सोळजाई देवी मंदिर

देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख गावची ग्रामदेवता असलेल्या सोळजाई मंदिराची ख्याती ही आजूबाजूच्या गावांचेसर्वोच्च न्यायालयअशी आहे. ४४ गावांची मालकीण असलेल्या सोळजाई देवीचे मंदिर संगमेश्वर तालुक्यातील शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. या गावांमधील अन्य देवदेवतांनी दिलेला कौल मान्य नसेल तर असे भाविक सोळजाई देवीला कौल लावण्यासाठी येतात. तिने दिलेला कौल अंतिम मानला जातो. हे मंदिर देवदिवाळीच्या दिवशी होणाऱ्या लोटांगण यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. यावेळी हजारो भाविक नवसपूर्तीसाठी लोटांगण घालत मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करतात.

देवरुख हे शहर संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय हे संगमेश्वर गावातच होते; परंतु १८७८ मध्ये तेथील सर्व सरकारी इमारती आगीत खाक झाल्या. तेव्हा तालुक्याचे मुख्यालय देवरुख येथे हलविण्यात आले. तालुक्याचे पंचायत समिती कार्यालयही देवरुख येथेच आहे. असे सांगितले जाते की पूर्वीच्या काळी या परिसरात, आपल्या संस्कृतीत देववृक्ष मानल्या जाणाऱ्या वड पिंपळाची अनेक झाडे होती. त्यामुळे या गावालादेववृक्षांचे गावअसे म्हटले जात असे. त्याचा अपभ्रंश होऊन ते देवरुख झाले. शिवकालीन अनेक काव्यांमध्ये या गावाचा उल्लेख येतो. खालची आळी, मधली आळी आणि वरची आळी अशा तीन भागांत हे गाव विभागलेले आहे. सोळजाई देवी ही देवरुखची ग्रामदेवता परिसरातील ४४ गावांची मालकीण म्हणून ओळखली जाते.

देवीची अख्यायिका अशी की गावातील एका भक्ताला देवीने दृष्टांत देऊन सांगितले की मी येथील बाव नदीजवळ आहे. मला तेथून काढून गावात माझी प्रतिष्ठापना कर. स्वप्नदृष्टांताप्रमाणे त्या भाविकाने देवीने सांगितलेल्या जागेवर शोध घेतला असता त्याला देवीची मूर्ती तेथे सापडली. त्यानंतर ग्रामस्थांनी देवीला घोंगडीत गुंडाळून वाजतगाजत गावात आणले सध्या जेथे मंदिर आहे, तेथे लहानसे मंदिर बांधून त्यात तिची प्रतिष्ठापना केली. हे देवीचे स्थान शिवपूर्वकाळापासून प्रसिद्ध आहे. देवरुखपासून रायगड आणि विशाळगड हे जवळचे किल्ले आहेत. या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेकदा देवरुखमधील सोळजाई देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.

मंदिराबाबतच्या नोंदींनुसार, १९३७ मध्ये गावातील सार्दळ, लोध, देवरुखकर आदी मंडळींनी चतुःसीमेची सभा लावल्यानंतर श्रमदान आणि देणग्यांच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर १९९५ मध्ये झालेल्या आणखी एका जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेले मंदिर आधुनिक आकर्षक स्वरूपात बांधण्यात आले आहे. मंदिराच्या बाह्य दर्शनानेच त्याची भव्यता, त्यावरील कलाकुसर, नीटनेटकेपणा नजरेत भरतो. रस्त्याला लागून सुंदर कलाकुसर केलेले प्रवेशद्वार आहे. संपूर्ण फरसबंदी केलेल्या प्रांगणात मोठी दीपमाळ, तुळशी वृंदावन, विविध कार्यक्रमांसाठी मंच तसेच कारंजे असलेले लहानसे उद्यान आहे. प्रांगणातील एका मोठ्या झाडाजवळ देवदेवतांच्या काही प्राचीन मूर्ती आहेत.

मुख्य मंदिराच्या दर्शनमंडपाच्या दोन्ही बाजूला गजराजांची मोठी शिल्पे आहेत. त्यांच्या पाठीवर असलेल्या शालींवर सूर्यदेवतेचे चित्र कोरलेले आहे. त्यावर हातात ध्वज घेऊन माहूत आरुढ आहेत. रंगकाम केल्यामुळे गजराजांची ही शिल्पे सुंदर भासतात. दर्शनमंडप, दुमजली सभामंडप खुले गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासह मंदिराच्या बाहेरील भागांवर कलाकुसर असलेले नक्षीकाम आहे. मंदिरात १८ स्तंभ आहेत. असे सांगितले जाते की गावचे मानकरी असलेल्या १८ कुमकरांच्या नावे येथील प्रत्येकी एक स्तंभ आहे. दुमजली सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर भाविकांना विशेषतः महिला भाविकांना बसण्याची सुविधा आहे. मंडपाच्या छतावर काचेची मोठी झुंबरे लावली आहेत, त्यामुळे येथील सौंदर्य आणखी खुलते. सभामंडपाच्या पुढे धनीआकार (स्वयंभू शंकर), जुगाई, रेडजाई, महालक्ष्मी, भैरोबा, वाडेश्वर यांचे लहान गाभारे आहेत. या गाभाऱ्यांच्या डावीकडे सोळजाई देवीचे स्थान आहे. सोळजाई देवीसह येथील सर्व मूर्ती या अखंड काळ्या पाषाणातून घडविलेल्या आहेत.

माघ वद्य पंचमीला येथे मोठी यात्रा भरते. चैत्र प्रतिपदा नवरात्रीतही मोठा उत्सव होतो. येथील प्रमुख उत्सव असतो तो कार्तिक पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळीला भरणारी लोटांगण यात्रा. या दिवशी पहाटे देवीचे विधिवत पूजन केल्यानंतर तिला रूपे (सोने चांदीचे मुखवटे) लावले जातात. देवीसमोर गाऱ्हाणे घातले जाते त्यानंतर पालखी मिरवणूक सुरू होते. सकाळी बाहेर पडलेली देवीची पालखी थेट सायंकाळी मंदिरात परतते. नवस फेडण्यासाठी आलेले भाविक यावेळी मंदिरासमोरील अंगणात प्रदक्षिणेच्या रूपात लोटांगण घालतात. यात्रेच्या वेळी नोकरीव्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले येथील ग्रामस्थ या गावातून लग्न होऊन दुसऱ्या गावी गेलेल्या स्त्रिया आवर्जून उपस्थित राहतात.

मंदिरात होणाऱ्या विविध उत्सवांसोबतच देवरुख येथील मरिमाय यात्रा ही जिल्ह्यात भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी एक आहे. रोगराई पसरू नये गावावर कोणतेही अरिष्ट येऊ नये म्हणून सोळजाई मंदिरानजीक असलेल्या व्याडेश्वर मरिमाय मैदानावर दरवर्षी हनुमान जयंतीला ही यात्रा भरते. अनेक भाविक यावेळी नवस बोलण्यासाठी नवसपूर्तीसाठी येतात. येथील वैशिष्ट्य असे की या यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून मटणभाकरी दिली जाते. गावातील शिंपणोत्सवही प्रसिद्ध आहे. उत्सवादरम्यान गावातील खालची आळी, शिवाजी चौक, मारुती मंदिर, भोईवाडा, रोहिदास आळी आणि सोळजाई मंदिरात होम पेटवला जातो.

सोळजाई मंदिराशिवाय देवरुख प्रसिद्ध आहे ते येथील गणेशमूर्तींच्या अनोख्या संग्रहालयासाठी. येथील उषाताई नातू गणेश संग्रहालयात देशविदेशांतील दोनशेहून अधिक लहानमोठ्या गणेशमूर्ती एकत्रित ठेवण्यात आल्या आहेत. देवरुखमध्ये चौसोपी हे ठिकाणसुद्धा प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी घोड्यांचा तबेला होता कवी कलश हे तेथील सर्व व्यवस्था पाहत असत. देवरुखपासून काही अंतरावर मार्लेश्वर, टिकलेश्वर, कर्णेश्वर ही प्रसिद्ध देवस्थानेही आहेत.

उपयुक्त माहिती:

  • संगमेश्वरपासून १७ किमी, तर रत्नागिरीपासून ४९ किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून देवरुखसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात 
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : शरदचंद्र गांधी, अध्यक्ष, मंदिर ट्रस्ट : ९४२३८७४७५२, भाई शिंदे, सेवेकरी : ९६३७६०५७०९
Back To Home