सांब मंदिर

निरूळ, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीचा सण म्हणजेच शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. साधारणतः पाच दिवसांपासून १५ दिवसांपर्यंत हा उत्सव चालतो. त्यामध्ये ग्रामदेवतेच्या पालखीत देवांची रुपे (मुखवटे) ठेऊन ही पालखी गावात वा परिसरात फिरवली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील निरूळ हे गाव येथील वेगळ्या शिमगोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या शिमगोत्सवात ग्रामदैवत स्वयंभू सांब देवाची पालखी गावात फिरवता ती येथील सहाणेवर ठेवली जाते. गावातील सर्व महिलांकडून (त्यातही या गावातून लग्न होऊन गेलेल्या स्त्रियांकडून) येथे ओटी भरण्याची पद्धत मागील २०० वर्षांपासून चालत आलेली आहे.

चहूबाजूंनी डोंगर, गर्द झाडी, हापूस आंब्यांच्या बागा, पावसाळ्यात दिसणारी हिरवीगार भातशेती आणि वर्षाच्या बाराही महिने खळाळत वाहणारी नदी अशा निसर्गसमृद्ध परिसरात निरूळ हे गाव वसले आहे. या गावातील स्वयंभू जागृत सांब मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाभोवतीचा परिसर बारमाही वाहणारी नदी यामुळे येथे वर्षभर अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे राज्य सरकारनेही या गावाचा समावेश पर्यटन क्षेत्रात केला असून त्याला पर्यटनाचादर्जा दिलेला आहे. असे सांगितले जाते की सुमारे ४०० वर्षांपूर्वी एका महापुरुषाने हे मंदिर बांधले होते. काही वर्षांपूर्वी सुशोभित करण्यात आलेले हे मंदिर रत्नागिरीतील प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक मानले जाते.

रत्नागिरी येथून भाट्याच्या पुलावरून आल्यावर निरूळला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. नजीकच्या भाट्ये गावातून फणसोपमार्गे एक रस्ता, तर पावसमार्गे दुसरा रस्ता जातो. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आंब्याची मोठमोठी झाडे आहेत. जवळच असलेल्या नदीवरील सुमारे १०० फूट लांबीचा लोखंडी पूल ओलांडून मंदिराकडे जावे लागते. निसर्गाच्या कुशीत, कौलारू टुमदार घरांच्या मधोमध येथील ग्रामदैवत असलेले सांब मंदिर स्थित आहे. नदीकाठी स्थित असलेल्या या मंदिर परिसराचे पावसाळ्यातील दृश्य अवर्णनीय असते.

नदी तीराला लागून जांभ्या दगडांच्या मजबूत तटबंदीमध्ये सांब मंदिर आहे. या तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर मंदिराचे उंच शिखर लक्ष वेधून घेते. या मुख्य शिखरावर कळसांसह अनेक उपशिखरे कोरलेली आहेत. संपूर्ण प्रांगणात दगडी फरसबंदी असल्यामुळे हा परिसर स्वच्छ सुंदर भासतो. मुख्य प्रवेशद्वाराशिवाय नदीतूनही मंदिरात येण्यासाठी तटबंदीतून पायरी मार्ग आहे. या पायरी मार्गाजवळ मंदिर प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. अर्धमंडप, सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराला लागून असलेला अर्धमंडप हा नंतरच्या काळात बांधल्याचे जाणवते. अर्धमंडप सभामंडप कौलारू असून गर्भगृहावर वैशिष्ट्यपूर्ण शिखर आहे.

मंदिराच्या बांधकामात जांभ्या दगडांचा लाकडांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखेवर कोरीव काम केलेले असून ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. सभामंडपात कासवाची मूर्ती त्यासमोर अखंड पाषाणातून कोरलेली नंदीची मूर्ती आहे. येथील स्तंभांवरही कोरीवकाम केलेले दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळील दोन्ही बाजूच्या देवळ्यांमध्ये शिवपिंडी संगमरवरी गणेशमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या उजव्या बाजूकडील भिंतीजवळ कुलस्वामिनी माता धनीण (भवानी) हिची काळ्या पाषाणाची अखंड मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर मोठे कीर्तिमुख त्याच्या मागे श्रीगणेशाची मूर्ती आहेगर्भगृहात सांब देवाचे स्वयंभू लिंग असून त्याच्या डावीकडे नागफणा आहे.

फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला येथे होणाऱ्या शिमगोत्सवादरम्यान पाच दिवसांची मोठी यात्रा भरते. यावेळी ग्रामदैवत स्वयंभू सांब मंदिरासह माता धनीण, जाकादेवी, महाकाली, नागादेवी देव विश्वेश्वर या गावांतील सर्व मंदिरांमध्ये शिमगोत्सव साजरा केला जातो. यात पहिल्या दिवशी सकाळी ११ ते या दरम्यान पालखीत सर्व देवांची रुपे लावली जातात. असे सांगितले जाते की श्री सांब देवाचा पालखीत बसवण्यात येणारा मुखवटा .. १८०० या वर्षात बनविलेला आहे. रुपे लावल्यानंतर रात्री .३० ते १२ या वेळेत सांब मंदिरातून पालखी सहाणेवर (पालखी ठेवण्याची जागा) आणली जाते. त्यांतर रात्री १२.३० ते पहाटे .३० पर्यंत होळी आणली जाते. दुसऱ्या दिवशी ११ ते सायंकाळी या दरम्यान येथे शिमगोत्सव साजरा केला जातो. तिसऱ्या चौथ्या दिवशी शिवजयंती, सत्यनारायण पूजा, नमन (थाप मारणे), मानकऱ्यांची ओटी भरणे, ग्रामस्थांकडून ओटी भरली जाणे असे कार्यक्रम होतात.

निरूळ गावचे वेगळेपण असे की देवांची रुपे लावल्यानंतर एकदा सहाणेवर ठेवलेली पालखी ही पाचव्या दिवशी पुन्हा तेथून थेट मंदिरातच जाते. ही पालखी कोकणातील इतर गावांप्रमाणे गावाबाहेर, गावात घरोघरी फिरवली जात नाही. नोकरीव्यवसायानिमित्त बाहेर गेलेले येथील ग्रामस्थ गावातून लग्न होऊन गेलेल्या स्त्रिया या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित असतात. गावात पालखी फिरवली जात नसल्यामुळे वादविवाद टळून एकोप्याने उत्सव साजरा होतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या उत्सवाशिवाय सांब मंदिरात महाशिवरात्रीलाही मोठा उत्सव होतो. त्यावेळी चार दिवस अखंड सप्ताह चालतो. या उत्सवादरम्यान हजारो भाविक गाऱ्हाणे घेऊन मंदिरात येतात. दरवर्षी १२ मे या दिवशी मंदिराच्या वर्धापनदिनाचा उत्सव होतो. श्रावणातही येथे अनेक भाविक येतात. दररोज सकाळी ते सायंकाळी या वेळेत भाविकांना सांब देवाचे दर्शन घेता येते. मंदिराबरोबरच गावातील जाकादेवीचे मंदिरही भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

भाविकांसोबत पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणावर येतात. सांब मंदिराशेजारून वाहणाऱ्या नदीचे शुभ्र, फेसाळणारे पाणी भाविक तसेच पर्यटकांचे आकर्षण आहे. अनेक पर्यटक मंदिर परिसरात वर्षा सहलीसाठीही येतात. बारमाही वाहणाऱ्या नदीमध्ये मोठमोठे कातळ आहेत. या कातळांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे धबधब्याचा भास होतो. नदीच्या कडेला कातळाचा एक मोठा भाग आहे. त्याला ग्रामस्थदेवाचा माडअसे म्हणतात. एरवी शांत वाहणारी ही नदी मोठ्या पावसात रौद्रावतार धारण करते.

उपयुक्त माहिती:

  • रत्नागिरीपासून २४ किमी अंतरावर
  • रत्नागिरीपासून निरूळसाठी एसटी सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home