आत्मगजानन मंदिर

अंगापूर, ता. सातारा, जि. सातारा

सातारा तालुक्यात असलेले अंगापूर हे गाव गणपतीच्या भद्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या गावचे वैशिष्ट्य असे की येथे कोणत्याही घरात अथवा सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असताना अंगापूरमध्ये मात्र गणेशोत्सवाऐवजी आत्मगजानन मंदिरात आगळावेगळा भद्रोत्सव साजरा होतो. येथील आत्मगजाननाची मूर्ती ही मोरगावच्या मयुरेश्वराचे रूप असल्याचे मानले जाते. राज्य सरकारनेही या मंदिराला तीर्थस्थानाचादर्जा देऊन त्याचा गौरव केला आहे.

येथील मंदिराची आख्यायिका अशी की साधारणतः ३५० वर्षांपूर्वी अंगापूरमधील सुवर्णकार समाजातील एक गणेश भक्त प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मोरगाव येथे मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पायी जात असे. अनेक वर्षे त्याचा हा नित्यक्रम होता; परंतु वृद्धत्वामुळे त्याला मोरगावी जाणे अवघड होऊ लागले. एका चतुर्थीस गेल्यावर त्याने गणेशाला सांगितले की हे मयुरेश्वरा आजपर्यंत मी तुझी सेवा केली; परंतु वृद्ध झाल्याने आता यापुढे ती सेवा शक्य होणार नाही. त्यावेळी मयुरेश्वराने त्याला दृष्टांत दिला की मी तुझ्याबरोबर येत आहे, पण तू मागे वळून पाहू नको, नाहीतर मी तेथेच थांबेन. गणेशभक्त परत येण्यास निघाला; परंतु अंगापूरजवळ आल्यावर त्याने मागे वळून पाहिले असता तेथेच मयुरेश्वर अदृश्य झाले. ज्या ठिकाणी मयुरेश्वर अदृश्य झाले, त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती प्रकट झाली. त्याच ठिकाणी मंदिर बांधून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेच स्थान आज स्वयंभू आत्मगजानन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

सातारा शहरापासून पूर्वेकडे कृष्णा नदीकाठी अंगापूर गाव वसले आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या गावाला संत गाडगे महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला आहे. अंगापूर येथील कृष्णा नदीच्या डोहात समर्थ रामदास स्वामी यांना श्रीराम आंग्लाई देवीच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्यातील श्रीरामांची मूर्ती समर्थांनी चाफळ येथील मंदिरात, तर आंग्लाई देवीची मूर्ती ही सज्जनगडावर प्रतिष्ठापित केली होती. असे सांगितले जाते की या आंग्लाई देवीच्या नावावरूनच या गावाला अंगापूर असे नाव पडले आहे.

आत्मगजानन मंदिर हे अंगापूर गावचे ग्रामदैवत आहे. या मंदिराभोवती मोठी तटबंदी असून त्या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश होतो. या तटबंदीच्या बाहेरील बाजूस हनुमान मंदिर, तर आतील भागात अनेक ओवऱ्या असून तेथे धार्मिक विधी करण्याची भाविकांना थांबण्याची सुविधा आहे. मंदिराचे आवार मोठे असून सर्वत्र दगडी फरसबंदी करण्यात आलेली आहे. येथील मुख्य मंदिर हे गणपतीचे असून त्याचे बांधकाम पेशवेकालीन आहे. मंदिरासमोर दोन उंच दीपमाळा मंदिराच्या सभामंडपात स्वयंचलित कारंजे आहे. मंदिराचे बांधकाम करतानाच पावसाचे पाणी साठविण्याची स्वयंचलित रितीने ते येथील कारंजात येण्याची योजना करण्यात आली होती.

