वाई तालुक्यात बगाडाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आसलेले बावधन हे गाव ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जाते. साताऱ्याच्या छत्रपती घराण्यातील राजाराम भोसले यांच्या जहागिरीचे हे गाव होते. येथील सोनजाई डोंगरावर असलेले सोनजाई देवीचे मंदिर व त्याच्या पायथ्याशी असलेले काळभैरवनाथांचे मंदिर ही दोन्ही मंदिरे येथील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. याशिवाय बावधन हे गाव येथील काळुबाई मंदिर, बौद्ध लेणी व भीमाचे खोरे यांसाठी प्रसिद्ध आहे. भाविक भक्तांसोबतच येथे पर्यटकही मोठ्या संख्येने येतात.
वाईच्या दक्षिणेकडे सह्याद्री पर्वत रांगेत असलेले बावधन हे शहरवजा गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध आहे. पूर्वी या संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती; परंतु आता शहरीकरण झाल्यामुळे तटबंदी नाहीशी झाली असली तरी आजही त्या तटबंदीचे दोन दरवाजे अस्तित्वात आहेत. बावधन गावाला लागून असलेल्या सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी काळभैरवनाथांचे प्राचीन मंदिर आहे. तेथून काही अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र सोनजाई–काळुबाई देवस्थानाच्या कमानीपासून सोनजाई मंदिराकडे जाण्यासाठी तीव्र चढाव आणि नागमोडी वळणाचा घाट मार्ग आहे. दुचाकी अथवा लहान मोटारी या मार्गाने आणखी एक किमी अंतरापर्यंत पुढे जाऊ शकतात. त्यापुढे मात्र वाहनांना बंदी असून तेथून सुमारे दीड किमी अंतर पायी जावे लागते.
येथून काही अंतर पुढे गेल्यावर एक दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. त्यापुढे लागणाऱ्या मोठ्या तलावाजवळ सोनजाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगरावर समोरासमोर एका डोंगरावर सोनजाई देवीचे, तर त्याच उंचीवर समोर असलेल्या दुसऱ्या डोंगरावर मांढरगडावरील काळूबाई देवीचे मंदिर आहे. सोनजाई देवीचे मंदिर हे समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर आहे. डोंगरकड्यावर आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून १० ते १२ पायऱ्या उतरून मंदिरात प्रवेश होतो. मुख्य मंदिराच्या केवळ गर्भगृहावर कळस असून मंदिराचा इतर भाग हा कौलारू आहे. गर्भगृहात सोनजाई मातेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या संपूर्ण मूर्तीला चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. त्यावर विविध अलंकार व साडी परिधान केली जात असल्याने मूर्तीचे सौंदर्य खुलून दिसते.
मंदिराच्या गर्भगृहाच्या शेजारीच एक लहानसे कुंड आहे. या कुंडात बाराही महिने पाणी असते. ते पाणी येथे पिण्यासाठी वापरले जाते. याशिवाय येथे भाविकांना निवासासाठी व पूजाविधी करण्यासाठी ओवऱ्या, होम हवन करण्यासाठी अनेक हवनकुंड असलेले मंडप आदी सुविधा आहेत. सोनजाई मंदिराचा परिसर हा साधारणतः वीस एकर आहे.
फार वर्षांपूर्वीपासून सोनजाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी अनेक धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते. या नऊ दिवसांत दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, पाच वाजता पूजा आरती, सकाळी ६ ते ९ पर्यंत सप्तशती पठण व हवन, सकाळी १० ते १२.३० पर्यंत भागवत कथा, दुपारी १२.३० ते ४ पर्यंत भोजन व विश्रांती, दुपारी ४ ते ६ कीर्तन व संध्या आरती, रात्री ९ ते १० वाजता देवीचा जागर करण्यात येतो. या कालावधीत येथे येणाऱ्या हजारो भाविकांना मंदिर समितीतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
सोनजाई माता मंदिरापासून १०० मीटर अंतरावर काळूबाई मातेचे मंदिर आहे. काळूबाई मंदिराच्या मागील बाजूस मोठे पठार (Table Land) आहे. या संपूर्ण परिसरावर निसर्गाची मुक्तहस्ते उधळण दिसते. येथून वाई तालुक्याचा काही भाग, पांडवगड व केंजळगड हे किल्ले, नागेवाडी व धोम धरण, मांढर देवीचा डोंगर हा सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. या पठाराला लागून प्रसिद्ध भीमाचे खोरे आहे. भीमाच्या खोऱ्याची आख्यायिका अशी की कृष्णा नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलून बावधनवरून पुढे जावी यासाठी ती नदी दक्षिण वाहिनी करण्याचा भीमाने निश्चय केला होता. मात्र, हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण झाले पाहिजे, अशी अट काळूबाई देवीने भीमाला घातली होती. त्यानुसार भीमाने एकच खोरे मारले आणि कोंबडा आरवला. त्यामुळे भीमाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. ज्या ठिकाणी भीमाने खोरे मारले असे सांगितले जाते तेथे मोठी दरी तयार झालेली आहे.
सोनजाई डोंगराच्या पायथ्यापासून काहीसे उंचावर असलेल्या काळभैरवनाथाचे मंदिर हे प्राचीन असून या मंदिरापर्यंत जाण्यासाठी जुना दगडी पायरी मार्ग आहे. या मंदिराची समुद्र सपाटीपासून उंची साधारणतः २४९० फूट तर पायथ्यापासून सुमारे २४६ फूट आहे. हे मंदिर डोंगराच्या कपारीत आहे.
या गावात भैरवनाथाचे प्राचीन मंदिर आहे. त्याचे बांधकाम दगडाचे असून शिखर विटांचे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथांची मुख्य मूर्ती व त्या सोबतच हनुमानाची मूर्ती, शिवपिंडी आहे. काळभैरवनाथ मंदिराची आख्यायिका अशी की येथील ठोंबरे नावाचा एक धनगर समाजातील भाविक, भैरवनाथांचे दर्शन घेण्यासाठी दररोज सोनई येथे जात असे. वृद्धत्वामुळे आता दररोजचा प्रवास झेपेनासा झाला. त्यामुळे भैरवनाथांनी स्वप्नदृष्टांत देऊन मीच तुझ्यासोबत तुझ्या गावी येईन, असे सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी त्या भाविकासोबत भैरवनाथ या सोनजाई डोंगरापर्यंत आले आणि तेथे ते गुप्त झाले. ते ज्या ठिकाणी गुप्त झाले, त्या ठिकाणी आजचे हे मंदिर आहे. भैरवनाथाची यात्रा फाल्गुन कृष्ण पंचमीला असते. ती बगाड यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या यात्रेत गाड्यावर एक बगाड ठेवून त्याची मिरवणूक काढली जाते. येथील बगाड पाहण्यासाठी व भैरवनाथांच्या दर्शनासाठी यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात.