सतोषा देवस्थान

टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा गोवा येथील धनगर समाजाचे अराध्य दैवत असलेले सतोषा देवस्थान सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील, टाकेवाडी येथील, उंच डोंगरावर आहे. मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी भाविक सतोषा देवाला कौल लावतात. लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे कायमच गर्दी असते. दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या डोंगरापेक्षा उंच डोंगर म्हणून सतोषागडाची ख्याती आहे.

सतोषा देवस्थानाबाबत आख्यायिका अशी की एकदा महादेव आणि त्यांचा भक्त असलेला सतोषा डोंगरवाटेने फिरत होते. या परिसरात फिरत असताना शिखर शिंगणापूरचे स्थान महादेवांना भावले म्हणून महादेवांनी तेथे वास्तव्य करण्याचे निश्चित केले. त्यांना एकमेकांची सोबत सोडायची नव्हती; परंतु सतोषा मांसाहारी असल्याने तेथे राहू शकत नव्हता. त्यामुळे त्याने शिखर शिंगणापूरच्या अगदी समोर असलेल्या टाकेवाडी येथील उंच डोंगरावर वास्तव्य करण्याचे ठरविले, ज्यामुळे दररोज त्याला तेथून महादेवांचे दर्शन घेता येईलयेथील वैशिष्ट्य असे की दररोज सकाळी सतोषा डोंगराची सावली शिखर शिंगणापूरच्या डोंगरावर पडते, तर सायंकाळी शिखर शिंगणापूरच्या डोंगराची सावली ही टाकेवाडी येथील सतोषागडावर पडते.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या तोंडले आणि टाकेवाडी या दोन गावांच्या सीमेवर असलेल्या डोंगरावर सतोषा देवाचे हे स्थान आहे. डोंगरावरील मुख्य मंदिराकडे जाण्याआधी पायथ्याशी देवाचे वाहन असलेल्या घोड्याची मूर्ती सतोषाची पत्नी कामाबाईचे मंदिर आहे. तेथून मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग सुरू होतो. या मार्गावर सुमारे ५०० पायऱ्या चढून डोंगरावरील मुख्य मंदिराजवळ जाता येते. या पायरी मार्गावर ऊन पावसापासून भाविकांचा बचाव व्हावा, यासाठी पत्र्याची शेड लावण्यात आले आहेत. नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिरावर विविध शिल्पे कोरलेली दिसतात. तेथून आठ ते दहा पायऱ्या चढून मुख्य मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना असून येथील सभामंडप तिन्ही बाजूने खुला आहे. या संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगडी आहे. सभामंडपातून समोरील शिखर शिंगणापूर गडाचेही दर्शन होते.

सभामंडपाच्या समोरील बाजूस कलाकुसर केलेला घोडा त्याचे शिंगरू यांची शिल्पे आहेत. या घोड्याजवळ मंदिर परिसरात शेकडो आरसे पितळी घंटा अडकविलेल्या दिसतातनवसपूर्तीनंतर भाविकांकडून येथे आरसे घंटा लावण्याची प्रथा आहे. मंदिरात देवाच्या विश्रांतीसाठी गादी आणि पलंग ठेवण्यात आला आहे. येथील गर्भगृह आकाराने लहान असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर सतोषा देवाची शेंदूरचर्चित भलीमोठी मूर्ती आहे. या देवाला दररोज फेटा बांधण्यात येतो. याशिवाय मूर्तीवर कडुनिंबाच्या पानांनी सजावट केली जाते. या पानांनीच देवाच्या चेहऱ्यावरील अवयव अधोरेखित केले जातात. मूर्तीच्या खालच्या बाजूला डावीकडे उजवीकडे दोन लहान लहान खड्डे आहेत. त्यामध्ये सुपारी ठेवून भाविकांकडून आपल्या अडचणी सोडविण्यासाठी या देवाकडून कौल घेण्याची पद्धत आहे. त्यानुसार दररोज येथे कौल लावले जातात. या देवावर भाविकांची अढळ श्रद्धा असून सतोषा देवाने दिलेला कौल पूर्ण झाल्यावर भाविकांकडून देवाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सतोषाची मोठी यात्रा भरते. तेव्हा पायथ्यापासून डोंगराच्या वरच्या टोकापर्यंत भाविकांची गर्दी दिसते. या यात्रेच्या वेळी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा गोवा या राज्यांमधील भाविकही येथे दर्शनासाठी येतात. ‘डोंगरच्या हरीचं चांगभलं, सतोषाबिरोबाचं चांगभलं…’ म्हणत भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविक यात्रेत सहभागी होतात. या यात्रेत घोंगड्या विकणाऱ्यांची संख्या मोठी असते. यावेळी भाविक धनगरी ओव्या, गजीनृत्य, सुंबरान भाकणुकीत दंग होतात. यात्रा कालावधीत सतोषा देवाला हजारो कोंबड्या बकऱ्यांचा मान दिला जातो.

टाकेवाडीच्या शेजारी असलेल्या पांगरी येथे बिरोबा देवाचे मंदिर आहे. सतोषा यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बिरोबाची यात्रा भरते. सतोषा मंदिरात दररोज सकाळी सायंकाळी देवाची आरती होते. या मंदिरासाठी असणारे पुजारीही धनगर समाजातील आहेत.

उपयुक्त माहिती:

  • फलटणहून ३० किमी, तर साताऱ्याहून ६३ किमी अंतरावर
  • दहिवाडीपासून १८ किमी अंतरावर
  • फलटणदहिवाडीमार्गे पायथ्यापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात पिठलं भाकरी मिळू शकते, निवासाची सुविधा नाही
Back To Home