भगवान परशुराम स्मारक

बुरोंडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले बुरोंडी येथील चिरंजीव परशुराम भूमी स्मारक हे भाविक पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. या स्थानालापरशुराम भूमीअसेही म्हणतात. विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी निर्माण केलेल्या कोकण भूमीत त्यांचे मूर्तरूप दर्शन घडावे, तसेच युवा पिढीपर्यंत त्यांचे प्रेरणादायी चरित्र पोहोचावे, या उद्देशाने येथील निसर्गरम्य टेकडीवर उभारण्यात आलेल्या स्मारकाला मोठ्या संख्येने भाविक पर्यटक भेट देत असतात.

पुराणांतील उल्लेखानुसार, जमदग्नी ऋषी आणि माता रेणुका यांचे पुत्र असलेल्या परशुरामांनी समुद्र ४०० योजने दूर करून निसर्गरम्य कोकण भूप्रदेशाची निर्मिती केली. परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली. त्यानंतर आपल्या हातून नरसंहार झाल्याचा त्यांना पश्चात्ताप झाला. या भावनेतून त्यांनी जिंकलेली सर्व भूमी कश्यप ऋषींना दान करून तपश्चर्येला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, दान केलेल्या भूमीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कश्यप ऋषींनी त्यांना दक्षिणेकडे जाण्यास सांगितले. कश्यप ऋषींच्या सांगण्याप्रमाणे ते दक्षिणेकडे आले. येथील निसर्गरम्य प्रदेशाने मोहित झालेल्या परशुरामांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी लहानसा भूप्रदेश देण्याची समुद्राकडे विनंती केली. मात्र समुद्राने ती अव्हेरल्याने क्रोधित झालेल्या परशुरामांनी महेंद्रगिरी पर्वताच्या पठारावरून अरबी समुद्रावर १४ बाण सोडले. त्यानंतर समुद्र मागे सरकला आणि त्यातून प्रवाळयुक्त लाल जमीन वर आली. या प्रदेशाला परशुरामांनी कोकण असे नाव दिले. त्यानंतर त्यांनी देशोदेशीच्या ऋषींना, तज्ज्ञांना पाचारण करून येथील जमिनीची मशागत केली, गोधन आणले येथे कोणती पिके घ्यायची हे ठरवत अनेक वसाहती स्थापन केल्या.

तपसाधना, शस्त्रविद्या आणि वेदधर्म यांचा आद्य संगम असलेल्या परशुरामांचे प्रेरणादायी चरित्र युवकांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशातून भोसरी येथीलइनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्सचे संचालक अनिल गानू आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी हे स्मारक उभारले. बुरोंडीदाभोळ रस्त्याच्या डाव्या बाजूला एका टेकडीवर ते आहे. परिसरात जांभ्या दगडाची फरसबंदी असलेल्या मार्गाने गेल्यास स्मारकाचे प्रवेशद्वार लागते. स्मारकाला जांभा दगड आणि लोखंडी जाळ्यांनी बांधलेले कुंपण असून प्रांगणातील फरसबंदीही जांभ्या दगडाची आहे. सुशोभित प्रांगणात अनेक वृक्ष असून ठिकठिकाणी लहान कुंड्या ठेवलेल्या आहेत.

येथे ४० फूट व्यासाच्या उभारलेल्या अर्धगोलाकार पृथ्वीवर परशुरामांची २१ फूट उंचीची फायबर ग्लासमध्ये बनवलेली मूर्ती आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून तांबूस रंगाची आहे. परशुरामांच्या हातात परशू आणि धनुष्य आहे. पृथ्वीच्या आकाराच्या ध्यान कक्षावर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. सोलापूर येथील शिल्पकार ज्ञानेश्वर गाजूल यांनी एक वर्ष मेहनत घेऊन साकारलेल्या मूर्तीची १६ नोव्हेंबर २०१० रोजी स्थापना करण्यात आली. पृथ्वीच्या अर्धगोलाच्या आत भव्य दालन (ध्यानकक्ष) असून त्यामध्ये एकही खांब नाही. ध्यानकक्षेत प्रवेश केल्यावर शांततेचा अनुभव मिळतो. या कक्षेत आपला आवाज बराच काळ घुमत राहतो. येथेही परशुरामांची छोटी मूर्ती आहे.

खासगी मालमत्ता असलेल्या या स्मारकातील परिसर स्वच्छ नीटनेटका आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत, तसेच शनिवारीरविवारी सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत हे स्मारक पर्यटक भाविकांसाठी खुले असते. स्मारकाच्या पूर्वेस दक्षिणेस हिरव्यागार डोंगररांगा आहेत. स्मारकाच्या मागील बाजूला उभे राहिल्यास तामसतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचेही दर्शन घडते. समुद्राच्या तेवढ्याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात. याच गावात एक परशुरामाचे मंदिर असून भाविक तेथेही भेट देतात. गावात पांडवकालीन शिवमंदिर, बुरोंडीचे ग्रामदैवत भैरवनाथ, कामनापूर्ती गणपती, हनुमान, दुर्गादेवी साईबाबा यांची मंदिरे आहेत. बुरोंडी येथील बंदर तेथे होणाऱ्या माशांच्या मोठ्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे.

उपयुक्त माहिती:

  • दापोलीपासून १३ किमी, तर रत्नागिरीपासून ११८ किमी अंतरावर
  • दापोली, दाभोळ येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट स्मारकाच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : कर्मचारी : ९७६३९६३३२९, ८७६७६९७९२७
Back To Home