व्याघ्रेश्वर मंदिर

आसूद, ता. दापोली, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याला महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. हजारो पर्यटकांच्या पसंतीचे हे ठिकाण असले तरी धार्मिक ऐतिहासिकदृष्ट्याही या तालुक्याला महत्त्व आहे. आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती, दाभोळची चंडिका देवी, केळशीची महालक्ष्मी, आसूद येथील केशवराज मंदिर यामुळे लाखो भाविकांची पावले दापोलीकडे वळतात. याच पंक्तीतील आसूद येथील अतिप्राचीन व्याघ्रेश्वर मंदिर हेही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भातखंडी नदीच्या तीरावर निसर्गसमृद्ध परिसरात हे मंदिर स्थित आहे.

दापोलीहर्णे मार्गावर आसूद येथे १२ व्या शतकातील व्याघ्रेश्वर मंदिर आहे. परिसरातील चित्पावन ज्ञातीतील रानडे, मनोहर, फफे, कंद्रप, आखवे (भारद्वाज गोत्र), वैशंपायन, सहस्त्रबुद्धे (नित्युंदन गोत्र), धारप, विद्वांस, मराठे (कपि गोत्र), केतकर (गार्ग्य गोत्र) फक्त काश्यप गोत्री जोशी उपनावांचे कुलदैवत असलेले हे शंकराचे जागृत स्थान मानले जाते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग असून एक जांभ्या दगडातील पायरी मार्ग दुसरा थेट मंदिरापर्यंत येणारा गाडी रस्ता आहे. पाच फूट उंच तीन फूट रुंदीच्या तटबंदीतील लहानशा कमानीसारख्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला सुमारे १२ फूट उंचीच्या प्राचीन दगडी दीपमाळा दिसतात. उत्सवकाळात त्यावर दिवे ठेवण्याची परंपरा आजही येथे पाळली जाते.

मुख्य मंदिराच्या शेजारी चौकोनी शाळुंकेच्या आकाराची पुष्करणी आहे. यात बाराही महिने पाणी असल्याने उन्हाळ्यात जेव्हा इतरत्र पाणी आटते तेव्हा येथील ग्रामस्थ परिसरातील वाडी वस्तीला याच पुष्करणीचा आधार असतो. या पुष्करणीच्या आतपर्यंत जाण्यासाठी जांभ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. याच पाण्याने उत्सवकाळात सहस्त्रधार पात्रातून, इतर दिवशी अभिषेक पात्रातून, व्याघ्रेश्वराच्या पिंडीवर संततधार धरली जाते. याशिवाय मंदिर प्रांगणात गणपती, आई योगेश्वरी काळभैरव यांची मंदिरे आहेत.

सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा असून तो नव्याने बांधल्याचे जाणवतेया सभामंडपातील वैशिष्ट्यपूर्ण नंदी हा तीन फूट रुंद सव्वादोन फूट उंचीचा आहे. येथील नंदी हा सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरातील नंदीची प्रतिकृती आहे. नंदीच्या मुखात अगस्ती ऋषी पकडल्याचे शिल्प आहे. याबाबत आख्यायिका अशी की संतप्त अगस्तीने जेव्हा समुद्राचे सर्व पाणी प्राशन केले, तेव्हा पृथ्वीवर एकच हाहाकार माजला होता. तेव्हा शंकराने नंदीला अगस्ती ऋषींना पकडून आणण्याचा आदेश दिला. अगस्तींना हे कळताच ते लपून बसले; परंतु नंदीने त्यांना शोधून काढले आपल्या मुखात पकडून शंकरासमोर आणले. हीच आख्यायिका या नंदीच्या मूर्तीतून प्रतित होते. ऋषी नंदीचे सुडौल शरीर, त्यांनी परिधान केलेली आभूषणे हे सर्व एकाच दगडात येथे कोरलेले आहे.

मंदिराचे अंतराळ गर्भगृह हे मूळ मंदिर असून त्याच्या जोत्यावर नर्तिका, गंधर्व, देवता विविध प्राणी कोरलेले आहेत. अंतराळातील लाकडी खांब कोरीव असून त्याचा तळ मात्र दगडी आहे. या खांबांवर पौराणिक विशेषतः दशावतारातील प्रसंग कुशलतेने कोरलेले आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबावर शिवपिंडी आहे. अंतराळातून पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात जाता येते. गर्भगृहातील व्याघ्रेश्वराची स्वयंभू पिंडी काळ्या पाषाणाची आहे. गर्भगृहात केवळ पुरुषांनी तेही ओलेत्याने किंवा सोवळे नेसूनच प्रवेश करता येतो. ही परंपरा अनेक शतकांपासून पाळली जाते. गर्भगृहाच्या वर पायऱ्या पायऱ्यांनी चढत जाणारा छोटेखानी कळस आहे. अंतराळ गर्भगृहाच्या वरच्या भागात कौलारू छत आहे.

मंदिराच्या आवारात दोन वीरगळी असून त्यावर तीन भागांमध्ये कोरीव काम केलेले दिसते. सर्वांत खालील बाजूस युद्ध करणारा वीर, त्याच्यावरच्या भागात त्या वीराला नेण्यासाठी आलेल्या अप्सरा आणि त्याच्यावरच्या भागात शिवलिंगाची पूजा करणारा वीर अशी कोरीव रचना आढळून येते. या वीरगळी १२ व्या ते १३ व्या शतकातील असाव्यात, असे सांगितले जाते. या मंदिराच्या शेजारीच आसूदची ग्रामदेवता झोलाई मातेचे मंदिर आहे.

व्याघ्रेश्वर मंदिरात श्रावणातील शेवटच्या सोमवारी महारुद्रोत्सव, कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरोत्सव माघ महिन्यातील महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. महाशिवरात्रीला सकाळी लघुरुद्रासह सहस्रधाराभिषेक आणि पालखी सोहळा असतो. यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच येथे योग शिबिर, वैद्यकीय शिबिर, नेत्रोपचार शिबिर, रक्तदान असे सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • दापोलीपासून सहा किमी, तर रत्नागिरीपासून १५३ किमी अंतरावर
  • दापोली, मंडणगड खेड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत नेता येतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • मंदिर वेबसाईट : http://vyaghreshvar.com
  • संपर्क : वैभव जोशी, अध्यक्ष : मो. ९४२२४३१८७३, मिलिंद परचुरे, सचिव : मो. ९४०४७७४३३१
Back To Home