कोकणभूमीचा निर्माता भगवान परशुरामांचे चिपळूण तालुक्यातील लोटे येथील परशुराम मंदिर राज्यातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. विष्णूच्या दहा अवतारांपैकी चिरंजीव असलेला सहावा अवतार म्हणजे भगवान परशुराम. परशुरामांची देशभरात अनेक मंदिरे असली तरी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे एकत्रित स्थान असलेले चिपळूणमधील हे एकमेव पुरातन मंदिर आहे, हे या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. परशुरामांचे येथे कायम वास्तव्य असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पुराणांतील उल्लेखानुसार, जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र असलेल्या परशुरामांनी समुद्र ४०० योजने दूर करून निसर्गरम्य कोकण भूप्रदेशाची निर्मिती केली. परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी निःशस्त्र केली. त्यानंतर आपल्या हातून नरसंहार झाल्याचा त्यांना पश्चात्ताप झाला. या भावनेतून त्यांनी जिंकलेली सर्व भूमी कश्यप ऋषींना दान करून तपश्चर्येला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, दान केलेल्या भूमीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कश्यप ऋषींनी त्यांना दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. कश्यप ऋषींच्या सांगण्याप्रमाणे ते दक्षिणेकडे आले. येथील निसर्गरम्य प्रदेशाने मोहित झालेल्या परशुरामांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी समुद्राकडे भूप्रदेश देण्याची विनंती केली. मात्र, समुद्राने ती अव्हेरल्याने क्रोधित झालेल्या परशुरामांनी महेंद्रगिरी पर्वताच्या पठारावरून अरबी समुद्रावर १४ बाण सोडले. त्यानंतर समुद्र पाच–सहा योजने मागे सरकला आणि त्यातून प्रवाळयुक्त लाल जमीन वर आली. या प्रदेशाला परशुरामांनी कोकण असे नाव दिले. त्यानंतर त्यांनी देशोदेशीच्या ऋषींना, तज्ज्ञांना पाचारण करून येथील जमिनीची मशागत केली, गोधन आणले, येथे कोणती पिके घ्यायची, हे ठरवत अनेक वसाहती स्थापन केल्या.
चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ.स. ५७० मध्ये अश्वमेध यज्ञासाठी चिपळूणच्या उत्तर दिशेला यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांचे, चारही वेद सामावलेले असलेल्या वेदवासिनीचे (विंध्यवासिनी) तसेच यज्ञभूमीचा रक्षणकर्ता म्हणून कार्तिकेय या तिन्ही देवतांची मंदिरे उभारली. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसवले गेले होते. हा यज्ञ करण्यासाठी दक्षिण गुजरातमधून समुद्रमार्गे ऋग्वेदी आणि यजुर्वेदी यज्ञऋषींना आणले गेले होते. तेच पुढे चित्त्पावन म्हणून प्रसिद्ध झाले.
मंदिराची अख्यायिका अशी की सुमारे ८०० वर्षांपूर्वी महेंद्रगिरीच्या पायथ्याशी असलेल्या पेढे या गावात पाणकर आडनावाचे कुटुंब राहत होते. आता मंदिरात असलेल्या मूर्तीसमोर पादुकांचे कवच आहे. त्याखाली एक शिळा आहे. या शिळेवर परशुराम प्रगट झाले, असे बोलले जाते. पाणकर यांची गाय या शिळेवर पान्हा सोडत असे. घरी आल्यावर ती दूध देत नसल्याने गुराख्याने तिचा पाठलाग केला. मात्र ती पर्वताच्या खालच्या जागी जाऊन लुप्त झाली. ती साधारण गाय नसून कामधेनू होती, या भावनेतून ती लुप्त झालेल्या ठिकाणी कामधेनू मंदिर बांधण्यात आले. तसेच ती पान्हा सोडत असलेली शिळा भगवंताचे स्थान समजून पूजा–अर्चा करण्यास सुरुवात झाली. आजही हे मंदिर भाविकांना पाहता येते.