गर्भगृहात उत्तराभिमुख शेंदूरचर्चित आत्मगजाननाची चार फूट उंचीची मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे चांदीचे आहेत. अष्टविनायकांपैकी मोरगाव येथील मयुरेश्वराची मूर्ती येथील मूर्तीमध्ये साम्य असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या आवारात महादेवाचे मंदिर असून मंदिराबाहेर एका मोठ्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. १९१८ मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये महादेव मंदिराच्या कळसावर वीज पडल्याने येथील प्राचीन शिवपिंडी भंग पावली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी रुद्राभिषेक, धार्मिक विधी करून येथे नवीन शिवपिंडीची प्रतिष्ठापना केली.

अंगापूर या गावात स्वयंभू गणेशाचे जागृत स्थान असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात येथे कोणत्याही घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात नाही. नोकरीव्यवसायानिमित्त येथील ग्रामस्थ परगावी असतील तरीही ते आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करीत नाहीत. गणेशोत्सव म्हणजे या गावची जत्रा असून या उत्सवाला येथेभद्रोत्सवअसे म्हणतात. भाद्रपद चतुर्थी आणि पंचमी या दोन दिवस चालणाऱ्या भद्रोत्सवाला २०० वर्षांची परंपरा आहे. येथील भद्रोत्सवाचे स्वरूप असे आहे की या उत्सवाचा मुख्य मान हा येथील सुवर्णकार समाजाला आहे. सुवर्णकार समाजाचा मानकरी नागपंचमी ते गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस हा साधारणतः एक महिन्याचा काळ (अधिक महिना असेल तर दोन महिने) आत्मगजानन मंदिरामध्येच थांबतो. या काळात दररोज गावाजवळील कृष्णा नदीवर स्नान करून गावातील जेवढी दैवते आहेत, त्यांना तो जलाभिषेक करतो. या कालावधीत त्याने इतर कोणत्याही व्यक्तीला स्पर्श करायचा नसतो.

या गावात आणखी एक परंपरा आहे, ती म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कृष्णेवर स्नान करून अंगापूर, फडतरवाडी, लिंबाचीवाडी येथील सुमारे ६०० ते ७०० आबालवृद्ध ६० ते ६५ किलोमीटर अंतर अनवाणी चालत अंगापूरची प्रदक्षिणा (या प्रदक्षिणेला स्थानिक भाषेतदोराअसे म्हटले जाते) पूर्ण करतात. यावेळी ते परिसरातील दैवतांना जलाभिषेक करतात. हे सर्व दोरेकरी गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी मंदिराजवळ परततात. त्यावेळी तेथे नवसाची तान्ही बाळे जमिनीवर ठेवली जातात. दोरेकरी या बाळांना ओलांडून पुढे जातात. या विधीनंतर दोरेकऱ्यांकडूनमोरया म्हणा दोरया…’ या जयघोषात मंदिराला पाच प्रदक्षिणा केल्या जातात.

भद्रोत्सवाचा मुख्य दिवस हा गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे पंचमीचा असतो. या दिवशी संध्याकाळी महिनाभर गणेशाची सेवा करणाऱ्या सुवर्णकार भाविकाच्या डोक्यावर भद्रपात्र (मातीचे मडके ज्याला खालच्या बाजूने फोडून त्याला पात्राचा आकार आणला जातो) दिले जाते. या पात्रात उद, धूप, कापूर, खारीक टाकून ते प्रज्वलित करण्यात येते. ते डोक्यावर घेऊन हा भक्त संपूर्ण गावातून फेरी मारतो. ही फेरी एक तासाची असते. या फेरीमध्ये भाविक या भद्रपात्रात ठिकठिकाणी उद टाकत असतात. ‘मोरया म्हणा दोरया, दोरया म्हणा मोरयाच्या जयघोषाने अंगापूरचा परिसर यावेळी दुमदुमून जातो. ही फेरी मंदिराजवळ आल्यानंतर भद्रपात्राचे विसर्जन होते. या उत्सवाला आत्मगजाननाचा भद्रोत्सव असेही म्हटले जाते.

उपयुक्त माहिती:

  • कोरेगावपासून १५ किमी, तर सातारा शहरापासून २० किमी अंतरावर
  • सातारा कोरेगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home