सध्याचे पवनार हे वर्धा जिल्ह्यातील एक छोटेसे गाव असले तरी ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या या गावाची विशेष ओळख आहे. इ. स. पूर्व १००० पासून या भागात मानवी वस्ती असल्याचे पुरावे संशोधकांना सापडले आहेत. पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते, वाकाटक काळात येथे समृद्धी नांदत होती. त्यावेळचा राजा प्रवरसेन याने या परिसरात अनेक मंदिरे उभारली होती. त्यामुळे आजही पवनारमध्ये खोदकाम केले असता जागोजागी शेकडो वर्षांपूर्वीच्या अनेक मूर्ती, शिवपिंडी व नंदी सापडतात.
पवनारमध्ये धाम नदीच्या किनाऱ्यावर नंदीखेडा परिसर असून तेथे वाकाटककालीन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे जरी महादेवाचे मंदिर असले तरी ते येथील नंदीसाठी प्रसिद्ध आहे. येथील नंदीमुळे या परिसराला नंदीखेडा हे नाव पडले आहे. असे सांगितले जाते की या नंदीखाली धनाचा मोठा साठा आहे. विदर्भातील मोजक्या प्राचीन मंदिरांमध्ये हे मंदिर गणले जाते. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान असून येथे महादेवाऐवजी नंदीला नवस बोलले जातात. हे जागृत स्थान असून नंदीला बोललेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ऐतिहासिक नोंदींनुसार, वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने आपल्या कारकिर्दीत रामटेकजवळील नगरधन (नंदीवर्धन) येथून आपली राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतरित केली. प्रवरसेनने वसविल्यामुळे त्यास प्रवरपूर हे नाव प्राप्त झाले. तेच पुढे पवनार म्हणून प्रचिलित झाले. असे सांगण्यात येते की प्रवरसेनची पत्नी प्रभावती शंकराची निस्सीम भक्त होती. तिच्यासाठी प्रवरसेन राजाने येथील धाम नदीच्या तीरावर शंकराचे मंदिर उभारले. राणी प्रभावती दररोज स्वतः मडक्यातून नदीतील पाणी आणून येथील शिवपिंडीला अभिषेक घालत असे. तेव्हापासून हे शिवमंदिर येथे असल्याचे सांगितले जाते.
धाम नदीपात्रात सात ते आठ फूट उंचीवर हे मंदिर असून नदीच्या पाण्यामुळे मंदिराचे नुकसान होऊन नये म्हणून संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या बाजूला नव्याने सभामंडप बांधण्यात आला असून तेथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मूळ मंदिराच्या सभामंडपात अखंड काळ्या पाषाणातील नंदी असून त्यावर कोरीव काम आहे; परंतु आता मात्र त्याला रंग दिला आहे. विशेषतः या नंदीला नवस बोलण्यासाठी भाविकांची येथे कायम गर्दी असते. या नंदीबाबत आख्यायिका अशी आहे की नंदीखाली मोठ्या प्रमाणात धन असून त्या धनाचे रक्षण हा नंदी करीत आहे. काही वर्षांपूर्वी धनाच्या लालसेपोटी चोरट्यांकडून नंदीला त्याच्या जागेवरून बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला असता त्याने हंबरडा फोडल्याचा आवाज ग्रामस्थांना आला व चोरांचा प्रयत्न निष्फळ ठरला. तेव्हापासून या नंदीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. आजही येथील काही ज्येष्ठ नागरिक नंदी हंबरण्याचा आवाज आपण स्वतः ऐकल्याचे सांगतात.
महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. याशिवाय श्रावणी सोमवार व नागपंचमीलाही येथे हजारो भाविकांची गर्दी असते. नदीकाठावर असल्याने हा परिसर रम्य भासतो. त्यामुळे दररोज भाविकांसह शेकडो पर्यटकही येथे येतात. मंदिर परिसरात दुर्गामाता मंदिर, गजानन महाराजांची मूर्ती असलेले दत्तूजी भगत देवस्थान तसेच श्रीदत्त, श्रीगणेश आणि दुर्गादेवी यांच्या लहान मूर्ती असलेली मंदिरे आहेत. मंदिरासमोरील जागेवर उद्यान विकसित करण्यात आले असून त्याच्या मध्यभागी शंकराची मूर्ती व मोठे शिवलिंग आहे. या मंदिरापासून जवळच धाम नदीच्या पात्रातील आचार्य विनोबा भावे यांच्या समाधीकडे जाणारी पायवाट आहे.
प्राचीन महादेव मंदिराव्यतिरिक्त पवनार येथे धाम नदीच्या पलीकडे आचार्य विनोबा भावे यांचा परमधाम हा प्रसिद्ध आश्रम आहे. या आश्रमाला भेट देण्यासाठी देश–विदेशांतील लोकही पवनारमध्ये येत असतात. १९४८ साली फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परमधाम आश्रमासमोर धाम नदीपात्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यांच्या स्मरणार्थ तेथे महात्मा गांधी स्तंभ व भव्य छत्रीही उभारण्यात आली आहे. या स्मारक छत्रीच्या मुख्य स्तंभावर गांधीजींची काही वचने संगमरवरी दगडांवर कोरलेली आहेत.