रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात गोंधळे गावातील हरिहरेश्वर मंदिर कोकणातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. निसर्गाच्या कुशीत, गर्द हिरवाईने नटलेल्या व ताम्रपर्णी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर पेशवेकालीन आहे. येथील शिवपिंडी नेपाळच्या राजाकडून पेशव्यांना भेट मिळाली होती. त्यांच्या अधिकाऱ्यांनी ती चोरून आणून येथे तिची स्थापना केली होती. हे चौर्यकर्म आहे की असीम भक्ती, याबाबत मतमतांतरे असली तरी नेपाळमधील गंडकी नदीतील दगडातून घडविलेली जांभळ्या रंगाची गुळगुळीत शिवपिंडी हे येथील आकर्षण आहे.
या मंदिराची कथा अशी की नेपाळच्या राजाकडून पेशव्यांना गंडकी नदीतील पाषाणातून घडविलेली शिवपिंडी भेट म्हणून मिळाली होती. त्यावेळी आप्पाजी चिमणाजी गोंधळेकर हे पेशव्यांच्या दरबारी मोठ्या हुद्द्यावर काम करीत होते. त्यांच्या मनात ही शिवपिंडी भरली व आपल्या गावी म्हणजे गोंधळे येथे मंदिर बांधून त्यात या पिंडीची स्थापना करावी, अशी त्यांना इच्छा झाली. त्याप्रमाणे त्यांनी पेशव्यांकडे या पिंडीची मागणी केली; परंतु पेशव्यांनी त्यांची विनंती साफ फेटाळून लावली. गोंधळेकर हे शिवभक्त होते, शिवभक्ती त्यांना स्वस्त बसू देईना. त्यांनी आपल्या गावी गोंधळे येथे एक मंदिर बांधले व पेशव्यांकडील ही पिंडी शिताफीने पळवून आणून तिची त्यात प्रतिष्ठापनाही केली. पेशव्यांना जेव्हा हे कळाले, तोपर्यंत प्राणप्रतिष्ठा झाली होती. त्यामुळे त्यांना काही करता आले नाही. चोरी चांगल्या कारणांसाठी केली असल्याने त्यांना फार मोठी शिक्षा न करता केवळ त्यांचे काही अधिकार पेशव्यांनी काढून घेतले होते.
आप्पाजी चिमणाजी गोंधळेकर यांचे मूळ आडनाव साठे होते. पिरंदवणे येथून येऊन त्यांनी गोंधळे गावाची १७७९ मध्ये खोती विकत घेतली होती. त्याआधी १७७३–७४ मध्ये ते पेशव्यांकडील मोठे वजनदार आसामी समजले जात असत. शिवपिंडीमुळे पेशव्यांची गैरमर्जी झाल्यावर त्यांनी हरेश्वर देवाची पूजा गोखले यांच्यावर सोपविल्याची नोंद आहे. याच गोंधळेकर घराण्यातील मोरो विश्वनाथ गोंधळेकर हे सवाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांचे मावसभाऊ होत. गुहागर–चिपळूण मार्गावर मार्गताम्हाणेपासून दोन किमी अंतरावर गोंधळे गावात जाण्यासाठी रस्ता आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव निसर्गसमृद्ध परिसरात स्थित आहे. रस्त्यालगत असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील काही पायऱ्या उतरल्यावर प्रांगणात प्रवेश होतो. सुमारे २० गुंठे जागेत असलेल्या या मंदिराची उंची पायापासून ६० फूट आहे. येथील संपूर्ण प्रांगणात जांभ्या दगडांची फरसबंदी आहे. मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या गोमुखातून पिंडीवरील अभिषेकाचे तीर्थ बाहेर पडते. मंदिराच्या आवाराच्या मागील बाजूला काही दगडी मूर्ती, तसेच देवकोष्ठे आहेत. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या समोरील बाजूस पत्र्याचे शेड आहेत. नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. लाकडी सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीमंडपात अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपालांच्या आकर्षक मूर्ती व खालच्या बाजूला कीर्तिमुख आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडील देवळीत व गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाच्या मूर्ती आहेत.
गर्भगृहात वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहे. येथील बाण (शंकराची पिंडी) गंडकी शिळेप्रमाणे जांभळ्या रंगाची आहे. सुमारे एक फूट उंच, लांबट व वर्तुळाकार असलेल्या या बाणाचा व्यास दीड फूट आहे. हा बाण इतका गुळगुळीत आहे की पाहणाऱ्याला त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते. या मंदिराच्या घुमटावर काही माहिती लिहिली आहे ती अशी, ‘श्रीहरिहरेश्वर या देवालयाचे काम शके १६९६ मध्ये पुरे होऊन अर्चा झाली. (माघ १४, गुरुवार) (म्हणजे इ. स. १७०४) अप्पाजी चिमणाजी गोंधळेकर यांनी बांधले. त्याचा जीर्णोद्धार रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी शके १८२६ (म्हणजे इ. स. १९०४) मध्ये लोकांच्या मदतीने केला.’
मंदिराच्या मागील बाजूस इंग्रजी ‘एल’ आकाराची ४० पायऱ्यांची प्राचीन विहीर आहे. तिचे बांधकाम जांभ्या दगडात करण्यात आलेले आहे, विहिरीच्या भिंतींवर दिवे ठेवण्यासाठी कोनाडे करण्यात आले आहेत. या विहिरीला बाराही महिने पाणी असते.