थोरला केशव / धाकटा केशव

शीर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी

कोकणात शंकराच्या मंदिरांखालोखाल विष्णूची मूर्ती असलेली लहानमोठी अनेक मंदिरे आहेत. त्यातही सर्वाधिक केशवमूर्ती असतात. कोळीसरे, सडवे, बिवली शेडवई येथील एकाहून एक वैशिष्ट्यपूर्ण केशवमूर्ती हे कोकणातील वैभव समजले जाते. याच शृंखलेतील आणखी एक गाव कोकणात आहे ते म्हणजे गुहागर तालुक्यातील शीर. या एकाच गावात चक्क दोन केशव मंदिरे आहेत आणि तिही शेजारीशेजारी. येथील मूर्तींच्या आकारानुसार थोरला केशव धाकटा केशव या नावांनी परिचित आहेत

अन्नपूर्ण नदीच्या किनारी शीर हे गाव वसले आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार शीर येथे दहाव्या शतकापासून वस्ती आहे. यादवांच्या काळात मौजे सिर ऊर्फ वेळंब येथे सरदार पवार यांनी कासारदुर्ग नावाची गढी बांधली होती. काटदरे कुटुंबाचे हे मूळ गाव आहे. या गावात थोरला लक्ष्मीकेशव हे मोठे मंदिर, तर भास्कर पुरुषोत्तम काटदरे यांच्या घराच्या आवारात धाकट्या लक्ष्मीकेशवाचे स्थान आहे. या दोन्ही विष्णूमंदिरांच्या मूर्ती प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेल्या आहेत. त्या तेराव्या वा चौदाव्या शतकातील असाव्यात, असे मूर्तिशास्त्र अभ्यासकांचे मत आहे.

येथील थोरला केशव मंदिर हे कोकणी पद्धतीचे टुमदार कौलारू मंदिर आहे. चहुबाजूने तटबंदी असलेल्या मंदिराच्या बांधकामात चिऱ्याचे दगड लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. या दुमजली मंदिराची रचना दोन सभामंडप गर्भगृह अशी आहे. दोन फूट उंच जोत्यावर हे मंदिर असून पहिल्या सभामंडपात दोन फूट उंचीच्या भिंती त्यावर लाकडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. दुसरा सभामंडप तुलनेने मोठा आहे त्यात अनेक लाकडी खांब एकमेकांशी जोडलेले आहेत. येथील गर्भगृहात श्रीलक्ष्मीकेशवाची सुमारे एक मीटर उंचीची सुंदर देखणी मूर्ती आहे.

येथील विष्णूची मूर्ती समभंग (दोन्ही पायांवर सारखाच भार देऊन) अवस्थेत उभी आहे. मस्तकावर धारण केलेल्या करंडक मुकुटावर सूक्ष्म कोरीव काम आहे. भुवया धनुष्याकृती असून पूर्ण उघडलेले दोन्ही नेत्र सुरेख भासतात. मुकुटाखालून कानांवरून आलेल्या बटा, कर्णकुंडले, गळ्यात दोन एकसरी आणि पोटापर्यंत लोंबलेली एक लांब माळ, दोन्ही खांद्यांवर स्कंदपत्रे, दंडांत केयूर (बाजूबंद), मनगटांवर जाडसर कंकणे मनगटांपासून तळव्याकडे आलेला दागिना आहे. चतुर्भुज असलेल्या या मूर्तीच्या उजवीकडील वरच्या हातात शंख, तर खालच्या हातात कमळाचा दांडा आहे. डावीकडील वरच्या हातात चक्र खालच्या हातातील गदा खाली टेकलेली आहे. या गदेवर कीर्तिमुखासारखी आकृती कोरलेली दिसते. याशिवाय छातीवर उरुबंध (एक अरुंद पट्टा), डाव्या खांद्यावरून गुडघ्यांपर्यंत आलेला हार (प्रलंबहार), डाव्या खांद्यावरून रुळणारे यज्ञोपवीत (जानवे), कंबरपट्ट्यातून खाली मांडीपर्यंत लोंबणाऱ्या माळा, दोन्ही पायांमध्ये पादांगुले (पैंजण) घोट्यांवर नक्षीदार तोडे, उजव्या पायाशी वीरासनात बसलेला गरुड त्यामागे एक चवऱ्या ढाळणारी स्त्री, डाव्या पायाजवळ कमळधारी श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि तिच्यामागे एक चवऱ्या ढाळणारी स्त्रीप्रतिमा कोरलेल्या आहेत. आयुधक्रमानुसार पद्मशंखचक्रगदा () ही मूर्ती केशवविष्णूची ठरते, तर वामांगी म्हणजे डाव्या हाताला कमळधारी लक्ष्मी असल्यामुळे ही मूर्ती श्रीलक्ष्मीकेशवाची ठरते.

मूर्तीच्या मागील प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. या प्रभावळीत उजवीकडे मत्स्य, कूर्म, वराह, योगनृसिंह आणि छत्रीधारी आसनस्थ वामन असे पाच अवतार दिसतात. प्रभावळीच्या मध्यभागी मुकुटाच्या वर कीर्तिमुख आहे. प्रभावळीच्या डाव्या बाजूला बलराम, श्रीराम, परशुराम, बुद्ध अश्वारूढ कल्की आहेत.

मंदिरापासून जवळच रस्त्याच्या पलीकडे भास्कर पुरुषोत्तम काटदरे यांच्या घराच्या आवारात एक लहानसे मंदिर आहे. त्यात दोन फूट उंचीची श्रीलक्ष्मीकेशवाची मूर्ती आहे. ही मूर्ती धाकटा केशव म्हणून परिचित आहे. काळ्या पाषाणात असलेली ही मूर्तीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील मूर्तीचे वेगळेपण म्हणजे विष्णूच्या डाव्या पायाजवळ श्रीदेवी (श्रीलक्ष्मी) असून उजव्या पायाजवळ गरुड आणि त्यामागे श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे.विष्णूची ही प्रतिमाही समभंग स्थितीत उभी आहे. डोक्यावर कमी उंचीचा उभट मुकुट आहे. कानात कर्णभूषणे, गळ्यात प्रथम एकसरी, मग फलकहार आणि त्यानंतर मोठी मण्यांची अशी त्रिवलयी माळ आहे. बोटांमध्ये अंगठ्या, मनगटांवर कंकणे, दंडांत बाजूबंद आहेत. कमरेला मेखलायुक्त कंबरपट्टा आहे. चतुर्भुज मूर्तीच्या उजवीकडील वरच्या हातात शंख खालच्या हातात कमळपुष्प आहे. डावीकडील वरच्या हातात चक्र आणि खालच्या डाव्या हातात गदा असून ती खालपर्यंत टेकलेली आहे. मूर्तीच्या पायांत तोडे आहेत.

मूर्तीच्या मागे असलेल्या प्रभावळीत उजवीकडील भागात अश्वारूढ कल्की, धनुर्धारी राम, आसनस्थ बुद्ध, वराह, मत्स्य ही शिल्पे आहेत. प्रभावळीच्या मध्यभागी मुकुटाजवळ वामनावतार कोरलेला दिसतो. प्रभावळीत डावीकडे कूर्म, हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन पोट फाडणारा नृसिंह, परशुराम आणि कृष्णावताराऐवजी बलराम यांचे शिल्पांकन आहे. नेहमीपेक्षा वेगळा अवतारक्रम हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे.

उपयुक्त माहिती:

  • गुहागरपासून २३ किमी, रत्नागिरीपासून  ६७ किमी अंतरावर
  • गुहागरपासून एसटीची सुविधा
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
Back To Home