मल्लिकार्जुन मंदिर

कोलधे, ता. लांजा. जि. रत्नागिरी

निसर्गाची देणगी लाभलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोलधे या गावाला ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर, आहारमहर्षी काकासाहेब तांबे, सदाशिव धोंडो तथा तांबे शास्त्री यांचे हे मूळ गाव! याच गावातील चौदाव्या शतकातील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर प्रसिद्ध आहे. जागृत स्वयंभू मल्लिकार्जुन मंदिरात होणारा महाशिवरात्रीचा उत्सव हा तालुक्यातील मोठ्या उत्सवांपैकी एक समजला जातो.

मंदिराची अख्यायिका अशी की सध्या मंदिर असलेल्या भागात पूर्वी जंगल होते. गावातील तांबे नावाच्या ब्राह्मणाकडे काही गायी होत्या. रेवळ नावाचा गुराखी त्या गायी येथील जंगलात चरायला आणत असे. या गायींपैकी एक गाय येथील एका दगडावर पान्हा सोडत असे. अनेक दिवसांपासून तिचा हा दिनक्रम सुरू होता. अनेक दिवस तिच्यावर नजर ठेवून असलेला गुराखी एके दिवशी ती पान्हा सोडत असलेल्या ठिकाणी आला असता त्याला शिवपिंडी दिसली. त्याच्याकडून ही बाब समजल्यानंतर तांबे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने येथे शिवमंदिर उभारले. मंदिराच्या अंतराळात लाकडी खांबांच्या वरील बाजूस कोरलेल्या प्रतिकृती या कथेशी संबंधित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गावातील तांबे आडनावाच्या काही कुटुंबांकडे त्यांच्या पूर्वजांची हस्तलिखिते आहेत. त्यावरून या कुटुंबांच्या मूळ पुरुषाचा कालखंड चौदाव्या शतकातील असल्याचे कळते. हे मंदिर त्यापूर्वीचे असल्याचा उल्लेख या हस्तलिखितांमध्ये आहे. सदाशिव तांबे तथा तांबे शास्त्री यांनी लिहून ठेवलेल्या हस्तलिखितांमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने कोलधे येथील मल्लिकार्जुन मंदिर, आदित्यनारायण मंदिर, तसेच पाली येथील लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर या मंदिरांसाठी देणगी दिल्याचा उल्लेख आहे. या पुरातन मंदिराच्या १९७८ ते १९८२ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर त्याला सध्याचे स्वरूप आले आहे.

पारंपरिक भातशेती, नारळीपोफळीच्या बागा, आंबे, फणस, काजू कोकमाची झाडे अशा निसर्गसमृद्ध परिसरात कोलधे गाव वसलेले आहे. येथील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिरामुळे हे गाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. या मंदिराभोवती जांभ्या दगडांत बांधलेली पोवळी (तटबंदी) आहे. तटबंदीच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर तेथे तीन लहान एक मोठी अशा चार दीपमाळा दिसतात. त्यावर त्रिपुरारी पौर्णिमेला विविध मानकऱ्यांकडून मानाप्रमाणे दिवे लावण्यात येतात. प्रांगणात जांभ्या दगडांचीच फरसबंदी आहे.

सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिर कौलारू असून त्याचे संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडांत केलेले आहे. त्यासाठी कोठेही सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. हेमाडपंती रचनेप्रमाणे दोन दगडांची सूक्ष्म अचूक जुळणी करण्यात आलेली आहे. सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप अर्धमंडप स्वरूपाचा आहे. येथे भाविकांना बसण्यासाठी बाजूने कक्षासने आहेत. लाकडी बांधकाम असलेल्या सभामंडपातील खांबांच्या वरच्या भागात कलाकुसर करण्यात आली आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अखंड पाषाणातील नंदीचे दर्शन होते. अंतराळाच्या उजव्या बाजूला नागफणा असलेला पितळी शिवमुखवटा आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वारावर कीर्तिमुख आहे. या परिसरात सर्वत्र जांभा दगड असूनही येथील गर्भगृहातील मल्लिकार्जुनाची पिंडी ही अखंड काळ्या पाषाणाची आहे. या मंदिराच्या मागील बाजूस कालकाई मंदिर आहे. त्याची बांधणी मात्र आधुनिक स्वरूपाची आहे.

माघ वद्य दशमी ते फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या काळात येथे महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असतो. यावेळी येथे भरणाऱ्या यात्रेमुळे हा परिसर गर्दीने फुलून जातो. या उत्सवादरम्यान देवाचा चांदीचा मुखवटा पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाते. दुसरा चांदीचा मुखवटा शिवपिंडीवर ठेवला जातो. उत्सवादरम्यान टाळमृदुंगाच्या गजरात केल्या जाणाऱ्या भोवत्या नृत्यात भाविक तल्लीन होऊन सहभागी होतात. (भोवत्या हे कोकणातील पारंपरिक नृत्य आहे. उत्सवांदरम्यान आरती झाल्यावर मंदिराभोवती अभंग भजन म्हणत पालखीसह प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात फेर धरून भाविक एखाद्या पदाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने नाचतात.) याशिवाय श्रावण सोमवारी कार्तिक महिन्यातील सोमवारी येथे भाविकांची गर्दी होते. दर महिन्याला रुद्र एकादष्णी, आषाढ महिन्यात एक्का (२४ तास अखंड नामजप) लघुरुद्र, त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपूर पूजन प्रज्वलन असे वर्षभरात विविध कार्यक्रम येथे होत असतात.

कोलधे हे गाव पराक्रम, शौर्य, त्याग देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाईंचे माहेर आहे. पेशव्यांचे व्यवस्थापक म्हणून काम करणारे लक्ष्मीबाईंचे वडील मोरोपंत तांबे यांचे हे मूळ गाव. राणी लक्ष्मीबाईं यांचे मूळ नाव मणिकर्णिका होते. काशी येथे जन्मलेल्या राणी लक्ष्मीबाई तीनचार वर्षांच्या असताना त्यांच्या मातोश्री आई भागिरथीबाईंचे निधन झाले. त्यानंतर मोरोपंत हे लक्ष्मीबाईंना घेऊन पेशव्यांच्या आश्रयी गेले. तेथे युद्धकला आत्मसात केलेल्या लक्ष्मीबाईंचा वयाच्या सातव्या वर्षी, १८४२ मध्ये झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाला. नेवाळकर यांचे मूळ गावही लांजानजीकचे कोट हे आहे. मल्लिकार्जुन मंदिराशिवाय कोलधे गावात श्री महालक्ष्मी, लक्ष्मीकांत आदित्यनारायण यांची मंदिरे आहेत. ही मंदिरेही ४०० ते ५०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते.

उपयुक्त माहिती:

  • लांजापासून १० किमी, तर रत्नागिरीपासून ३५ किमी अंतरावर
  • लांजा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : तुषार लिंगायत, सेवेकरी, मो. ९४२१२३०६०९
Back To Home