अक्कलकोट येथे स्वामी समर्थ, शेगावमध्ये गजानन महाराज आणि शिर्डीत साईबाबा यांच्यासारख्या विभूती ज्याप्रमाणे प्रगट झाल्या, त्याचप्रमाणे फलटणच्या पवित्र भूमीत अश्विन शुद्ध द्वादशी शके १७९७ म्हणजेच इ. स. १८७५ या दिवशी येथील मारुती मंदिरात संत श्री हरिबाबा यांनी फलटणवासीयांना दर्शन दिले होते. ‘प्रत्येक काम चित्त शुद्ध ठेवून करा’ हा उपदेश देणाऱ्या हरिबाबांचे अनेक शिष्य व अनुयायी आहेत. फलटणमधील मलठण परिसरात हरिबाबा यांचे समाधी मंदिर असून ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
श्री हरिबाबा चरित्रातील माहितीनुसार, एके दिवशी येथील मारुती मंदिरात एक महात्मा प्रगट झाला आहे, अशी बातमी गावात पसरली. कुणी उत्सुकतेपोटी तर कुणी त्यांच्या दर्शनासाठी मारुती मंदिर परिसरात जमू लागले; परंतु संध्याकाळ झाली, तरी हा महात्मा सकाळी घातलेल्या सिद्धासनातच स्थिर होता, याचे येथील ग्रामस्थांना अप्रुप वाटले. सायंकाळच्या वेळी फलटण संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक–निंबाळकर आपल्या नित्यक्रमाप्रमाणे मारुतीच्या दर्शनासाठी आले असता, त्यांच्या नजरेस हा महात्मा पडला. त्यांनी त्यांचे दर्शन घेऊन राजवाड्यावर येण्याची विनंती केली. राजाच्या विनंतीला मान देऊन ते राजवाड्याकडे निघाले. राजांनी सुग्रास भोजन देऊन त्यांची भक्तिभावाने सेवा केली. मुधोजी राजांनी या महात्म्याबाबत माहिती काढली असता फलटणला प्रगट होण्याआधी ते पणदरे या फलटणपासून जवळ असलेल्या गावी लोकांना दिसले होते. त्यानंतर नातेपुते, पंढरपूर व शिखर शिंगणापूर येथेही त्यांचे वास्तव्य होते. लोक त्यांना हरिबाबा या नावाने ओळखत असत.
फलटणक्षेत्री प्रगट झाले तेव्हा हरिबाबांचे वय ४० वर्षांचे होते. हरिबाबांचे मन राजवाड्यात न रमल्याने ते पुन्हा मारुती मंदिरात आले. वैराग्य हाच अलंकार घालून वावरणाऱ्या हरिबाबांच्या अनेकदा मध्यरात्री रस्त्यात उभे राहून भजन करणे, कधी दगड एकत्र करून त्यावर बसणे, तर कधी तापलेल्या वाळूवर आडवे होऊन विठ्ठल भजनात तल्लीन होणे, अशा लीला लोकांना पाहायला मिळत असत. हरिबाबांना मराठीसह विविध भाषा अवगत होत्या. त्यामुळे ते तेलगू, कानडी या भाषांमध्येही भजन करीत असत. तरीही भजनात असा भाव असायचा की ऐकणारे भाषा कळत नसेल तरी त्यात तल्लीन होऊन जात असत. भजनाचा शेवट मात्र ‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल…’ अशी गर्जना करूनच होत असे.
हरिबाबा कधी कधी मंदिरात येत असत व देवाचे दर्शन घेऊन निघून जात. कधी ते तिथे सुरू असलेले कीर्तन वा प्रवचन ऐकण्यासाठी थांबत, तर कधी तेथेच झोपी जात असत. कधी ते शांत वाटत, तर कधी उग्र भासत. हरिबाबा गावातून फिरत असताना त्यांच्या कृतीतून अनेकदा कोणाचे ना कोणाचे नुकसान होत असे. ते टाळण्यासाठी मुधोजी राजांनी हरिबाबांच्या मागेमागे फिरायला सेवक ठेवले होते; परंतु काही दिवसांतच ‘हे जमणे शक्य नाही’ हे लक्षात आल्यामुळे राजांनी ती योजना गुंडाळून ठेवली.
