कोकणातील देवभूमी अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील अष्टवणे गणपती मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गावाच्या पूर्वेकडे, टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरातील गणेशाच्या दर्शनासाठी व गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दररोज शेकडो भाविक आणि पर्यटक येतात. माघी गणेशोत्सव व अंगारकी चतुर्थीला मोठा उत्सव साजरा होतो. नवसाला पावणारा, अशी या गणेशाची ख्याती आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की गुहागरजवळील अथांग समुद्राजवळ असलेल्या डोंगरातील गुहांमध्ये अनेक ऋषी ध्यानाला बसत असत. अशाच एका ठिकाणी जांभ्या दगडाच्या गुहेत या ऋषींकडून दैनंदिन पूजेसाठी श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. कालांतराने जांभ्या दगडातील गुहेला तडे जाऊन ती ढासळली. केवळ त्यातील काही भागच शिल्लक राहिला. या स्थानाचे पावित्र्य टिकून राहावे, यासाठी येथील ग्रामस्थांनी शिल्लक राहिलेल्या जांभ्या दगडाच्या शिळेभोवती मंदिर बांधले. तेच हे अष्टवणे येथील जागृत गणेश मंदिर होय.
असे सांगितले जाते की गुहागरमध्ये पूर्वी खूप गुहा होत्या. त्यामुळेच या गावाचे नाव गुहागर असे पडले. व्याडेश्वर, दुर्गादेवी, उरफाटा गणपती, कार्तिक स्वामी मंदिर, कोपरी नारायण मंदिर आदी प्राचीन देवस्थानांमुळे गुहागरला देवभूमी म्हटले जाते. गावातील वरचा पाट परिसरात असलेल्या कार्तिक स्वामी मंदिराजवळून काही अंतर पुढे गेल्यावर एक पाखाडी लागते. तेथून जांभ्या दगडाने बांधलेल्या पायऱ्यांपासून मंदिराकडे जाण्यास वाट आहे. या पायऱ्यांवरून १० ते १५ मिनिटांत मंदिर परिसरात पोचता येते. पाखाडी संपल्यावर १५ ते २० पायऱ्या चढून मंदिरात जाता येते. आंब्या–फणसाच्या झाडांमधून जाणारी पाखाडी, मार्गातून दिसणारे गुहागर समुद्र किनाऱ्याचे विहंगम दृश्य अशा निसर्गसमृद्ध वातावरणात गणेशाचे स्थान आहे. त्यामुळे धार्मिक महत्त्वाबरोबरच गुहागरच्या पर्यटनातही या मंदिराला विशेष स्थान आहे.
चिऱ्याचे (जांभा दगड) बांधकाम, आकर्षक रंगकाम व उंच शिखर यामुळे मंदिराचे सौंदर्य लांबूनच भाविक व पर्यटकांना खुणावते. मंदिराच्या प्रांगणाभोवती तट असून येथील संपूर्ण प्रांगणात फरसबंदी केलेली आहे. संपूर्ण मंदिर लाल, सोनेरी व पांढऱ्या रंगात रंगविलेले आहे. २०१६ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या प्रांगणातून पाच पायऱ्या चढल्यावर दर्शनमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडप व सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्यांतील खांब वरील बाजूने कमानीयुक्त कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. सभामंडपाला आतील बाजूने आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून मध्यभागी मोठे झुंबर लावलेले आहे.
सभामंडपाच्या पुढील भागात असलेल्या गर्भगृहाभोवती लाकडी कलाकुसर आहे. गाभाऱ्याच्या द्वारशाखेवर असलेल्या कोरीवकामात पाने, फुले, वेली, तसेच मोरशिल्पे आहेत. गर्भगृहात मोठ्या जांभ्या दगडाच्या प्राचीन शिळेवरच समोरील बाजूस गणपतीच्या मूर्तीचा आकार दिलेला आहे. हीच मूर्ती येथील मुख्य मूर्ती होय. या शिळेच्या आधाराने येथे लहानसा घुमट बांधलेला असून त्यात अडीच फूट उंचीची, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे. शेंदूरचर्चित गणेशाचा मुकुट चांदीचा असून कपाळावर चंद्रकोर आहे. गणेशमूर्तीच्या शेजारी एक लहानशी शिळाही आहे. मूर्तीच्या समोर हातात मोदक धरलेला मोठा पितळी मूषकराज आहे. मंदिराचा दर्शनमंडप व गर्भगृह यांवर शिखरे आहेत. त्यातील गर्भगृहावर असलेल्या संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या शिखरावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून अनेक लहान–लहान कोरीव कळस आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूला खडकामधून अखंड वाहणारा झरा आहे. गोमुखातून हे पाणी एका लहानशा कुंडात सोडले जाते. येथील पूजाविधीसाठी याच पाण्याचा वापर करण्यात येतो. या कुंडातील पाण्याला ‘अष्टाचे तीर्थ’ म्हणून ओळखले जाते. त्यावरून हे स्थान अष्टवणे आणि मंदिर अष्टवणे गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. शरीरावर खाज किंवा त्वचेचे विकार असल्यास या पाण्याने ते बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की हे अष्टाचे तीर्थ गंगातीर्थाप्रमाणे पवित्र समजले जाते. परिसरात कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांकडून मृत व्यक्तीच्या मुखात अष्टाचे तीर्थ घातले जाते. शेकडो वर्षांपासून ही प्रथा आहे.
दर मंगळवारी व संकष्टी चतुर्थीला येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. माघी गणेशोत्सव व अंगारकीला येथे मोठा उत्सव साजरा होतो. या काळात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून उकडीचे मोदक दिले जातात. दररोज सकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत भाविकांना अष्टवणे गणेशाचे दर्शन घेता येते.