाला घेऊन बसलेल्या शंकर–पार्वतीची आकर्षक शिल्पेही कोरण्यात आलेली आहेत. या शिल्पांच्या पायाखाली शंकराचे वाहन असलेला नंदी, तसेच गणेशाचे वाहन असलेला मूषकही आहे. प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या मागील भागातून डावीकडे पाहिल्यास समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. सायंकाळच्या वेळेस दररोज मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात येते, त्यामुळे मंदिराचे देखणे रूप आणखीनच खुलते.
मूषकमंडप, प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर आकर्षक कलाकुसर आहे. वरील दोन्ही बाजूला सोंड उंचावलेले गजराज व मध्ये मंगलकलश कोरण्यात आलेला आहे. वरच्या बाजूस सुबक सूर्यप्रतिमा आहे. सभामंडपात तसेच गर्भगृहाच्या वरच्या भागात लाकडी बांधकाम आहे. मंदिराचे गर्भगृह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आले आहे. येथे सहा खांब असून वरच्या भागात अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत. मखरात जयविनायकाची सिंहासनाधिष्ठित प्रसन्न मूर्ती आहे. आठ फूट उंच आणि सुमारे ८०० किलो वजनाच्या, शेला–पितांबर नेसलेल्या या मूर्तीच्या एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक असून चौथा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. ही मूर्ती मुंबईतील मूर्तिकाराकडून बनविण्यात आलेली आहे.
१३ फेब्रुवारी २०१३ रोजी, माघ शुद्ध चतुर्थीला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पूजेसाठी मूर्तीजवळ गणपतीची लहान मूर्ती ठेवण्यात आली आहे. मंदिरातील पुजारी नित्यनेमाने पूजा–अर्चा, अभिषेक व आरती करतात. येथे दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला आवर्तने तसेच स्थानिक कलाकारांची भजने होतात. बऱ्याचदा बाहेरील कलाकारांचे गायन, भजन, अभंगवाणी आदी कार्यक्रमही होतात. सकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जयविनायकाचे दर्शन घेता येते. भक्तांच्या विनंतीनुसार येथे विविध प्रकारचे अभिषेकही होतात. (संपर्क : अमित भातखंडे, व्यवस्थापक, मो. ९५५२५७७३९३)
मंदिराच्या तळमजल्यावर कलाधाम आहे. येथे कोकणातील कलाकारांची कलाकृती तसेच बचतगटांची उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात. आवडल्यास ती उत्पादने विकतही घेता येतात. कलाधाममधून बाहेर पडल्यावर एक छोटी पायवाट लागते. तेथून पुढे गेल्यावर एक छोटे धरण लागते. येथील निसर्गरम्य वातावरणात राहू इच्छिणाऱ्या भक्तांसाठी सर्व सोयींनी युक्त असे भक्त निवासही बांधण्यात आलेले आहे. (संपर्क : मंदिर समिती कार्यालय, दू. ०२३५७ २४२५०५)