असे सांगितले जाते की असाध्य रोगांनी पीडित असलेले वैद्य व डॉक्टरांनी हात टेकलेले रोगी हरिबाबांची एक दृष्टी पडल्यावर निरोगी होत असत. समस्या असलेल्या घरासमोर ते अचानक दत्त म्हणून उभे राहत आणि त्या व्यक्तीला उपाय सांगून लगेच तेथून दिसेनासेही होत असत. त्यामुळे हरिबाबा हे येथील लोकांना प्राणवायूसारखे झाले होते. अशीच अनेक वर्षे गेल्यानंतर उतारवयात हरिबाबांचा मुक्काम फलटणजवळील मलठणमध्ये होता. शरीर थकल्यामुळे त्यांची भ्रमंती थांबलेली होती. हरिबाबा धर्मशाळेतील एका खोलीत राहत असत. भक्तमंडळी तेथे सतत भजन करत असत. हरिबाबांच्या आज्ञेप्रमाणे भक्तांनी रथसप्तमीच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम करून उत्सव साजरा करायला सुरुवात केली होती. दुसऱ्या वर्षी रथसप्तमीचा कार्यक्रम संपल्यावर एक सेवक बाबांचे पाय चेपत होता, पण एका क्षणी बाबांचे पाय गार पडले. वैद्यांना बोलावल्यानंतर बाबांनी देह सोडल्याचे समजताच येथील भजनाचे रूपांतर आक्रोशात झाले.
अगदी साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा महात्मा आता भेटणार नव्हता, त्यामुळे प्रत्येकाला दुःख आवरत नव्हते. खुद्द मुधोजीराजे भोसले यांनी येथे येऊन हरिबाबांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार पर्वतराव निंबाळकर यांनी मलठण येथील त्रिजटेश्वर आणि पुंडलिक मंदिराच्या मध्यावर त्वरित समाधी बांधून घेतली. त्यानंतर हरिबाबांची पूजा आणि आरती झाली. ढोल, ताशे, झांज, शंख, तुतारी, घंटा, दुंदुभी या वाद्यांच्या गजरात फुलांच्या विमानात बसवून हरिबाबांची मिरवणूक समाधीस्थानापर्यंत आणण्यात आली. समाधीच्या आत उत्तम आसन तयार करण्यात आले होते, त्यावर हरिबाबांना बसवण्यात आले. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर माघ शुद्ध एकादशी शके १८२० म्हणजे इ.स.१८९८ या दिवशी दुपारी ४.३० वाजता समाधी बंद करण्यात आली, तेव्हा ‘सद्गुरु हरिबाबा महाराज की जय…’ या घोषणांनी सारा परिसर दुमदुमत होता.
बाणगंगा नदीच्या किनाऱ्यावर संत हरिबाबा समाधी मंदिर आहे. मंदिराला सर्व बाजूंनी तटबंदी असून त्यात असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप, दर्शनमंडप व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. सभामंडप खुल्या स्वरूपातील असून येथील प्रत्येक लाकडी खांबावर हरिबाबांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग चित्र–माहिती रूपात लावलेले आहेत. दर्शन मंडपातील खांबांवर नक्षीकाम असून वरील बाजूस ते एकमेकांशी कमानीद्वारे जोडण्यात आले आहेत. गर्भगृहात हरिबाबांची दगडी समाधी आहे व त्यावर त्यांच्या पादुका कोरलेल्या आहेत.
हरिबाबा समाधी मंदिराचा परिसर मोठा असून येथे भाविकांच्या सोयीसाठी धर्मशाळा आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस शिळा मंदिर आहे. फलटणमधील वास्तव्यात या शिळेवर तासनतास बसून ते भजन करीत असत. हरिबाबांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली ही एकमेव शिळा आहे. माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) ते माघ शुद्ध द्वादशीपर्यंत महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा येथे मोठ्या उत्साहात पार पडतो. याशिवाय अश्विन शुद्ध द्वादशीला महाराजांचा प्रगटदिन सोहळा असतो.