सातारा–बामणोली मार्गावर कास पठाराच्या अलीकडे पेट्री नावाचे गाव लागते. तेथील एका टेकडीवरील गुहेत शिवपेटेश्वर हे शंकराचे जागृत स्थान असून ते अनेक भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. सातारा तालुक्यातील निसर्गरम्य व सुंदर ठिकाणांपैकी हे एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. सज्जनगडासमोर व उरमोडी धरणाच्या वर वसलेले हे ठिकाण पर्यटकांसोबत भाविकांमध्ये विशेष प्रिय आहे. असे सांगितले जाते की येथे असलेल्या शिवपेटेश्वर गुहेत शंकराची आराधना केल्यास जीवनातील ताण–तणाव कमी होऊन मनःशांतीची अनुभूती मिळते.
या स्थानाची आख्यायिका अशी की पांडवकाळात राजा मुचकुंद याने अनेक राक्षसांबरोबर युद्ध करून त्यांना यमसदनी धाडले होते. सततच्या युद्धामुळे राजा थकून गेला होता व त्याचे मानसिक स्वास्थ्यही ढळू लागले होते. त्यामुळे त्याने सूर्यनारायणाची उपासना सुरू केली. काही दिवसांनी सूर्यदेव प्रसन्न होऊन त्यांनी राजास वर मागायला सांगितले. त्यावर राजाने सूर्यदेवाकडे विश्रांती आणि मनःशांतीसाठी एक ठिकाण मागितले. याशिवाय जो कोणी माझी विश्रांती अथवा निद्रा भंग करील त्याला मी पाहताक्षणी तो जळून भस्म होईल, असा वर मागितला. त्यावेळी सूर्यदेवाने मुचकुंदास हे ठिकाण सांगितले. त्यानंतर राजा मुचकुंद या ठिकाणी विश्रांती घेत होता.
या कालावधीत काल्यवन नावाच्या एका राक्षसाने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात धुमाकूळ घातला होता. त्याच्यापुढे कोणत्याही देवाचे काही चालेनासे झाले. त्यावेळी श्रीकृष्ण त्याच्याशी युद्ध करावयास गेला. अनेक दिवस चाललेल्या या युद्धात काल्यवनासमोर श्रीकृष्णाचेही काही चालत नव्हते. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला युद्ध करता करता या परिसरात आणले. येथे आल्यावर श्रीकृष्णाने घाबरल्याचे दाखवून डोंगरावर पळ काढला. श्रीकृष्ण घाबरला आहे हे पाहून काल्यवनास आणखी चेव चढला व त्याने श्रीकृष्णाचा पाठलाग केला. त्या वेळी श्रीकृष्ण डोंगरावर असलेल्या गुहेत जेथे मुचकुंद राजा विश्रांती घेत होता, तेथे जाऊन लपला; परंतु हे करताना श्रीकृष्णाने आपला शेला राजाच्या अंगावर पांघरला. काल्यवन या गुहेत आला आणि कृष्ण समजून झोपलेल्या मुचकुंद राजास त्याने जागे केले. जागे केल्यावर मुचकुंद राजाने आपल्यासमोर काल्यवनास पाहिले आणि दुसऱ्या क्षणीच काल्यवनाचे शरीर जळून (पेटून) भस्म झाले. त्यानंतर श्रीकृष्णांनी झालेला प्रकार राजास सांगितला. राजाने पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर या ठिकाणी शिवपिंडीची स्थापना केली. तेव्हापासून हे ठिकाण शिवपेटेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.
साताऱ्याकडून कास पठाराकडे जाताना रस्त्यात पेट्री नावाचे गाव लागते. या गावात रस्त्याच्या डावीकडील टेकडीवर शिवपेटेश्वर गुहा आहे. येथे जाण्यासाठी गावापासून पायवाट आहे. १५ ते २० मिनिटे चालल्यावर या ठिकाणी पोचता येते. पायवाटेने जाताना खाली दक्षिणेकडील उरमोडी धरणातील मोठा जलसाठा व उत्तरेकडील कण्हेर धरणाचे सुंदर दृश्य दिसते. उरमोडी धरणाच्या पलिकडे असलेला सज्जनगडही येथून नजरेच्या टप्प्यात येतो. धरणाच्या जलसाठ्याकडून वाहणारा थंडगार वारा व निसर्गरम्य परिसर यामुळे येथील चढाई सोपी होते. या वाटेने डोंगरावरील सुळक्याच्या मागच्या बाजूला गेल्यावर एक मोठी गुहा दिसते. या गुहेत शिवपेटेश्वराचे स्थान आहे.
ही गुहा साधारणतः ३० फूट रुंद, १० फूट उंच व २२५ फूट खोल आहे. गुहेच्या आतील बाजूस एका षटकोनी चौथऱ्यावर नंदी असून त्यापुढे काही अंतरावर एक शिवपिंडी आहे. पिंडीच्या मागील बाजूसही काही विवरे आहेत. त्या विवरांमध्ये पाण्याचे साठे असून अंधार व कमी उंची असल्यामुळे त्यात जाणे शक्य होत नाही. ही विवरे आतील बाजूंनी एकमेकांना जोडलेली असावीत, असे सांगितले जाते. शिवपेटेश्वर गुहेच्या वर एक पठार (टेबल लॅण्ड) आहे. पावसाळा व त्यानंतर डिसेंबरपर्यंत या हिरव्यागार पठारावर दररोज शेकडो पर्यटक येत असतात. पठारावर जाण्यासाठी शिवपेटेश्वर गुहेसमोरील पायवाटेने टेकडीला वळसा घालून जाता येते.