हे स्थान तेव्हा भगवान परशुरामांचे असल्याचे कोणालाही माहीत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, सोळाव्या शतकात येथे आलेले बाजीराव पेशव्यांचे गुरू ब्रह्मेंद्र स्वामींना याची प्रचिती आली. मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले ब्रह्मेंद्र स्वामी गणपतीचे उपासक होते. एकदा ध्यानस्थ असताना श्रीगणेशाने त्यांना भगवान परशुराम हे तपश्चर्येसाठी महेंद्रगिरी पर्वतावर राहतात, असा दृष्टांत देऊन येथे येण्याची आज्ञा केली. या दृष्टांतानुसार येथे आल्यावर त्यांना परशुरामांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जंजिऱ्याच्या नवाबाने ते पाडल्यानंतर इ.स. १७१० मध्ये त्यांनी पेशव्यांच्या मदतीने या मंदिराबरोबरच परिसरातील इतर मंदिरांचीही उभारणी केली. साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराजांचेही ते गुरू होते. हिंदवी स्वराज्याच्या लढ्यासाठी ब्रह्मेंद्र स्वामींनी त्यांना खूप द्रव्य दिले. पुढे छत्रपतींचा आग्रह आणि वार्धक्यामुळे ते साताऱ्यातील धावडशी येथे गेले. तेथेही त्यांनी येथील परशुराम मंदिराप्रमाणेच मंदिर उभारल्यानंतर समाधी घेतली.
१९९३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी परशुरामांचे सोलापूर येथील भक्त व अग्निहोत्र प्रचारक नानासाहेब अत्रे यांनी देवस्थानासाठी नव्या मूर्ती देण्याची तयारी दर्शवली. काळ, काम, परशुराम व रेणुका मातेच्या मूर्तींचा जलाकर्षण विधी झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात झाली. मंदिराचे मजबुतीकरण आणि सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर चारही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
चिपळूणजवळील परशुराम घाटातील डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिर असलेले गाव आता परशुराम म्हणून ओळखले जाते. चंद्रराव मोरे यांनी जांभ्या दगडात बांधलेल्या पाखाडीवरून (पायरी मार्ग) मंदिरापर्यंत जाता येते. मंदिराच्या आवाराला मोठी तटभिंत असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. आवारात चिऱ्यांची फरसबंदी आहे. आत प्रवेश करताच पुरातन दगडी दीपमाळ, तसेच सिद्धिविनायकाचे मंदिर दिसते. येथे सिंहासनावर बसलेल्या उजव्या सोंडेच्या गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या समोरील बाजूस दक्षिणामुख हनुमान मंदिर आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर रामदास स्वामींनी बांधले होते. ते परशुराम मंदिरात दर्शनासाठी येत असत. या मंदिराजवळ विष्णूचे वाहन असलेल्या गरुडराजाची छोटी मूर्तीही आहे.
मुख्य मंदिराच्या कलाकृतीत मुघल वास्तुकलेचा भास होतो. दोन सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. दोन्ही सभामंडप, तसेच गर्भगृहावर उंच शिखरे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा येथे दर्शनासाठी येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. ते देवाला उत्पन्नासाठी देणग्याही देत असत. शिवरायांनी राज्यभिषेकापूर्वी इ. स. १६६१ मध्ये येथे महापूजा केली होती. त्यावेळी जोशी भट यांनी पौरोहित्य केले. त्या क्षणाची आठवण करून देणारी प्रतिमा सभामंडपाबाहेर आहे. मंदिरातील लाकडांवर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर डाव्या दिशेने अनुक्रमे काळ, परशुराम आणि काम यांच्या काळ्या पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत. इतर दोन मूर्तींपेक्षा मध्यभागी असलेली परशुरामांची मूर्ती उंचीने थोडी मोठी आहे. चार हात असलेल्या परशुरामांच्या तीन हातांमध्ये परशू, धनुष्य व बाण अशी आयुधे आहेत. एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. कामदेवतेच्या हातात दंड व कमंडलू आहे. काळ देवतेने परशू व भृग धारण केले आहे. प्रत्येक मूर्तीच्या मागे सोनेरी प्रभावळ आहे.
