आमनायेश्वर मंदिर

बुरबांड, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील बुरबांड गावात असलेले जागृत आमनायेश्वर (आम्नायेश्वर) हे पांडवकालीन मंदिर कोकणातील प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे. हेमाडपंती बांधकामाची साक्ष देणाऱ्या या मंदिराच्या गर्भगृहातून काही वेळा अचानक होणारा शिवनाद (सिंहनाद), वर्षातून दोनदा मावळतीच्या सूर्याची थेट गर्भगृहातील शिवलिंगावर पडणारी किरणे, तसेच शिवमंदिर असूनही येथे असलेल्या विष्णूच्या दशावतारातील मूर्ती, ही येथील वैशिष्ट्ये आहेत. अनेक कोकणस्थ ब्राह्मणांचे आराध्यदैवत असलेले आमनायेश्वर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

मंदिराची अख्यायिका अशी की एका ब्राह्मणाची गाय येथे चरायला येत असे. ती येथील एका दगडावर पान्हा सोडत असे. ही बाब लक्षात आलेल्या संतप्त ब्राह्मणाने दगडावर कुऱ्हाडीने प्रहार केला असता त्याचे तीन तुकडे पडले. एक तुकडा पश्चिमेकडील गडनदीच्या कातळावर पडला, तो कातळेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. नदीपलीकडे कळंबुशी येथे पडलेला दुसरा तुकडा कळपेश्वर झाला, बुरबांड येथेच राहिलेल्या तिसऱ्या तुकड्यातून रक्ताची धार वाहू लागली. आपली चूक उमगल्यावर ब्राह्मणाने महादेवाची प्रार्थना केल्यावर दगडातून रक्त येणे बंद झाले. त्यानंतर येथे आमनायेश्वराची प्रतिष्ठापना झाली. पांडवांनी एका रात्रीत मंदिर उभारल्याचीही अख्यायिका आहे. आमोणीच्या (आंब्याच्या कुळातील एक काटेरी झुडूप) रानात वसलेला महादेव म्हणून या देवाला आमनायेश्वर म्हणतात.

आरवलीमाखजन मार्गावरील बुरबांड गावात काळ्या दगडात बांधलेले, पाच कळस असलेले, हे पुरातन मंदिर आहे. असे सांगितले जाते की मुस्लिम बांधकामाची छाप असलेल्या मंदिराचा पहिला भाग पांडवकाळात दुसरा भाग शिवकाळात बांधण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. मंदिराभोवती चारही बाजूंनी जांभ्या दगडाची तटबंदी असून संपूर्ण प्रांगणात फरसबंदी आहे. खुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. दुमजली सभामंडपात मध्यभागी अखंड दगडातील नंदीची मोठी मूर्ती आहे. या नंदीच्या बाजूला वरील मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अंतराळात छोटे शिवलिंग, गणेशमूर्ती, तसेच विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, वराह, नरसिंह, कूर्म अवतारांच्या मूर्ती आहेत. येथे कार्तिक स्वामींची मूर्तीही आहे.

मुख्य गर्भगृहाची कळसापर्यंतची उंची सुमारे ५५ फूट असून तेथील बांधकाम पूर्णपणे कातळात केलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्ती उंबरठ्याखाली कीर्तिमुख कोरलेले आहे. येथे काही वेळा शिवपिंडीवर अभिषेक सुरू असताना सारंगीसारखा आवाज येतो, याला शिवनाद वा सिंहनाद असे म्हटले जाते. तो कधी सुरू होतो हे निश्चित नाही. असे सांगितले जाते की शिवनाद ऐकण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे ठरवून येथे आले होते, मात्र त्यांना तो ऐकावयास मिळाला नाही. गर्भगृहात सुमारे साडेसहा फुटांची भव्य शिवपिंडी आहे. चांदीच्या अकरा गळतीपात्रातून या पिंडीवर जलधारा पडत असतात. पश्चिमाभिमुख असलेल्या पिंडीवर वर्षातून दोन वेळा मावळतीच्या सूर्याची किरणे पडतात. पिंडीची सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशी त्रिकाळ पूजा केली जाते. पावसाळ्यात मंदिर परिसर जलमय झाल्यास येथील पूजा करणे शक्य होत नसेल अशा वेळी मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका शिळेचे पूजन केले जाते. हे पूजन मंदिरातील देवापर्यंत पोचते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराच्या जोत्यावर बाह्य भिंतींवर विविध वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. त्यापैकी गंडभेरूंड (काल्पनिक पक्षी) शिल्प विशेष लक्ष वेधून घेते. दोन गंडभेरुंडांनी पायात वाघ पकडलेले असून या वाघांच्या पंजांमध्ये हत्ती आहेत. वाघांनी पंजात पकडलेले हत्ती असलेले हे शिल्प सत्ता आणि सामर्थ्याचे प्रतीक समजले जाते. कुस्ती करणारे मल्ल, हत्ती, मोर, अजगरांची शिल्पेही येथे आहेत. या जोत्यावरच एक गोमुख आहे. गाभाऱ्यातील पिंडीवर केलेल्या अभिषेकाचे तीर्थ त्यातून बाहेर पडते.

प्रांगणात मंदिराच्या डाव्या बाजूला पुरातन पिंपळवृक्ष उजव्या बाजूला दहाहून अधिक समाध्या आहेत. असे सांगितले जाते की या समाध्या संन्यासाश्रम स्वीकारणाऱ्या पंचक्रोशीतील व्यक्तींच्या आहेत. काही समाध्यांवर त्यांची नावेही आहेत. या समाध्यांजवळच मोठी दगडी दीपमाळ आहे. मंदिरात होणाऱ्या महाशिवरात्र, तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवादरम्यान देवाची पालखी काढली जाते, त्यावेळी ही दीपमाळ शेकडो दिव्यांनी उजळवली जाते. या दीपमाळेजवळ छोटा मंच असून येथे उत्सवांदरम्यान गावातील मंडळी नाटक सादर करतात. मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यात धर्मशाळा आहे.

मंदिराच्या उत्तरेकडे गोड्या पाण्याची विहीर असून तिला उन्हाळ्यातही पाणी असते. या विहिरीच्या शेजारी विष्णू मंदिर आहे. परिसरात हनुमान आणि विठ्ठल मंदिरही आहे. मंदिराच्या आवारात दगडी बांधकाम केलेला तलाव आहे. या तलावात अग्नितीर्थ, सर्वपापमोचकतीर्थ, व्याधीहरणतीर्थ अमृततीर्थ अशी चार तीर्थे आहेत. पाण्याची पातळी घटल्यावर ती दिसतात.

येथील साठे, भावे, नामजोशी, भागवत, सहस्रबुद्धे, खरे, मालशे, खांडेकर, पटवर्धन आडनावांच्या कोकणस्थ ब्राह्मणांचे आराध्यदैवत असलेल्या या मंदिरात सात दिवस शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होतो. या उत्सवादरम्यान कीर्तन, महाप्रसाद, लघुरूद्र, पूजा तसेच देवाचा छबिना होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला होणाऱ्या उत्सवादरम्यान देवाची पालखी फिरते. सोमवारी दिवसभर नामजप होतो. श्रावणी सोमवारीही मंदिरात गर्दी असते. दररोज सकाळी ते १२.३० सायंकाळी ते .३० या वेळेत भाविकांना आमनायेश्वराचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • संगमेश्वरपासून ४१ किमी, तर रत्नागिरीपासून ६४ किमी अंतरावर
  • संगमेश्वर, देवरुख येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home