जबरेश्वर मंदिर / श्रीराम मंदिर

फलटण, ता. फलटण, जि. सातारा

बाणगंगा नदीच्या तीरावर वसलेले फलटण शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे संस्थान होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सईबाई या फलटणचे मुधोजी निंबाळकर (दुसरे) यांच्या कन्या होत. या शहरामध्ये १३व्या १७व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्यामध्ये प्राचीन जबरेश्वर मंदिर त्याच्या शेजारीच राजवाड्याला लागून असलेले श्रीराम मंदिर ही मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने फलटण शहराचे वैभव मानली जातात.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले जबरेश्वर मंदिर हे राजवाड्याच्या समोरील बाजूस रस्त्याच्या मधोमध आहे. सुमारे तीन ते साडेतीन फूट उंचीच्या चांदणीच्या आकाराच्या जगतीवर (पाया) मंदिर उभे आहे. १३व्या शतकातील हे मंदिर असून त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांमुळे ते प्रसिद्ध आहे. मुधोजीराव निंबाळकर यांनी या गाभाऱ्यात शिवलिंगाची स्थापना केल्याची नोंद आहे.

जबरेश्वर मंदिर हे उत्तराभिमुख असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी त्याची रचना आहे. पायऱ्या चढून गेल्यावर मुखमंडप आहे. मुखमंडपाच्या दर्शनी भागात चार दगडी स्तंभ असून वरील बाजूस ते कमानीद्वारे जोडलेले आहेत. मंदिराचा सभामंडप अष्टकोनी आकाराचा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डावीकडील कोष्टकात पाच फण्यांची नागीण तिची दोन पिल्ले उजवीकडील कोष्टकात विठ्ठलरुख्मिणी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती दिसतात. गर्भगृहाचे प्रवेशद्वार कलाकुसरयुक्त आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीच्यावर २४ तीर्थंकारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. याशिवाय मंदिराच्या बाह्य भिंतींवर काही दिगंबर जैनांच्या मूर्ती कोरल्या आहेत. त्यामुळे ही वास्तू पूर्वी जैन मंदिर असावी, असा कयास लावण्यात येतो. गर्भगृहातील शिवपिंड चौकोनी आकाराची असून ती पुर्वाभिमुख आहे. या पिंडीवर दोन शाळुंका असून त्यांचा आकारही काहीसा वेगळा आहे.

मंदिराच्या बाह्यभिंतींवर देवीदेवतांच्या शिल्पांसोबतच अनेक सुरसुंदरी, आरशात पाहून शृंगार करणारी नर्तिका, प्रेमीयुगुल, आळस देणारी स्त्री, पुत्रवती आदी वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस शिवमूर्ती कोरलेली आहे. तिच्या पायाजवळ नंदी आहे. या मंदिरात महाशिवरात्री हा प्रमुख उत्सव असतो. या दिवशी दुपारी १२ वाजता होणाऱ्या महाआरतीसाठी शहरातील हजारो भाविक उपस्थित असतात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. याशिवाय त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा करण्यात येतो. त्यावेळी मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईसोबतच शेकडो दीप प्रज्वलित करण्यात येतात. यावेळी मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात हे मंदिर न्हाऊन निघते. सकाळी ते रात्री पर्यंत या मंदिरात भाविकांना जबरेश्वराचे दर्शन घेता येते.

जबरेश्वर मंदिरापासून जेमतेम ५० मीटर अंतरावर राजवाड्याला लागून २५० वर्षांपूर्वीचे श्रीराम मंदिर आहे. फलटणच्या राजघराण्यातील सगुणाबाई निंबाळकर यांनी १७७४ साली हे मंदिर बांधले, तर मुधोजी नाईक निंबाळकर यांनी १८७५ साली या मंदिरासमोर लाकडी मंडपाचे बांधकाम केल्याची नोंद आहे. मंदिराच्या आवारात तीन दगडी उंच दीपमाळा आहेत.

मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी आहे. सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्यावर असलेल्या एका शिलालेखात देवनागरी लिपीमध्ये हे मंदिर कोणी बांधले याचा उल्लेख आहे. या सभामंडपात ३२ लाकडी खांब असून ते एकमेकांशी नक्षीदार कमानीने जोडलेले आहेत. अंतराळात जाण्यासाठी असलेल्या लाकडी प्रवेशद्वाराच्या पश्चिमेला हनुमान, तर उत्तरेला गरुडाची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहात तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर गंडकी शिळेतून घडविलेल्या श्रीराम, सीता लक्ष्मण यांच्या उभ्या मूर्ती आहेत.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच देवदिवाळीच्या दिवशी येथे साजरा होणारा श्रीराम माता सीता यांचा रथोत्सव शहरातील विशेष मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. फळे, फुले, पाने, विविध रंगांची निशाणे उसाच्या मोळ्या बांधून हा रथ सजविला जातो. त्यामध्ये श्रीराम सीता यांच्या मूर्ती ठेवल्या जातात. सकाळी आठ वाजता विधिवत पूजा झाल्यानंतर सजविलेल्या रथाची शहरातून मिरवणूक निघते. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. या मिरवणुकीवर अनेक ठिकाणी फुलांची गुलालाची उधळण होते. दिवसभर नगरप्रदक्षिणा करून रात्री आठच्या सुमारास रथ पुन्हा मंदिराजवळ येतो. या रथयात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी होतात. याशिवाय रामनवमी हाही येथील महत्त्वाचा उत्सव आहे.

उपयुक्त माहिती:

  • फलटण बस स्थानकापासून किमी, तर साताऱ्यापासून ६४ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून फलटणसाठी एसटी सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home