गोंदवलेकर महाराज मंदिर,

गोंदवले, ता. माण, जि. सातारा

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी संत एकनाथ महाराज या संतांमुळे महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून ओळखली जाते. या संतांच्या मांदियाळीतील एक संत म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. लाखो भक्तांना रामनामाच्या भक्तीत तल्लीन करणारे आणि अन्नदानाचा महिमा सांगणारे गोंदवलेकर महाराज यांची सातारा जिल्ह्यातील गोंदवले ही जन्मभूमी. माण तालुक्यातील माणगंगा नदीच्या काठावर असलेले गोंदवले हे गाव महाराजांच्या येथील वास्तव्याने आज संपूर्ण देशात पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

गोंदवलेकर महाराजांचा जन्म १८४५ साली झाला. त्यांचे मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे असे होते. त्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होते. लहानपणापासून भजन, किर्तन पारायण ऐकल्यामुळे वैराग्य येऊन गुरूचा शोध घेण्यासाठी ते वयाच्या बाराव्या वर्षीच घराबाहेर पडले. या काळात त्यांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये हरिपूर (सांगली) येथील साध्वी राधाबाई, मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्रीस्वामी, हुमणाबादचे माणिक प्रभु, काशीचे तैलंगस्वामी, दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस यांचा समावेश होता. श्रीरामकृष्णांनी त्यांना येहळेगांवच्या श्रीतुकाराम चैतन्यांकडे जाण्यास सांगितले. गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांना अनुग्रह केला आणि ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले. सद्गुरु भेटल्यावर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली होती.

परमेश्वरप्राप्तीचा सुलभ मार्ग म्हणून सर्वसामान्य भाविकांना उपदेश देण्यात गोंदवलेकर महाराजांनी आपले आयुष्य खर्ची घातले. श्रीरामाचे सतत स्मरण करावे, रामाची भक्ती केल्यामुळे संसार सुखाचा होतो, नामात दंग झाल्याने राम आपल्या मागे आहे याचा अनुभव येतो, असा ते भाविकांना सतत उपदेश करीत असत. देशभरात अनेक ठिकाणी त्यांनी श्रीराम, श्रीदत्त शनिदेव यांची मंदिरे बांधली. इतरांनाही मंदिरे बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले. श्री गोंदवलेकर महाराजांनी स्वतः देशभरात २५ हून अधिक राम मंदिरे स्थापन केली. यामध्ये थोरले राममंदिर, आटपाटी दत्तमंदिर धाकटे राममंदिर (गोंदवले), बेलधडी राममंदिर आनंदराम मंदिर (जालना), जवळगेकर राममंदिर (सोलापूर) तिळवणकर राममंदिर (वाराणसी), पट्टाभीराम राममंदिर (हरदा, मध्य प्रदेश), सोरटी राममंदिर (उज्जैन), मांडवे राममंदिर (सोलापूर), यावंगल राममंदिर (कर्नाटक), दत्तमंदिर (सातारा), आटपाडी येथील राममंदिराचा समावेश आहे. याशिवाय शेकडो मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्वार केला.

१८७६ १८९६ या वर्षांमध्ये प्रचंड दुष्काळ पडला असता त्यांनी गोंदवले आणि जवळच्या गावांतील लोकांसाठी आपली धान्याची कोठारे खुली केली. लोकांना स्वत:च्या शेतावर कामाला लावून त्यांच्या रोजच्या जेवणाची सोय केली. दुर्बल, गरीब आणि वृद्धांना मोफत अन्नदान केले. गोंदवलेकर महाराजांचे हे कार्य पाहून औंधच्या तत्कालीन राजानेही त्यांची स्तुती केली होती. गोंदवलेकर महाराजांनी जनावरांवर खूप माया केली. येथून जवळ असलेल्या म्हसवडमधील बाजारातील कसायांकडून गायी विकत घेऊन त्यांना जीवदान दिले त्यांच्यासाठी गोशाळा बांधली.

आयुष्यभर त्यांनी रामदासी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला. २२ डिसेंबर १९१३ या दिवशी गोंदवलेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येथेच त्यांची समाधी आहे. येथील समाधी मंदिराची उभारणी १९३६३७ साली झाली. मंदिरात प्रशस्त सभामंडप त्यासमोरील गर्भगृहात गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या खालच्या बाजूला महाराजांचे समाधी स्थान आहे. पायऱ्या उतरून तेथे जावे लागते. समाधीवर श्रीराम, लक्ष्मण, सीता मारुती यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात सततश्रीराम जयराम जयजय रामहा जप सुरू असतो. सकाळी सायंकाळी होणाऱ्या महाराजांच्या आरतीसाठी या सभामंडपात शेकडो भाविक असतात. याच ठिकाणी नित्य कीर्तन भजनाचे कार्यक्रम होत असतात.

समाधी मंदिराच्या मागे एक तुळशी वृंदावन आहे. याच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या मंडपामध्ये महाराजांच्या आईसाहेबांची समाधी आहे. मंदिराच्या पश्चिमेस गोशाळा आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या गायी आहेत. त्यांची नावे नद्यांच्या नावांवरून ठेवलेली आहेत. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे मोठ्या संख्येने भाविक येतातआलेल्या सर्व भाविकांना मंदिर संस्थानतर्फे मोफत महाप्रसाद भक्त निवासात राहण्याची सोय करण्यात येते. याव्यतिरिक्त समाधी मंदिरात दर्शनासाठी इतर दिवशीही हजारो भाविकांची गर्दी असते. सकाळी .३० ते रात्री १० पर्यंत भाविकांना महाराजांच्या समाधीचे दर्शन घेता येते

समाधी मंदिरापासून एक किमी अंतरावर असलेल्या गोंदवले गावातील थोरले राम मंदिर त्यासमोर असलेल्या हनुमान मंदिराचेही आध्यात्मिक ऐतिहासिक महत्त्व आहे. गोंदवलेकर महाराज चरित्र वाड्‌मय या ग्रंथानुसार, महाराज गुरूच्या शोधार्थ बालपणी घरातून बाहेर पडले आणि गुरूची कृपा ब्रह्मचैतन्य नाम प्राप्त करून ते १८६५ मध्ये गोंदवले येथील हनुमान मंदिरात आले. अनेक दिवस त्यांचे येथे वास्तव्य होते. मंदिरात कोणी महात्मा आला आहे ही वार्ता सर्वत्र पसरली, तेव्हा महाराजांचे आईवडील त्यांना या मंदिरात भेटण्यासाठी आले होते. आईवडिलांचे दर्शन घेऊन महाराज तीर्थयात्रेसाठी गेले आणि बरोबर एक वर्षांनी ते पुन्हा गोंदवले येथे आले होते. आध्यात्मिक महत्त्वासोबतच या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वही आहे. १९४२ मधील स्वातंत्र्य लढ्याची माण तालुक्यातील प्रथम ज्योत या मंदिरात पेटली महात्मा गांधीजींच्याचले जावचा उठाव करणारी घोषणा या मंदिरातून स्वातंत्र्यवीर धोंडीराम नाना पिसाळ संभाजीराव तात्यासाहेब पाटील यांच्या साथीने पुकारली गेली.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून ६४ किमी, तर पुण्याहून 
  • १५३ किमी अंतरावर
  • अनेक शहरांतून गोंदवलेसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिरात दुपारी रात्री महाप्रसादाची सुविधा
  • निवासासाठी मंदिर समितीतर्फे सुसज्ज भक्त निवास
  • संपर्क : मंदिर कार्यालय : ०२१६५२५८२९२
Back To Home