महाकाली मंदिर

चंद्रपूर शहर, ता. चंद्रपूर, जि. चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील प्राचीन महाकाली देवीचे मंदिर हे विदर्भातील शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. शहराची ग्रामदेवता असणारी महाकाली देवी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की १६ व्या शतकात गोंड राजा बल्लारशाह राणी हिरातानी यांनी हे मंदिर बांधले. महाकाली देवी मंदिराच्या भिंतींवरील शिल्पकलेतून तिबेटी आणि हिंदू परंपरेचे सुंदर मिश्रण दिसून येते. प्रत्येक मंगळवारी या मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते.

अंचलेश्वर महादेव आणि महाकाली मंदिर ही चंद्रपूरमधील प्रमुख मंदिरे आहेत. ऐतिहासिक पौराणिकदृष्ट्या या दोन्ही मंदिरांचा एकमेकांशी संबंध आहे. एका आख्यायिकेनुसार, आज जेथे चंद्रपूर शहर वसले आहे, तेथे पूर्वी जंगल होते. या भागात तेव्हा गोंड राजाची सत्ता होती. त्यावेळी राजा बल्लारशाह गादीवर होता. या राजाच्या शरीरावर अनेक जखमा होत होत्या, ज्याला स्थानिक भाषेत खांडूक म्हणायचे. म्हणून या राजालाखांडक्या बल्लारशाहअसे नाव पडले. एके दिवशी शिकारीसाठी राजा येथील झरपट नदीच्या परिसरात आला असता त्याला कोरड्या नदीपात्रात पाण्याने भरलेले कुंड दिसले. या कुंडातील पाणी पिऊन त्याने ते पाणी चेहऱ्यालाही लावले. सायंकाळी महालात गेल्यावर त्याची राणी हिरातानी हिच्या लक्षात आले की राजाच्या चेहऱ्यावरील जखमा बऱ्या झाल्या होत्या अंगावरील जखमांचे प्रमाणही कमी झाले होते.

नदी किनाऱ्यावरील कुंडातील पाणी प्यायल्याने ते अंगाला लावल्याने आपल्या जखमा बऱ्या झाल्या होत्या, हे राजाच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी राणीसह तेथे जाऊन राजाने त्या कुंडात स्नान केले, तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता. या पाण्यात काहीतरी चमत्कारिक गुण आहेत हे राजाराणीने हेरले येथील जंगल साफ करून घेतले. या परिसराची सफाई सुरू असताना कुंडाच्या दक्षिणेकडे काही अंतरावर राजाला एक भुयार दिसले. त्यात खडकात कोरलेली महाकालीची मूर्ती आढळली. राजाने ते भुयार स्वच्छ करवून घेतले कुंडाच्या जागेवर महादेवाचे (आजचे अंचलेश्वर मंदिर) तसेच भुयाराच्या जागेवर महाकालीचे मंदिर बांधले. या राजाचा कार्यकाल पाहता ही दोन्ही मंदिरे १४९५ ते १४९७ या काळात बांधण्यात आली असावीत. त्यानंतर गोंड साम्राज्याच्या गादीवर आलेल्या राजा वीरशाह यांची पत्नी राणी हिराई यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार नूतनीकरण केले. राणी हिराई यांनी पराक्रमी राजा वीरशाह यांच्या स्मरणार्थ चैत्र पौर्णिमेला महाकाली मंदिरात उत्सवाची प्रथा सुरू केली, ती आजही सुरू आहे. राणीने महाकाली मंदिराजवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. या राणीचा कार्यकाल १७०४ ते १७१९ हा होता. त्यामुळे १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला असावा, अशी शक्यता आहे.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार, त्रेतायुगात चंद्रपूर शहराच्या जागीलोकपूरया नावाचे मोठे शहर होते. तेथील कृतध्वज या राजाला सुनंद हा मुलगा होता. त्याला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला एका भुयारात शिळेवर स्थित असलेली भव्य महाकालीची मूर्ती दृष्टीस पडली. पाषाणात गुहा करून त्याने त्याच जागी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. खांडक्या बल्लारशाह या राजाला सापडलेली महाकालीची मूर्ती तिचे स्थान हेच असावे, असे सांगितले जाते.

महाकाली देवीचे मंदिर चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. मंदिराभोवती तटबंदी असून इंग्रज राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी ती बांधल्याची नोंद आहे. तटबंदीतून मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारांच्या आजूबाजूला स्थायी स्वरूपाची सुमारे १०० ते १५० पूजा साहित्याची दुकाने आहेत. याशिवाय यात्रा कालावधीत या दुकानांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. मंदिराच्या प्रांगणात श्रीगणेश, शनिदेव, हनुमान ही मंदिरे आहेत. महाकाली देवीचे मंदिर चौरस बांधणीचे असून या संपूर्ण दगडी मंदिराची उंची सुमारे ५० फूट इतकी आहे. मंदिराच्या बांधकामात मुगल स्थापत्य शैलीची छाप असल्याचे जाणवते. मंदिराच्या वर कोपऱ्यांवर घुमट आणि मध्यभागी मोठ्या आकाराचा घुमट आहे. सभामंडपापासून १० पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गुहेसारखे दगडी सभागृह आहे. त्यात मध्यभागी महाकालीची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती फूट उंचीची असून ती अखंड पाषाणात कोरलेली आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट, चेहऱ्यावर चांदीचा मुखवटा, एका हातात खड्ग दुसऱ्या हातात ढाल आहे. मूर्तीसमोर गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत शिवपिंडी आहे.

आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवसापासून घटस्थापनेनंतर येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. एकवीरा देवी मंदिरातही या काळात पूजाअर्चा करून हा उत्सव साजरा होतो; परंतु चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होणारा नवरात्रोत्सव त्याकाळात भरणारी येथील यात्रा ही चंद्रपूरमधील मोठी यात्रा समजली जाते. विदर्भासोबतच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बेदर आणि यवतमाळ तसेच छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक विशेषतः गोंड बांधव या यात्रेत सहभागी होतात.

येथील यात्रेच्या वेळी नांदेडकडून मोठ्या प्रमाणात भाविक येतात, त्याबाबत एक कथा सांगितली जाते. शेकडो वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील आदिशक्तीची उपासक राजाबाई देवकरीण हिला देवीने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मी चंद्रपूरमध्ये आहे. तेव्हा राजाबाई शेकडो भाविकांसह देवीच्या दर्शनाला आल्या. तेव्हापासून नांदेडवासीयांची चंद्रपूरच्या महाकाली मंदिराच्या वारीची प्रथा सुरू झाली. खासगी वाहने, बस, रेल्वे याशिवाय मालगाड्यांच्या डब्यांमधूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.

या मंदिरातील पुजाऱ्यांना भोसले काळापासून मानधन देण्याची व्यवस्था होती. ब्रिटिश सरकारच्या काळातही ती सुरू राहिली. आजही ती प्रथा आहे. देवस्थानतर्फे येथे भाविकांच्या निवासाची सुविधा, महाप्रसादालय रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

उपयुक्त माहिती:

  • चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मंदिर
  • राज्यातील अनेक भागांतून एसटी रेल्वेने चंद्रपूरपर्यंत येता येते
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home