मुधाई देवी मंदिर

देऊर, ता. कोरेगाव, जि. सातारा

महाराष्ट्राची वैष्णोदेवी म्हणून ओळखले जाणारे सातारा जिल्ह्यातील देऊर येथील मुधाई मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी २५ फूट खोल पायऱ्या उतरून, अवघ्या दीड फूट चौरस आकाराच्या प्रवेशद्वारामधून, देवीच्या गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गर्भगृहात देवीची शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती असून येथील गर्भगृह अखंड दगडात कोरलेले आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की देऊरपासून जवळ दहिवड गाव आहे. या गावातील एक देवीभक्त मुधोजी चव्हाण तुळजा भवानीचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे ते दरवर्षी चुकता देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी जात असत. एके दिवशी मुधोजी तुळजापूरमध्ये असताना देवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्यावर प्रसन्न असून आता तुला माझ्या दर्शनासाठी येथे येण्याची गरज नाही. मीच उद्या तुझ्या मागे तुझ्या गावी येईन. त्यानुसार मुधोजी दुसऱ्या दिवशी पहाटे दहिवड येथे येण्यासाठी निघाले; परंतु देऊर गावापर्यंत आल्यावर त्यांना आपल्याला झालेला स्वप्नदृष्टांत खरा आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी मागे पाहिले. आपल्या भक्ताने दाखविलेल्या अविश्वासामुळे तेथेच विजांचा कडकडाट होऊन देवी गुप्त झाली. ग्रामस्थांच्या मदतीने मुधोजींनी या ठिकाणी खोदकाम केले असता तेथे जमिनीत देवीची मूर्ती दिसली; परंतु मूर्ती तेथून बाहेर काढता त्याच जागेवर देवीचे मंदिर बांधण्यात आले. मुधोजीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन आलेली देवी म्हणून पुढे या देवीचे नामकरण मुधाई देवी असे झाले.

कोरेगाव तालुक्यात वसना नदीच्या काठावर देऊर हे गाव आहे. येथील जागृत मुधाई देवी मंदिर हेमाडपंती रचनेच्या विठ्ठल मंदिरामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. मुधाई देवी या परिसरातील अनेक कुटुंबांची कुलदेवता असून देऊरची ग्रामदेवता आहे. देवीचे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या समोर दोन उंच दीपमाळा आहेत. तेथील प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात जाता येते. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातून गर्भगृहात जाण्यासाठी पुन्हा पायऱ्या उतरून जावे लागते. येथील गर्भगृह भुयारासारखे असून दीड फूट चौरस आकाराच्या प्रवेशद्वारातून आत जाता येते. या प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य असे की कितीही स्थूल व्यक्ती असला तरी त्याला येथून सहजच गर्भगृहात जाता येते. एकावेळी पाच ते सहा भाविक बसू शकतील, एवढी जागा गर्भगृहात आहे. गर्भगृहाची उंचीही कमी असल्याने आतमध्ये गुडघ्यावर बसूनच भाविकांना देवीचे दर्शन घ्यावे लागते. येथे सुमारे साडेतीन फूट उंचीची देवीची शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती आहे. ज्या दगडात देवीची मूर्ती आहे, त्याच दगडामध्ये मंदिराचा पूर्ण गाभारा आहे. सामान्यतः अशी भुयारातील मंदिरे ऋषीमुनींच्या तप करण्याच्या जागा असतात किंवा अशा स्थानांवर शिवपिंडी असते; परंतु हे मंदिर त्याला अपवाद आहे

नवरात्रोत्सव हा येथील मोठा उत्सव असतो. या नऊ दिवसांत देवीच्या दर्शनाला लाखो भाविक येतात. यावेळी मंदिर परिसरात असंख्य विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. दररोज विविध वस्त्र अलंकारांनी देवीची मूर्ती सजविली जाते. या दिवसांत दररोज देवीची पालखी काढण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याचा मान वडगाव येथील चव्हाण घराण्याकडे असतो. अनेक नवदाम्पत्य या मंदिरात देवीचा गोंधळ घालून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करतात.

या मंदिराशिवाय देऊर गावात १३व्या शतकातील विठ्ठल मंदिरही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गावाजवळील एका उंचवट्यावर, तटबंदीमध्ये काळ्या पाषाणातील हेमाडपंती रचनेचे हे मंदिर आहे. येथील सभामंडपाचे प्रवेशद्वार उंबऱ्यावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपाच्या खांबावर नक्षीकाम आहे. तेथे अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले असून येथील पद्मनाभ मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर विठ्ठलरुक्मिणीच्या मूर्ती आहेत.

उपयुक्त माहिती:

  • कोरेगावपासून २० किमी, तर साताऱ्यापासून २१ किमी अंतरावर
  • कोरेगाव सातारा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मुधाई देवी मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home