ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात, निमढेला सफारी गेटपासून २ किमी अंतरावर घनदाट जंगलात, डोंगराच्या मध्यभागी व नदीकाठावर रामदेगी देवस्थान स्थित आहे. गोंडी भाषेत ‘दिघी’ म्हणजे आराम व शीण घालविण्याचे रम्य ठिकाण! श्रीरामांनी दक्षिणेकडे जाताना या ठिकाणी विश्रांती घेतली होती म्हणून या क्षेत्राचे नाव ‘रामदिघी’ असे पडले. त्यानंतर अपभ्रंश होऊन ‘रामदेगी’ म्हणून ते प्रचलित झाले. जंगल परिसर असल्यामुळे निमढेला सफारी गेटवर प्रत्येक भाविकाची नोंद करून या मंदिरात जाण्यासाठी त्यांना पुढे सोडले जाते.
पूर्वीच्या काळी दंडकारण्याचा भाग असलेल्या या परिसरात ७०० ते ८०० वर्षांपूर्वी वस्ती होती, असे सांगितले जाते. त्याच काळात घनदाट जंगलात ७० ते ८० फूट उंच टेकडीवर हे हेमाडपंती रचनेचे मंदिर बांधण्यात आले आहे. ८०० वर्षांपूर्वी विदर्भावर यादवांचे साम्राज्य होते. त्या काळात या परिसरात अनेक मंदिरे बांधली गेली. विदर्भात हेमाडपंती रचनेची १५० ते २०० मंदिरे असल्याचे सांगितले जाते. या सर्वांमध्ये रामदेगी देवस्थानाचे विशेष महत्त्व आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार अण्णाजी जयरामजी यांच्या मते, महाकवी कालिदास यांनी ‘मेघदूत‘ या महाकाव्याची रचना याच क्षेत्रात केली असावी.
या मंदिराची आख्यायिका अशी की या परिसरात ताडोबासुर नावाचा राक्षस राहत होता. त्याच्या नावावरूनच हे जंगल ताडोबाचे जंगल म्हणून पूर्वीपासून ओळखले जात असे. त्यावेळी तेथे जमुनाबाई नावाची एक भिल्ल स्त्री राहत असे. ती रामाची परमभक्त होती. तिला ताडोबासुर सतत त्रास देत असे; परंतु ती शूर होती. ती कधीही ताडोबासुराच्या हाताला लागली नाही. ती या घनदाट जंगलातून घोड्यावरून प्रवास करत असे. एकदा ताडोबासुराने तिचा पाठलाग सुरू केला. अनेक डोंगर व दऱ्या पार करून ती रामदेगी परिसरात आली असताना ताडोबासुर आपल्याला आता पकडणार याची जाणीव होताच तिने श्रीरामांचा धावा करीत जोरदार किंकाळी फोडली व घोड्यावरून स्वतःला खोल दरीत झोकून दिले. तेव्हा ती रामदेगी मंदिराजवळ असलेल्या कुंडातील पाण्यात पडल्याने तिचा जीव वाचला. तिची किंकाळी ऐकून श्रीरामांनी बाण सोडून ताडोबासुराचा वध केला. रामदेगी देवस्थान परिसरातच या जमुनामातेचे लहानसे समाधीमंदिर असून त्यामध्ये घोड्यावर स्वार जमनामातेची मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना १७२० मध्ये केल्याची नोंद येथे आहे.
पायथ्यापासून सुमारे १०० पायऱ्या चढून रामदेगी मंदिरात जाता येते. डोंगर कड्यावर असल्यामुळे मंदिराचा परिसर आटोपशीर असा आहे. मंदिराच्या समोरील बाजूस मारुतीचे लहानसे मंदिर असून त्यातील मूर्ती मात्र ५ फूट उंचीची आहे. मुख्य मंदिराच्या सभामंडपात १६ दगडी स्तंभ असून सभामंडपाच्या तिन्ही बाजूला अर्धभिंती आहेत. सर्व बाजूंनी डोंगर व मध्यभागी हे मंदिर असल्यामुळे एखाद्या बशीमध्ये कप असावा, असे येथील दृश्य भासते. लालसर, गुलाबी वालुकामय पाषाणात या मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. (ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा दगड तयार झाला व नंतरच्या काळात तो मंदिरे, महाल, राजवाडे, स्मारके व स्तंभ बांधण्यासाठी वापरात येऊ लागला.)
या मंदिरावर जास्त शिल्पांकन नसले तरी सभामंडपातील सर्व स्तंभांवर वरील बाजूस भारवाहक यक्षप्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. सभामंडपात व अंतराळात नंदीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर वरच्या बाजूस नक्षीकाम व ललाटबिंबावर गणेश प्रतिमा आहे. गर्भगृहात एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी शिवपिंडी व त्यासमोरील बाजूस ४ फूट उंचीचे पितळी शिवलिंग व त्यावर महादेवांचा मुखवटा आहे. शिवपिंडीसमोरील भिंतींमध्ये असलेल्या खोबणीत श्रीगणेश व नागदेवता यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या शिखरावर आमलक व कळस आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूने उंच डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्यामुळे येथे पाण्याचे मोठे कुंड तयार झाले आहे. त्याला सीताकुंड म्हटले जाते. मंदिराशिवाय या परिसरात संघारामगिरी हे बुद्धविहार आहे. येथे बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंगांच्या प्रतिमा आहेत. दरवर्षी येथे ३० व ३१ जानेवारीला यात्रा भरते. या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी दलित व पीडितांना आवाज दिला होता, असा इतिहास आहे. याशिवाय या परिसरात ४० ते ५० माणसे बसू शकतील, अशा आकाराच्या २ गुंफा आहेत. त्यांना भीमनाचापरा असे म्हटले जाते. या गुंफा भीम व अर्जुनाने निर्माण केल्याचे सांगितले जाते. रामदेगी देवस्थानात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक सोमवारी यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक येथे दर्शनाला येतात.
मंदिराच्या पायथ्याशी भाविकांच्या सुविधेसाठी धर्मशाळा बांधण्यात आली आहे. याच परिसरात श्रीराम व राधाकृष्ण मंदिरे आहेत. परिसरात वाहनतळ व पूजा साहित्याची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. येथे येणारे भाविक व पर्यटक येथील स्थानिक महिलांकडून चुलीवर बनविण्यात येणाऱ्या पिठलं–भाकरीचा आवर्जून आस्वाद घेतात. महाराष्ट्र सरकारनेही या ठिकाणाला पर्यटनाचा दर्जा दिला असून वेळोवेळी सरकारतर्फे या परिसराच्या विकासासाठी निधी दिला जातो.