मराठीतील प्रख्यात लेखक श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या गाजलेल्या साहित्यकृतीतून दापोली तालुक्यातील आसूद येथील देव लक्ष्मीकांत (केशवराज) मंदिर व येथील परिसर मराठी सारस्वतात अजरामर झाले आहे. येथील निसर्गसमृद्ध परिसरात असलेले सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे भगवान श्री विष्णूचे हे जागृत देवस्थान लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून पाच पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले होते. केशवराजाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दापोली–हर्णे मार्गावर आसूद गाव आहे. तेथून एक ते दीड किमी अंतरावर दाबकेवाडीत वाहने ठेऊन केशवराज मंदिरासाठी पायवाट सुरू होते. वाडीतील घरे संपल्यानंतर घनदाट वृक्षराजीतून विशेषतः पोफळीच्या झाडांतून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. या पायवाटेत एक लहानशी नदी ओलांडावी लागते. त्यावर आता कायमस्वरूपी पूल उभारण्यात आला आहे. पूल पार करून पाच–दहा मिनिटे चालल्यानंतर, डोंगर उतारावरील एका लहानशा पठारावर आल्यावर केशवराज मंदिराचे दर्शन होते. पटांगणातून पुढे आल्यानंतर एक चिऱ्याचा गडगा (भिंत) दिसतो. त्यामध्ये दरवाजा नसलेले लहानसे प्रवेशद्वार आहे. तेथून वाकून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करावा लागतो. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गणपतीचे मंदिर व उजव्या बाजूला गोमुख आहे, त्यातून बारमाही पाणी वाहत असते.
काळ्या दगडांत बांधलेल्या केशवराज मंदिराची रचना साधीशी आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मंदिरावर विशेष कलाकुसर दिसत नाही. गोमुखाच्या वरच्या डोंगरावर नैसर्गिक झरा असून तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणलेले आहे. विशेष म्हणजे, डोंगर संपतो तिथे सपाटी आहे; परंतु तिथे असलेल्या एका आंब्याच्या झाडाच्या बुंध्याखालून हा झरा वाहतो. या गोमुखातील पाण्यात हात–पाय धुऊन भाविक मंदिरात प्रवेश करतात. चारही बाजूने तटबंदी असलेल्या मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी केलेली आहे. खुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील अंतराळ व गर्भगृह हेच मूळ मंदिर होते. त्यासमोर १९८७ मध्ये सभामंडप बांधलेला आहे. अंतराळ व गर्भगृहावर शिखरे आहेत. सभामंडपातून अंतराळात जाता येते, याशिवाय अंतराळात जाण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूनेही दरवाजे आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला हनुमान, तर उजव्या बाजूला गरुड यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणपती आहे. गर्भगृहात असलेली श्री देव लक्ष्मीकांत म्हणजेच केशवराजाची मूर्ती ही साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील आहे. केशवराजाच्या उजवीकडील खालच्या हातात पद्म, वरच्या हातात शंख, डावीकडील वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात गदा आहे. श्रीविष्णूच्या मूर्तीतील चारही आयुधांच्या विशिष्ट क्रमानुसार त्याचे २४ प्रकार आहेत. त्यानुसार केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम अशी नावे दिली जातात. येथील मूर्तीत असलेल्या आयुधांच्या क्रमानुसार ही मूर्ती केशवाची आहे.
देव केशवराज या परिसरातील आगरकर, आघारकर, बिवलकर, दातार, दांडेकर, देवधर, दीक्षित, ढमढेरे, बारशेतकर, भट, गांगल, राजवाडे, मेहेंदळे, परांजपे, ठोसर, कोकणे, गोळे, भाटवडेकर, मायदेव, सबनीस, वैद्य, वाटवे व जोशी (काही) अशा २३ घराण्यांची कुलदेवता आहे. केशवराज मंदिर हे देवराई मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. दाबकेवाडी संपल्यानंतर जी घनदाट वृक्षराजी दिसते ती तशीच ठेवायची, येथील एकही झाड तोडायचे नाही, असा केशवराजाचा आदेश असल्याचे येथील ग्रामस्थ मानतात. त्यामुळे येथील वृक्षसंपदा टिकून आहे.
मंदिरात दररोज केशवराजाला महाभिषेक करून धोतर आणि उपरणे नेसवून पूजा केली जाते. त्यानंतर महानैवेद्य अर्पण करून महाआरती केली जाते. कार्तिक महिन्यात येथे दोन उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी एक कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि दुसरा कार्तिक कृष्ण एकादशी ते त्रयोदशी; दोन्ही वेळेला पौर्णिमा आणि त्रयोदशीला महाप्रसाद होतो. ऐतिहासिक नोंदींनुसार, पेशव्यांकडून या मंदिराला वर्षासन देण्यात येत होते.