लक्ष्मीकेशव मंदिर

बिवली, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी 

समुद्रकिनारे, गर्द झाडी अशा निसर्गसमृद्ध परिसरासोबतच कोकणात मोठ्या प्रमाणात शिल्पश्रीमंतीही आहे. येथे ठिकठिकाणी अनेक वैशिष्ट्यपूर्ण एकाहून एक सरस अशी शिल्पे कातळशिल्पे आहेत. त्यातही केशव आणि लक्ष्मीकेशव यांच्या मूर्ती येथील अनेक मंदिरांत आढळतात. विष्णू मूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्मशंखचक्रगदा असा असल्यामुळे या मूर्ती केशवमूर्ती प्रकारात मोडतात. असेच एक अत्यंत देखणे शिल्प म्हणजे चिपळूणजवळ असलेल्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.

चिपळूणकरंबवणे मार्गावरून बिवली येथे जाता येते. पेशवाईतील कर्तबगार न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर बिवली येथील नीळकंठशास्त्री थत्ते हे न्यायमूर्ती झाले. प्राचीन काळी समुद्रमार्गे या भूमीवर अनेक परकीय आक्रमणे होत असत. तेव्हा मूर्तीभंजन टाळण्यासाठी ग्रामस्थांकडून येथील मूर्ती विहिरीत तलावात लपवून ठेवल्या जात असत. कधीकधी त्या जमिनीतही ठेवल्या जात असत. यापैकीच एक लक्ष्मीकेशव मूर्ती नीळकंठशास्त्री थत्ते यांच्या पूर्वजांना आंजर्ले येथे सापडली होती. तेथे त्यांनी लहानसे मंदिर बांधून त्यात तिची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर या थत्ते मंडळींनी बिवली हे गाव वसवले. नंतर तिथे केतकर, अभ्यंकर, गोखले, सोहोनी आदी घराणी राहावयास आली. येताना त्यांनी लक्ष्मीकेशवाची मूर्तीही आपल्यासोबत आणली होती. नीळकंठशास्त्री थत्ते यांनी या प्राचीन विष्णू मूर्तीची बिवली येथे मंदिर बांधून पुनर्स्थापना केली. मूर्ती अभ्यासकांच्या मते ही मूर्ती अकराव्या किंवा बाराव्या शतकातील आहे. पेशवेकाळात या मंदिराला वार्षिक ३६ रुपयांचे वर्षासन सुरू करण्यात आले होते.

. . १८३० साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. निसर्गरम्य परिसरात टुमदार मंदिर वसलेले आहे. मंदिराजवळून बारमाही पाण्याचा पाट वाहत असतो. मंदिराभोवती जांभ्या दगडाची तटबंदी आहे. दर्शनमंडप, खुला सभामंडप, मुख्य सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या मुख्य कमानीवजा प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या पुढे दर्शनमंडप आहे तेथे भाविकांना बसण्यासाठी दगडी बाकांची रचना आहेतेथून पुढे मोठा खुला सभामंडप आहे. सभामंडपाचे संपूर्ण काम हे लाकडांत आहे. यात गुरुडदेवतेची स्वतंत्र मंडपवजा घुमटी आहे. त्यात संगमरवरी गरुडाची नमस्कारमुद्रेतील मानवदेहधारी मूर्ती आहे.

गर्भगृहात एका चौथऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेली आणि प्रभावळीत परिवार देवता असलेली श्रीविष्णूची मूर्ती आहे. डोक्यावर शोभिवंत करंड मुकुट असून समृद्धीचे प्रतीक असलेला त्रिवलयांकित (तीन माळा) गळा आहे. गळ्यातील तीन माळांपैकी एका माळेतील पदकात आंबे कोरलेले आहेत. मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात असलेले कमळाचे देठ आणि त्याच्या पाकळ्या यांची रचना अशी आहे की एका बाजूने पाहिल्यास ते कमळ नसून एखाद्या स्त्रीची मूर्ती वाटते. स्थानिक लोक त्यालाच लक्ष्मी असे संबोधतात आणि त्यामुळे हा देव लक्ष्मीकेशव म्हणून प्रसिद्ध आहे. मूर्तीच्या डाव्या पायाजवळ श्रीदेवी उजव्या पायाजवळ नमस्कारमुद्रेत गरुड आहे. त्यांच्या बाजूला चवऱ्या ढाळणाऱ्या सेविका आहेत. देवाच्या अंगावरील दागदागिने अत्यंत नाजूक आणि कलात्मक पद्धतीने कोरलेले दिसतात. हाताच्या सर्व बोटांमध्ये अंगठ्या दिसतात. अनेक दागिन्यांनी मढवलेली विष्णूची मूर्ती देखणी आणि सुंदर भासते. मंदिरात भाविकांना विविध प्रकारचे अभिषेक एकादष्णी विधी करता येतात. (संपर्क : ८८०५४९७६३२, ९४०३१४५९६१)

मंदिराव्यतिरिक्त बिवली हे गाव प्रसिद्ध आहे ते येथीलगुलाबीनावाच्या प्राचीन आंब्याच्या झाडांसाठी. लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांची बिवली ही सासूरवाडी होय. येथील इंदूताई केतकर या त्यांच्या पत्नी. केतकरांकडे अप्रतिम चव गोड असे एक गुलाबी नावाच्या जातीचे आंब्याचे झाड आहे, ते सुमारे २५० वर्षांपूर्वीचे आहे. या झाडावरील आंबे हे खास येथून पुण्याला पेशव्यांकडे जात असत. येथून आंबे नेण्यासाठी पेशव्यांचे घोडेस्वार दरवर्षी पुण्याहून येत असत.

ऐतिहासिक महत्त्व असलेले बिवली परिसर पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. मंदिरापासून दोन किमी अंतरावर वासिष्टी नदीच्या तीरावर मालदोली हे गाव वसले आहे. येथील महत्त्वाचे आकर्षण आहे ते वासिष्टीच्या किनाऱ्यावर ऊन खात पहुडलेल्या अनेक मगरी. ज्या प्रमाणे जंगल सफारी असते, तशीच मालदोली येथे पर्यटकांसाठी मगर सफारी आहे. एका यांत्रिक बोटीत बसून पर्यटकांना ही सफर घडवून आणली जाते. मगर सफरीसाठी भरतीओहोटी पाहून जाणे सोयीस्कर ठरते. ओहोटीच्या वेळी जेव्हा पाणी कमी असते तेव्हा मगरी दिसण्याचे प्रमाण जास्त असते. याशिवाय यावेळी किनाऱ्यावर विविध पक्षीही पाहायला मिळतात. मगर सफरीची योग्य वेळ अधिक माहितीसाठी संपर्क : संदेश संसारे, मो. ९८९०८१६४६९, ८४५९३५४२११.

उपयुक्त माहिती:

  • चिपळूणपासून २० किमी, तर रत्नागिरीपासून १०६ किमी अंतरावर
  • चिपळूणपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंगेश थत्ते, अध्यक्ष, मो. ९७६५३८६२६९, प्रदीप गोखले, सचिव, मो. ८८०५४९७६३२
Back To Home