शकुंतलेश्वर मंदिर

वडूथ, ता. सातारा, जि. सातारा

छत्रपती शाहू महाराजांकडून पेशवाईची वस्त्रे स्वीकारण्यासाठी पुण्याहून सातारा येथे जात असताना तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव यांचा मुक्काम वडूथ येथे होता. त्यावेळी महादेवांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी २४ ते ३० मे १७५८ या सहा दिवसांत या मंदिराचा गाभारा बांधला त्यानंतर ते वस्त्रे स्वीकारण्यासाठी छत्रपती शाहूंसमोर हजर झाले. परतीच्या मार्गावरही त्यांनी येथे येऊन शकुंतलेश्वराचे दर्शन घेतले मंदिर बांधण्याचे आदेश देऊन ते पुढे गेले. वडूथ येथील हे दुमजली मंदिर मराठा स्थापत्य शैलीतील सर्व बांधकामांमध्ये वैशिष्टपूर्ण ठरावे असे आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की पुराणकाळात येथील कृष्णा नदीच्या काठावर निचूल ऋषींचे आश्रम होते. या ऋषींची अशी ख्याती होती की कोणीही त्यांच्याकडे गेल्यावर त्याला ते रिकाम्या हाताने पाठवत नसत. देवराज इंद्राला जेव्हा हे समजले, तेव्हा त्याने ऋषींची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यासाठी तो गिधाडाचे रूप घेऊन येथील ऋषींच्या आश्रमाजवळ आला आणि त्याने ऋषींकडे नरमांसाची मागणी केली. ऋषींनी आपल्या मुलांना बोलावून त्यांना या गिधाडाच्या मागणीबद्दल सांगितले; परंतु मुलांनी आपले मांस गिधाडाला देण्यास नकार दिला. तेव्हा ऋषींनी चिडून मुलांना शाप दिला की तुम्ही पक्षी योनीत जन्म घ्याल.

आपली किर्ती वाया जाऊ नये म्हणून ऋषींनी गिधाडास स्वतःचे मांस देण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी इंद्र प्रकट झाला आणि त्याने आपली परीक्षा घेतल्याचे सांगितले. इंद्राच्या या वागण्याचा ऋषींना राग आला आणि त्यांनी इंद्रालाही शाप दिला की तूसुद्धा शकुंत (पक्षी) होऊन येथे राहशील. इंद्राला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला त्याने ऋषींकडे क्षमायाचना केली. तेव्हा ऋषी म्हणाले की ज्या वेळी अगस्ती ऋषी तुला भेटतील त्या वेळेस तू मुक्त होशील. त्यानंतर अनेक वर्षांनी अगस्ती ऋषी आणि शकुंतरुपी इंद्राची भेट झाली. अगस्तींनी त्याला कृष्णतीर्थ प्राशन करायला देऊन शिवनाम जपण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंद्राने जप केले असता शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी इंद्रास आशीर्वाद दिला की हे तीर्थ शकुंतेश नावाने प्रख्यात होईल आणि माझाही येथे वास असेल. तेव्हापासून हे तीर्थक्षेत्र शकुंतलेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले.

सातारा लोणंद मार्गावर वडूथ हे गाव आहे. या गावात कृष्णा नदीच्या तीरावरील शकुंतलेश्वर मंदिर दुरून एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. मंदिरावर २५ ते ३० फूट उंचीची भक्कम तटबंदी असून त्यावर चारी बाजूला बुरूज आहेत. नदी पात्रातून सुमारे १४ ते १५ पायऱ्या चढून मंदिराच्या पहिल्या मजल्यावर जाता येते. भव्य तटबंदीत असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच मारुतीचे मंदिर त्यामध्ये मारुतीची शेंदूरचर्चित मूर्ती दिसते. मारुती मंदिराच्या उजव्या डाव्या बाजूने वरच्या मजल्यावरील शकुंतलेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी १६ पायऱ्या आहेत. संपूर्ण दगडी हेमाडपंती रचनेच्या या मंदिराचे स्वरूप हे नंदीमंडप, सभामंडप गर्भगृह असे आहे. एका तीन फूट चौथऱ्यावर नंदीमंडप असून त्यात अखंड दगडातील कोरीव नंदीची मूर्ती आहे. या नंदी मंडपावरील शिखराची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

नंदीमंडपासमोर असलेल्या मुख्य मंदिराच्या सभामंडपात गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला श्रीगणेश पार्वतीमाता यांच्या प्राचीन मूर्ती आहेत. याशिवाय सभामंडपाच्या छतावर लहानलहान फुलांचे नक्षीकाम आहे. अशाच प्रकारची नक्षी ही मेणवली येथील नाना फडणवीस यांच्या वाड्याच्या भिंतीवर कोरलेली आहे. येथील गर्भगृह हे काहीसे खालच्या बाजूला असून तेथे अखंड काळ्या पाषाणातील शिवपिंडी आहेअसे सांगितले जाते की या शिवपिंडीवर गायीच्या पायाचा ठसा उमटला आहे.

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर श्रीगणेश, श्रीविष्णू आणि गरुड यांची मंदिरे आहेत. याशिवाय मंदिराच्या बाह्य भिंतीवर तटबंदीत असलेल्या कोनाड्यांमध्ये काही मूर्ती आहेत. त्यांमध्ये घोड्यावरील मूर्ती, विष्णू, लक्ष्मी गंगा यांच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिराच्या मागील बाजूस तटबंदीवर चढण्यासाठी पायरी मार्ग आहे. येथून तटबंदीवर आल्यावर कृष्णाकाठचा निसर्गसमृद्ध परिसर पाहता येतो. या तटबंदीवरून कृष्णामाईचे मंदिर जरंडेश्वराचा डोंगर दिसतो. मंदिराच्या कळसावर अनेक शिल्पे आहेत. ३५० वर्षांनंतरही या शिल्पांमधील रेखीवपणा जाणवतो.

येथील एक वैशिष्ट्य असे की मंदिराच्या बाजूलाच कृष्णा नदीच्या पात्रात एक लहान वृंदावन आहे. मंदिराच्या तटबंदीवरून ते पाहता येते. या वृंदावनात एक शिवलिंग असून ते वृंदावनाबाहेर काढता येते, पण कितीही मोठा पूर आला तरी ते शिवलिंग वाहून जात नाही. श्रावणात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात मोठे उत्सव साजरे केले जातात. या काळात मोठ्या प्रमाणावर अभिषेकही केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून ११ किमी अंतरावर
  • सातारा, लोणंद येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने कृष्णा नदीच्या तीरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home