गर्भगृहाशेजारील सभामंडपात परशुरामांचे शेजघर आहे. येथे लाकडी पलंग व बिछाना असून त्यावर परशुरामांच्या पादुका आहेत. परशुराम रोज सकाळी तपश्चर्येसाठी हिमालयात जातात. सायंकाळी परत येतात व रात्री या शेजघराचा वापर करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराच्या मागील बाजूला रेणुका माता आणि गंगादेवीचे मंदिर आहे. रेणुका मातेच्या मंदिराच्या दर्शनी भागात आकर्षक रचना असलेले दगडी खांब आहेत. रेणुका मातेची मूर्ती प्रसन्न व चतुर्भुज आहे. मूर्तीच्या बाजूला विंध्यवासिनी देवी विराजमान आहे. रेणुका मंदिराजवळ बाणगंगा कुंड आहे. महेंद्रगिरीवर कायम पाणी असावे, या हेतूने परशुरामांनी गंगेची प्रार्थना करून आता कुंड असलेल्या ठिकाणी बाण मारून झरा निर्माण केला होता. त्यामुळे या कुंडाला बाणगंगा कुंड असे संबोधले जाते. या कुंडातील पाणी चविष्ट असून ते कधीही आटत नाही. अनेक भाविक इच्छापूर्तीसाठी या कुंडात नाणी टाकतात. या कुंडाच्या काठावर गंगामातेचे मंदिर आहे. अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. मंदिरानजीक स्वयंभू महादेव व विठ्ठल मंदिरे आहेत.
मंदिराच्या खालच्या बाजूस गोसेवा केंद्र व प्रसादालय आहे. येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत प्रसाद म्हणून डाळ–तांदळाची खिचडी व शिरा दिला जातो. श्रावणी सोमवारी खास उपवासाचा प्रसाद दिला जातो. प्रसादालयाच्या समोर भक्त निवास आहे. येथे भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था करण्यात येते. मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या झाडांची ग्रहबाग आहे. येथे यज्ञवेदी तसेच ब्रह्मेंद्र स्वामी स्मृती केंद्रही आहे.
शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजीराजेही येथे अनेकदा दर्शनासाठी येत असत. राजाराम महाराजांनी येथे अनेकदा मुक्काम केल्याची नोंद आहे. साताऱ्याचे भोसले घराणे आजही परशुरामांना दैवत मानते. या मंदिरात त्रिकाळ पूजा होते. येथे दर महिन्यात उत्सव होतात. त्यापैकी अक्षय्य तृतीयेला होणारा परशुराम जयंती सोहळा प्रमुख सोहळा असतो. वैशाख शुद्ध प्रतिपदा ते तृतीया असे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान रोज महापूजा, अभिषेक, कीर्तन, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद आदी कार्यक्रम होतात. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. येथे रामनवमी, हनुमान जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्रोत्सवही उत्साहात साजरे होतात. आषाढी एकादशीला कोळी समाजाची येथे मोठी यात्रा असते. मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरवरून महेंद्रगडावर येतो, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे त्या दिवशी परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने येतात. सुमारे शंभर वर्षांपूर्वी वेहेळे येथील राजेशिर्केंना आजारपणामुळे पंढरीला जाता आले नव्हते. त्यावेळी विठ्ठलाने मी पुढील एकादशीला परशुराम दर्शनासाठी येथे येईन, असा दृष्टांत दिला होता. तेव्हापासून राजेशिर्के घराण्याची दिंडी सप्ताहासाठी येथे येते.
महेंद्रगिरीवर परशुराम मंदिराच्या वरच्या बाजूला दत्त मंदिर आहे. माहूर येथे परशुरामांचे पिता जमदग्नी यांचा अंत्यविधी झाला होता. त्यासाठी पौरोहित्य करणारे श्रीदत्त गुरू हे परशुरामांचे सांत्वन करण्यासाठी महेंद्रगिरीवर आले होते. त्या भेटीच्या जागी एका कुंडावर हे मंदिर आहे. या मंदिराशेजारील एका गुहेत ब्रह्मेंद्र स्वामी वास्तव्यास असत. मंदिराच्या वाटेवर गावचे ग्रामदैवत असलेल्या धावजी महाराजांचे मंदिर आहे. त्याशेजारी ‘धावजीची विहीर’ असे नाव असलेली पेशवेकालीन विहीर आहे. मंदिराजवळ अक्कलकोटनजीकच्या शिवापुरी येथील परशुरामांचे भक्त गजानन महाराजांनी उभारलेले अग्निमंदिरही आहे.
श्री भार्गवराम परशुराम संस्थानने मंदिरालगत ग्रंथालय, तसेच भाविकांसाठी वैद्यकीय सेवा कक्ष उभारला आहे. ग्रंथालयात अनेक पुस्तकांसोबतच भगवान परशुराम यांच्या जीवनकार्यावरील पुस्तके आहेत.