झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे कुलदैवत असलेले रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिर तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. असे सांगितले जाते की राणी लक्ष्मीबाई यांनी त्यावेळी श्री. हबळे यांची पुजारी म्हणून या मंदिरात नियुक्ती केली होती. दरवर्षी चैत्र शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत येथे होणारा लक्ष्मीपल्लीनाथांचा जन्मोत्सव हा येथील मोठा उत्सव असतो. नवसाला पावणारा, तसेच भक्तांच्या हाकेला धावणारा, अशी या देवाची ख्याती आहे.
लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराबाबत अख्यायिका अशी की पाली या गावाचे पूर्वीचे नाव करंबेळे असे होते. प्राचीन काळात घाटावरून एक सिद्धपुरुष करंबेळे लगतच्या वळके गावाच्या सीमेवर अवतरले होते. त्यांनी करंबेळे, पाथरट, कापडगाव, चरवेली, तसेच पंचक्रोशीतील लोकांना अनुभूती दिल्याने लोकांमध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण झाली. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ते करंबेळे गावात स्थायिक झाले. हे सिद्धपुरुष म्हणजेच श्रीपल्लीनाथ. त्यांच्या नावावरून करंबेळे गावाचे नाव पल्लीच्या अपभ्रंशाने पाली असे पडले. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा आदरसत्कार करावा, त्याप्रमाणे गावचे मूळदैवत असलेल्या करंबेळे देवाने आपले सर्व मान कौलाद्वारे श्रीपल्लीनाथांना अर्पण केले. तेव्हापासून गावातील प्रत्येक सण–उत्सवादरम्यान प्रथम श्रीपल्लीनाथांना व नंतर करंबेळे देवाला मान दिला जातो. दुसऱ्या अख्यायिकेनुसार, तेराव्या शतकात पल्लीनाथ विजयनगर साम्राज्यातून कोकणात आले. पल्लीनाथांना शोधत महालक्ष्मी येथे आली. ही लक्ष्मी मंदिरात आजही गर्भगृहाबाहेर उभी आहे.
पाली गावाच्या बसस्थानकापासून पायी दहा मिनिटांवर लक्ष्मी पल्लीनाथ मंदिर आहे. जांभ्या दगडांपासून बनविलेल्या कमानीतून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. मंदिराभोवती तटबंदी असून त्यातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. फरसबंदीयुक्त प्रांगणात मध्यभागी मंदिर व तटबंदीच्या एका बाजूला भक्त निवास आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. नगारखान्यातून एक छोटी पाखाडी लागते. तेथून दगडी बांधकाम असलेल्या एका तलावाजवळ जाता येते. या नगारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ जांभ्या दगडांच्या चार उंच दीपमाळा आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला गावचे मूळदैवत असलेल्या करंबेळे देवाचे स्थान तसेच प्रांगणात त्रिमुखी देवी व हनुमान यांची मंदिरे आहेत.
सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून त्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने (दगडी आसनव्यवस्था) आहेत. अंतराळाच्या मध्यभागी एका लहान चौथऱ्यावर पल्लीनाथांचा मुखवटा आहे. गर्भगृहाच्या दोन्ही भिंतीना लागून वागलाई–बागलाई, जुगाई, पावनाई, महाकाली, महालक्ष्मी, नवलाई आणि गणेश यांच्या दगडी मूर्ती आहेत. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग व नागमणी आहे. असे सांगितले जाते की या मूर्तीत व कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीत साम्य आहे. पल्लीनाथाच्या मुखवट्याच्या डाव्या बाजूकडील भिंतीजवळ रेडजाई आणि वाघजाईच्या मूर्ती आहेत. मंदिरातील केवळ या दोन मूर्तीं पूर्वाभिमुख अहेत. इतर सर्व मूर्तीं दक्षिणाभिमुख आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या भिंतीला टेकून सुमारे दोन ते अडीच फूट उंचीची पल्लीनाथांची अखंड पाषाणाची मूर्ती आहे. दक्षिणेकडे मुख असल्याने त्याला ‘दक्षिण केदार’ असेही म्हणतात. मिशा असलेली ही मूर्ती चतुर्भुज आहे. पल्लीनाथांच्या हातांमध्ये दंड, डमरू, त्रिशूळ आणि पानपात्र (पेला) आहेत. ही मूर्ती शिवस्वरूप असून पल्लीनाथांचे वाहन घोडा आहे. पल्लीनाथांच्या नावात नाथ असल्याने अनेक जण त्यांना नाथपंथीय मानून त्रिगुणात्मक दत्तस्वरूपात पाहतात. त्यांच्या हातात त्रिशूळ, डमरू, खडग व पानपात्र असल्याने ते शिवस्वरूप, तर नावापुढे लक्ष्मी असल्याने त्यांना विष्णूस्वरूपही मानले जाते. लक्ष्मीपल्लीनाथाला वडे व खीर प्रिय असल्याने दररोज हाच नैवेद्य दाखविला जातो. लक्ष्मीपल्लीनाथाचा वार रविवार आहे, त्यामुळे दर रविवारी या मंदिरात भाविकांची गर्दी असते.
कऱ्हाडे ब्राम्हणांपैकी ४० कुळांचा, तसेच गावातील मराठा, सुतार, सोनार, लोहार, कुणबी आदी समाजांचा लक्ष्मीपल्लीनाथ कुलस्वामी आहेत. त्यांची गावावर नजर असल्याने गावात अपमृत्यूचे भय नसल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरात शिमगोत्सव, लक्ष्मीपल्लीनाथांचा चैत्रोत्सव (जन्मोत्सव), लक्ष्मीपल्लीनाथ व करंबेळे देव यांच्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा वर्धापनदिन, नवरात्रोत्सव, देवदिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा हे दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याशिवाय मृग नक्षत्राच्या पहिल्या रविवारी देवस्थानच्या गावराखणीचा कार्यक्रम होतो. त्यादिवशी गावकरी देवाची व गावाची बल (किरका) काढून परडी गावाच्या पूर्वेच्या सीमेवर नेऊन ठेवतात. गावातील इडापिडा, रोगराई सीमेच्या बाहेर जावो, असा त्यामागील उद्देश असतो. श्रावण शुक्ल त्रयोदशीला मंदिरात जागर होतो.
चैत्र शुक्ल एकादशी ते चैत्र शुक्ल पौर्णिमा या कालावधीत येथे होणारा लक्ष्मीपल्लीनाथांचा जन्मोत्सव गावातील सर्वात मोठा सोहळा असतो. या उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. यादरम्यान मंदिरात अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, विष्णूयाग, श्रीसुक्त, अथर्वशीर्ष, आरती आदी धार्मिक विधी झाल्यावर आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. सायंकाळी देवाला रुपे लावली जातात. त्यानंतर मंत्रजागर, नामस्मरण झाल्यावर नृत्य, भजन, गायन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम होतात. शेवटच्या दिवशी पौर्णिमेला पहाटे लळिताचे कीर्तन होते. स्थानिक कलाकारांच्या नाट्यप्रयोगाने उत्सवाची सांगता होते.