कोकणातील देवभूमी अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात गणपतीची अनेक स्थाने आहेत. त्यामध्ये हेदवी येथील दशभुजा गणपती मंदिर, अष्टवणे येथील गणपती मंदिर व गुहागरच्या मध्यवर्ती भागात असलेले उफराटा गणपती ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. गुहागरमधील सर्व मंदिरे ही पूर्वाभिमुख, तर केवळ उफराटा गणपती मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. असे सांगितले जाते की गावावर आलेले संकट टाळण्यासाठी गणपतीने आपली दिशा बदलली, म्हणून या गणपतीला उफराटा असे नाव पडले.
मंदिराची अख्यायिका अशी की सुमारे ४०० वर्षांपूर्वी समुद्र अचानक खवळला. मोठमोठ्या लाटांचे तांडव सुरू झाले. या लाटा किनारा सोडून हळूहळू गुहागर गावापर्यंत येऊ लागल्या. त्यामुळे गाव बुडून जाईल, अशी भीती निर्माण झाली. घरदार सोडून गावकरी जीव वाचविण्यासाठी रस्ता दिसेल तिकडे पळू लागले. अशा वेळी येथील खरे आडनावाच्या गणेशभक्ताने येथील मंदिरात जाऊन गणपतीला ‘या संकटापासून गुहागरला वाचव’ असे साकडे घातले. तेव्हा गणपती पूर्वाभिमुख म्हणजेच समुद्राकडे पाठ करून बसलेला होता, पण भक्ताची आर्त हाक ऐकून तो मागे पश्चिमेकडे वळला. आपले मुख त्याने समुद्राकडे केले आणि खवळलेल्या समुद्राला शांत केले. काही वेळातच गुहागरवरचे मोठे संकट टळले. तेव्हापासून हा गणपती पश्चिमाभिमुख झाला व समुद्राकडे तोंड करून बसला म्हणून याला उफराटा गणपती असे नाव पडले. आजही हा गणपती येथील अनेक खरे कुटुंबीयांचे कुलदैवत आहे.
१६३७ मध्ये लिहिलेल्या व्याडेश्वर माहात्म्य या पोथीनुसार श्रीधराने हे गाव जेव्हा वसविले तेव्हाच त्याने या गणपतीची स्थापना केली होती व तेव्हा त्याला सिद्धपीठ मानले जात असे. १९७८–७९ व २००८ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. कौलारू असलेल्या मंदिराची रचना खुला सभामंडप, मुख्य सभामंडप व गर्भगृह अशी आहे. खुल्या सभामंडपात तिन्ही बाजूने भाविकांना बसण्यासाठी कठडे आहेत. येथील मुख्य सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून मध्यभागी गर्भगृह बनविण्यात आलेले आहे. गर्भगृहात तीन फूट उंच संगमरवरी चौथऱ्यावर असलेली गणेशमूर्ती ही पांढरीशुभ्र व अडीच फूट उंचीची आहे. डोक्यावर मुकुट, डावीकडे सोंड, पोटाभोवती नागसूत्र आहे. चतुर्भुज असलेल्या मूर्तीच्या उजव्या एका हातात त्रिशूळ, तर दुसऱ्या हातात मोदक आहे. डावीकडील एका हातात परशू व दुसऱ्या हातात तुटलेला दंत आहे. गळ्यात रुद्राक्षांची माळ व पायाशी मूषकराज आहे.
असे सांगितले जाते की मुसलमानी अमलाच्या सुरुवातीच्या काळात ही मूर्ती वाळूत दडवून ठेवलेली होती. धामधुमीचा काळ संपल्यानंतर साधारणतः इ. स. १६०० च्या सुमारास ही मूर्ती परत बाहेर काढून तिची स्थापना केली. दुसऱ्या अख्यायिकेनुसार, येथील गणेशमूर्ती मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना समुद्रात सापडली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी गुहागर समुद्र किनाऱ्यावर या मूर्तीची स्थापना केली. हा गणपती नवसाला पावतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. माघ महिन्यातील तृतीया ते पंचमी असे तीन दिवस येथे उत्सव असतो. उत्सवात कीर्तन, एक दिवस नाटक व एक दिवस महाप्रसाद असे कार्यक्रम असतात. मंदिराच्या पूजा–अर्चेची व्यवस्था खरे कुटुंबीयांकडे असते. गणेशोत्सवात खरे कुटुंबीयांकडून मातीच्या गणपतीची स्थापना केली जात नाही. पितळी मूर्ती व नर्मदेतील गणेश गोट्याची त्यांच्याकडून पूजा केली जाते.
उफराटा गणपती मंदिराशिवाय गुहागरमध्ये व्याडेश्वर, वेळणेश्वर, दुर्गादेवी मंदिर ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत. धार्मिक महत्त्वासोबतच कोकणातील पर्यटनस्थळांतही गुहागर प्रसिद्ध आहे. नारळी–पोफळीच्या बागा, सुरुची वने, लांबच लांब पसरलेला स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा, गोपाळगड अंजनवेल किल्ला, याशिवाय वेळणेश्वरजवळील समद्रातील प्राचीन दगडी भिंत व हेदवीची बामणघळ ही पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत.