दक्षिण काशी अशी ओळख असणाऱ्या वाई तालुक्यात महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कृष्णा नदीच्या तीरावर भुईंज गाव वसले आहे. या गावात भृगसंहिता लिहिणारे व सप्तऋषींपैकी एक असणारे भृगु ऋषी यांचे समाधी स्थान व त्यांची कन्या महालक्ष्मी हिचे मंदिर, अशी दोन प्रसिद्ध स्थाने आहेत. येथील महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात दहा दिवस भरणाऱ्या यात्रेची सर्वत्र ख्याती आहे. येथील वैशिष्ट्य असे की या मंदिरात घटस्थापना झाल्यानंतरच गावातील घरांमध्ये घटस्थापना केली जाते.
सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाई शहरापासून काही अंतरावर भुईंज हे गाव आहे. येथील महालक्ष्मीचे मंदिर हे प्राचीन असून ते शीवपूर्वकाळापासून असल्याचे सांगितले जाते. हेमाडपंती रचनेच्या या मंदिराला सर्व बाजूने तटबंदी असून पूर्वेकडील तटबंदीत मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. जमिनीपासून आठ ते दहा फूट उंचीवर असलेल्या मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी दहा पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या प्रांगणात व सभामंडपाच्या समोरील बाजूस दगडी दीपमाळ व वैशिष्ट्यपूर्ण तुळशी वृंदावन आहे. हे तुळशी वृंदावन चार हत्तींनी उचलून धरले आहे, अशी त्यावर कलाकुसर आहे.
मूळ मंदिराच्या समोरील बाजूस नव्याने मंडप बांधल्याचे जाणवते. हा मंडप तिन्ही बाजूने मोकळा आहे. मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात असून सभामंडपाच्या वरील बाजूस मोठा झुंबर आहे. गर्भगृहात एका उंच चौथऱ्यावर चांदीच्या मखरात महालक्ष्मी देवीची काळ्या पाषाणातील तीन फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. या मूर्तीला लागून असलेल्या संपूर्ण भिंतीवर चांदीच्या पत्र्यावर नक्षीकाम केले असल्यामुळे हा गर्भगृह खुलून दिसतो. फाल्गुन महिन्यातील काही दिवस सकाळची सूर्यकिरणे थेट महालक्ष्मी मूर्तीवर पडतात.
महालक्ष्मी मंदिराचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे नवरात्रोत्सवात येथे दहा दिवस भरणारी यात्रा. सातारा जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी ती एक समजली जाते. येथील महालक्ष्मी देवीचे मूळ ठाणे येथून जवळच असलेल्या भिरडाची वाडी येथे आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आधी येथील ग्रामस्थ देवीच्या मूळ ठाण्याकडे म्हणजेच भिरडाची वाडी येथे पालखी घेऊन देवीला आणण्यासाठी जातात. तेथील पूजाविधी आटोपून भुईंजकडे पालखी येते. यावेळी हजारो भाविक गावच्या नाक्यावर पालखीच्या प्रतीक्षेत थांबलेले असतात. नाक्यावरून वाजत–गाजत पालखी मंदिराकडे निघते. या पालखीच्या मार्गावर रोषणाई असली तरी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार या पालखी मिरवणुकीसोबत जुन्या बत्त्या (दिवे) व केरोसिनचे कंदील असतात.
घटस्थापनेच्या दिवशी पूजाविधी झाल्यानंतर मंदिरात घट बसविले जातात. मंदिरातील घटस्थापनेनंतर ग्रामस्थ आपापल्या घरी घट बसविण्यासाठी जातात. या महालक्ष्मीची सुमारे तीन फूट उंचीची आणखी एक मूर्ती असून ती चांदीची आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ती वर्षभर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली असते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ती मूर्ती बँक लॉकरमधून गावाच्या नाक्यावर आणली जाते. तेथे विविध आभूषणांनी सजवून नंतर मूर्ती मंदिराकडे आणली जाते. यावेळी देवीचे साजिरे रूप डोळ्यांत साठविण्यासाठी व दर्शनासाठी हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात. या देवीला ओवाळण्यासाठी सुवासिनी गर्दी करतात. नवरात्रीत दररोज देवीच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा होते.
दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच यात्रेच्या शेवटच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी महिलांची गर्दी होते. यावेळी दर्शनासाठी लांबचलांब रांगा लागतात. दुपारच्या सुमारास गावाच्या नाक्यावरील ठाण्यापासून देवीचा शालू वाजत– गाजत मंदिरात आणला जातो. यथासांग पूजा झाल्यानंतर सायंकाळी ‘हर बोला हर…’च्या गजरात देवीची पालखी मंदिरातून बाहेर पडते. या संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळ्या काढल्या जातात. ही पालखी जेव्हा वाजत–गाजत नाक्यावर येते तेव्हा फटाक्यांची आतषबाजी केली जाते. रात्रभर ही मिरवणूक सुरू असते. यामध्ये गुलालाची मनसोक्त उधळण करीत वाद्यांच्या गजरात भाविक तल्लीन होतात. पहाटेच्या सुमारास पालखी मंदिरात आल्यावर या दहा दिवसांच्या यात्रेची सांगता होते. या यात्रेदरम्यान भुईंजमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरविल्या जातात. याशिवाय हॉलिबॉल स्पर्धा, तसेच दांडिया नृत्याचेही आयोजन करण्यात येते.
महालक्ष्मी मंदिराच्या उत्तरेकडे सुमारे १०० मीटर अंतरावर ‘भृगुसंहिता’ या भविष्यग्रंथाची निर्मिती करणाऱ्या भृगु ऋषींचे समाधी स्थान आहे. १९८९ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर समाधी स्थानाला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भृगु ऋषींच्या समाधी शिळेवर त्यांच्या पादुकांची स्थापना केलेली आहे. या शिळेच्या खाली त्यांची ध्यानधारणेची जागा व समाधी आहे. समाधी मंदिरासमोर सभामंडप असून त्याभोवती श्रीदत्त, श्रीगणेश यांच्या मूर्ती व शिवलिंग आहेत. भृगु ऋषींच्या वास्तव्यामुळे या गावाला भुईंज नाव पडले असावे, असे सांगितले जाते. प्रत्येक १२ वर्षांनंतर नाशिकचा कुंभमेळा पार पडल्यानंतर मोठ्या संख्येने नागा साधू या मंदिरात दर्शनासाठी येतात. नागासाधूंच्या वास्तव्यासाठी या परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिराजवळ कृष्णा नदीवर एक घाट बांधण्यात आला आहे. गावात अशा प्रकारचे आठ घाट नदीवर बांधण्यात आले आहेत.