देव गांधारेश्वर मंदिर / देवी भवानी मंदिर

चिपळूण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीच्या काठावर असलेले स्वयंभू गांधारेश्वर देवी भवानी मंदिर हे येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गांधारीच्या झुडपांमध्ये येथील शिवलिंग सापडले म्हणून या देवाला गांधारेश्वर असे नामकरण प्राप्त झाले आहे. हे मंदिर प्राचीन असून ते पांडवांनी अज्ञातवासात असताना एका रात्रीत बांधले, अशी मान्यता आहे. गांधारेश्वरासोबतच येथे देवी भवानीचे स्थान आहे. ही देवी येथील हजारो कुटुंबीयांची कुलदैवत आहे.

गांधारेश्वर मंदिराची अख्यायिका अशी की वाशिष्ठी नदीच्या काठावर सध्या जेथे मंदिर आहे तेथे पूर्वी घनदाट जंगल होते. एका शेतकऱ्याच्या घरातील गाय दूध देत नव्हती, तेव्हा त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. ती गाय येथील गांधारीच्या झुडपांत उभी राहून आपला पान्हा सोडत होती. शेतकऱ्याने तेथे पाहिले असता त्याला तेथे शिवपिंडी दिसली. त्यानंतर ग्रामस्थांनी या पिंडीभोवती लहानसे मंदिर बांधले. यजमान गांधरेश्वराच्या सानिध्यात पार्वतीचा अवतार असलेल्या देवी भवानीचे मंदिर आहे. एकाच ठिकाणी शिव पार्वती यांची दोन स्वतंत्र मंदिरे हे येथील वैशिष्ट्य आहे.

श्री क्षेत्र गांधारेश्वर हे चिपळूण येथील वाशिष्ठी नदीच्या काठावर गणेश विसर्जन घाटाजवळ स्थित आहे. कोकणी पद्धतीच्या कौलारू रचनेचे हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी करण्यात आली असून मंदिराच्या मागील बाजूस गांधारेश्वर उद्यान आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर १२ फूट उंचीची दीपमाळ तुलशी वृंदावन आहे. तुलशी वृंदावनाजवळून नदीत उतरण्यासाठी मोठ्या दगडी पायऱ्या आहेत. सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील सभामंडप हा अर्धमंडप प्रकारातील असून त्यात तिन्ही बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या कक्षासनांच्या वरील बाजूस संपूर्ण सभामंडपात कमानीयुक्त बांधकाम केलेले दिसते. मंदिराच्या गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नसल्यामुळे सभामंडपातच डाव्या बाजूला स्त्रियांच्या विविध व्रतवैकल्यांसाठी जलाभिषेकासाठी श्रीगणेशाची मूर्ती, शिवपिंडी नंदीची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. सभामंडपातून पाच पायऱ्या उतरून गर्भगृहातील गांधारेश्वराच्या पिंडीजवळ जाता येते. येथील शिवपिंडी काळ्या पाषाणाची असून काहीशा खोलगट भागात आहे.

पाऊस येण्यास उशीर झाला अथवा दुष्काळ पडला तर गांधारेश्वर मंदिराचे गर्भगृह पूर्णपणे पाण्याने भरण्याची प्रथा आहे. शिवपिंडी पाण्याखाली गेल्यावर देवाला पाऊस पाडण्याचे आवाहन केले जाते. ग्रामस्थ भाविकांनी केलेल्या आवाहनानंतर पाऊस सुरू होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे उत्सव होतो. नागपंचमीपासून पुढे सात दिवस धार्मिक सप्ताह साजरा करण्यात येतो. या उत्सवाच्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराची असलेली ख्याती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारनेही या मंदिर परिसराला तीर्थक्षेत्राचादर्जा देऊन गौरव केला आहे.

गांधारेश्वर मंदिराच्या शेजारी देवी भवानीचे सुंदर मंदिर आहे. देवी भवानी ही शक्तिदेवता पार्वतीचे रूप असल्याची मान्यता आहे. असे सांगितले जाते की साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेले श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी आणि येथील देवी भवानी ही एकच आहे. ही देवी येथील हजारो घराण्यांची कुलदैवत आहे. देवी भवानीचे येथील स्थान अत्यंत जागृत समजले जाते.

तीन फूट उंच जोत्यावर देवी भवानीचे मंदिर आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात मखरात असलेली देवीची मूर्ती ही साडेतीन फूट उंचीची अखंड काळ्या पाषाणाची आहे. अष्टभुजा देवी सिंहासनावर असून मस्तकावरील मुकुटाखालून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. मुकुटावर शिवलिंग आहे. देवीच्या आठ हातांपैकी सहा हातांत त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य ही आयुधे, सातव्या हातात पानपात्र (पेला) आठव्या हातात राक्षसाची शेंडी आहे. देवीच्या पाठीवर बाणांचा भाता आहे. देवीचा उजवा पाय महिषासुर राक्षसावर असून डावा पाय जमिनीवर आहे. दोन पायांमध्ये महिषासुराचे तुटलेले मस्तक आहे.

देवी भवानी मंदिरात दरवर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होतो. याशिवाय पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. दर मंगळवारी, शुक्रवारी पौर्णिमेला देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. देवी भवानी ही वाशिष्ठी नदी किनाऱ्यावरील मिठागर, साळीवाडी, कुंभारवाडी, भोईवाडी, नलावडा शंकरवाडी (मुरादपूर) या येथील वाड्या वस्त्यांमधील नागरिकांची ग्रामदेवता आहे.

मंदिरांच्या प्रांगणात महात्मा गांधी रक्षाकलश समाधी मंदिर आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाली होती. चिपळूणमधील थोर स्वातंत्र्यसैनिक शांताराम धोंडो तांबट यांनी महात्माजींचा पवित्र रक्षाकलश मिळवून चिपळूणला आणला त्यावर येथे समाधी बांधली. १२ फेब्रुवारी १९४८ रोजी येथे सर्वोदय मेळावा झाला. त्याप्रसंगी कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाणारे पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब अन्य मान्यवर उपस्थित होते. तेव्हापासून हे पवित्र स्थळ गांधी प्रेमींसाठी प्रेरणास्थान बनले आहे. अप्पासाहेब हे महात्मा गांधींचे निकटचे सहकारी होते. त्यांनी १९३० मध्ये गांधींजींच्या मूळ गुजराथी आत्मचरित्राचामाझे सत्याचे प्रयोगया नावाने मराठीत अनुवाद केला होता. या पुस्तकाच्या पाच लाखांहून अधिक प्रतींची आजमितीस विक्री झालेली आहे.

उपयुक्त माहिती:

  • चिपळूण बस स्थानकापासून किमी, तर रत्नागिरीपासून ८८ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक जिल्ह्यांतून चिपळूणसाठी एसटी सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर ट्रस्ट, कार्यालय : मो. ९८९०१५९२४७
Back To Home